एकसंघ समाज सर्वात मोठा, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचे प्रतिपादन

सूर्यवंशी क्षत्रिय ( कुणबी) ज्ञातिहितवर्धक मंडळाचे ११२ वे अधिवेशन व वार्षिक सर्वसाधारणसभा संपन्न
सफाळे,
सूर्यवंशी क्षत्रिय ( कुणबी) ज्ञातिहितवर्धक मंडळाचे ११२ वे अधिवेशन व वार्षिक सर्वसाधारणसभा रविवारी विरार येथे मोठ्या उत्साहात पार पडली. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यदुनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाला स्वागताध्यक्ष म्हणून वसई विरार महानगरपालिका सभागृह नेते प्रफुल्ल साने उपस्थित होते.
यावेळी लोकनेते हितेंद्र ठाकूर, वसई विरार महानगरपालिका महापौर अजिव पाटील, माजी आमदार क्षितिज ठाकूर, वसई विरार महानगरपालिका पहिले माजी महापौर राजीव पाटील, नगरसेविका अपर्णा पाटील, नगरसेविका कीर्ती मेहता- राऊत, साधना कोरे, नंदकुमार कोरे , सरचिटणीस प्रकाश राऊत, विश्वस्त विवेक कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, आगामी काळात AI मुळे अनेकांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणून काळाची पावले ओळखून तरुणांनी एकत्र येऊन काम करावे. एकसंघ समाज सर्वात मोठा असतो. माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी समाजा मध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी श्याडो टीम तयार करून तरुणांना संधी द्यावी असे आवाहन केले. महापौर आजीव पाटील व महानगरपालिकेचे पहिले माजी महापौर राजीव पाटील यांनी मंडळाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष यदुनाथ पाटील यांनी सांगितले की, वर्षभरात विविध उपक्रम राबिण्यासाठी विविध दात्यांचे मोठे योगदान लाभले. नवीन बांधण्यात आलेल्या वास्तूचा विद्यार्थ्यांना अभ्यासिका म्हणून वापर करता येईल. महिला क्रीडा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . आगामी काळात विविध उपक्रमांमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पूज्य रामचंद्र गोपाळ राऊळ यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय समाज रत्न सुवर्ण पुरस्कार मुंबई येथील प्रभाकर पाटील यांना तर कै. लक्ष्मण महादेव राऊत स्मरणार्थ समाजभूषण पुरस्कार लालठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांना प्रदान करण्यात आला. तसेच कै. दादोब काशिनाथ ठाकूर स्मरणार्थ उद्योगरत्न पुरस्कार रावते येथील उद्योजक प्रसाद पवार यांना देण्यात आला. लोकशाहीर आत्माराम पाटील जीवन गौरव पुरस्कार संतोष पावडे यांना तर कै. महादेव नथुराम पाटील समाजमित्र पुरस्कार आसनगाव येथील संजय पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याशिवाय मंडळातर्फे दिले जाणारे विविध पुरस्कार व पारितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बंधू-भगिनींचा यावेळी गौरव करण्यात आला. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली.या वेळी मंडळाचे आजी-माजी पदाधिकारी, विश्वस्त, सल्लागार, कार्यकारिणी सदस्य, गटाध्यक्ष, गटचिटणीस, महिला संघटक आणि सभासद बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विरार वसई भागामध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी बांधव यांचे वास्तव्य असल्याने या भागामध्ये आगामी काळात समाजाचे भव्य असे सभागृह व्हावे असा सूर सभागृहातून व्यक्त करण्यात आला.



