वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी धाराशिवमध्ये अंनिसचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर…
धाराशिव (प्रतिनिधी) :
समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी संघटित कार्य करणे आणि समाजपरिवर्तनासाठी सक्षम कार्यकर्त्यांची फळी तयार करणे या उद्देशाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा, धाराशिव आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर १३ व १४ जून २०२६ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बार्शी नाका (नीरज गॅस एजन्सी समोर), धाराशिव येथे सकाळी ९.३० ते सायं. ५.३० या वेळेत पार पडणार आहे.
विविध विषयांवर होणार सखोल मार्गदर्शन
या शिबिरामध्ये अंनिसची रचना व कार्यपद्धती, बुवाबाजीचे वास्तव, तथाकथित चमत्कारांचे वैज्ञानिक विश्लेषण, वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यसनमुक्ती, महिला आणि अंधश्रद्धा, मानसिक आजार: समज व गैरसमज यांसह जादूटोणा प्रतिबंधक कायदा व सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय, संत व समाजसुधारकांची भूमिका, भूतबाधा, करणी-भानामती यांसारख्या समस्यांवरील उपाययोजना तसेच विविध खेळ, उपक्रम आणि चळवळीच्या गाण्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. हे शिबिर पूर्णपणे निःशुल्क असून, प्रशिक्षणार्थींसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार निवासाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंनिसच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिणारे नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, युवक-युवती यांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. प्रवेश मर्यादित असल्याने पूर्वनोंदणी केलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी किंवा नाव नोंदणीसाठी इच्छुक व्यक्तींनी ॲड. देविदास वडगावकर (९४२३०७३९११), ॲड. रवींद्र मैंदड (८७८८१७३९३८/९४२३३४८६५३), प्रा. डॉ. महेश मोटे (९४०४२८१७१८/९९२२९४२३६२), चंद्रकांत उळेकर (९८२२२५८१२२), रमेश माने (८२७५९२४१७२) यांच्याशी संपर्क साधावा. अंधश्रद्धा निर्मूलन हीच खरी सामाजिक क्रांती, चला, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवूया, अंधश्रद्धा संपवूया आणि समतेचा नवा समाज घडवूया, असे आवाहन करत आयोजकांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त तरुणांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.


