संगीतातील बादशाह शंकर महादेवन सर

संगीताचा बादशहा
संगीत म्हटले की आपल्या समोर नाव येते ते संगीतातील बादशाह शंकर महादेवन सर यांचे. अशा दिग्गज, प्रख्यात आणि सर्वांच्याच मनावर आपल्या संगीत आणि आवाजाने राज्य करणाऱ्या महान कलाकारास भेटण्याची संधी मिळणार असेल तर या संधीचे सोने करायला हवेच , पण केवळ भेटायचे नाही तर त्यांची मुलाखत घ्यायची म्हणजे आपल्या हाती परीस लागल्या सारखेच. अशी संधी मला मिळाली ती २०१६ मध्ये, निमित्त होता माझा मित्र निमेश जोशी यांच्या स्टुडिओच्या उद्घाटन सोहळ्याचे.
खरतरं एक पत्रकार म्हणून मला ही मुलाखत घेता येणार होती, पण विशेष म्हणजे आपल्या आवडत्या संगीतकार/गायकास भेटण्याची ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही हे ही तितकेच खरे. तेव्हा मी स्वतः हाताने बनवलेला एक चॉकलेट ने भरलेला गिफ्ट बॉक्स त्यांना भेट म्हणून द्यायचे ठरवले. त्यावेळी विचार केला की, यामध्ये नवीन आयडिया वापरून काय बनवता येऊ शकते. जे सरांना भावले पाहिजे. त्यावेळी नुकताच शंकर सरांचा “कट्यार काळजात घुसली” हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता. ज्यामध्ये प्रथमच त्यांनी एक कलाकार म्हणून भूमिका केली आणि ती प्रेक्षकांच्या हृदयाला जाऊन भिडली. तेव्हा ठरवले की या कट्यारचा उपयोग आपणास या गिफ्ट बॉक्स बनवताना करता येइल आणि बॉक्स तयार केला. आता उत्सुकता लागली होती त्यांना भेटण्याची.
सकाळी १० वाजता सर येतील अशी सूचना होती त्यानुसार मी ९.३० लाच जाऊन बसले. ठरल्या प्रमाणे सर आले. म्हणतात ना, “तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले” अगदी त्यांच्या “डाउन टू अर्थ” स्वभावाने सगळ्या उपस्थितांचे मन जिंकले. सगळ्यांशी ते मन मोकळे पणाने बोलत होते, मी जरा लांबूनच सगळे निहारत होते, कारण मला वेळ मिळणार होता त्यांच्याशी गप्पा म्हणजेच मुलाखत घेण्याचा. उद्दघाटन सोहळा पार पडला. आलेल्या सर्व पाहुण्यांच्या फर्माईश नुसार त्यांनी कट्यार मधील गाणे ‘सूर निरागस हो’ गायले. नंतर निमेशला म्हणाले, चल, मला तुझा पूर्ण स्टुडिओ दाखव बरं, कोणते नवीन साहित्य, वाद्ये काय काय आहेत दाखव बर मला. तेवढ्यात नीमेश म्हणाला, सर रिता थांबली आहे तुमची मुलाखत घ्यायला. तर लगेच म्हणाले, अरे हो ! चल आपण बोलत बोलत गप्पा मारू आणि स्टुडिओ पण बघू. म्हणजे वेळ वाया जाणार नाही दोन्ही काम होतील. मग काय एक गायक/संगीतकार/कलाकार आणि एक सामान्य व्यक्ती ते असामान्य गायक असा हा चतुरस्र कलाकार आणि माझ्या गप्पा सुरू झाल्या. कट्यारच्या भूमिकेविषयी ते म्हणाले, असेच एकदा सुबोध भावे मला भेटायला आले. कट्यारमधील संगीत, गाणे याविषयी आमचे बोलणे चालू होते, त्यावेळी तो चित्रपटातील पंडित भानु शंकर शास्त्री या भूमिकेसाठी त्याचा कलाकार शोध मोहीम चालू होतीच. आमचे बोलणे चालू असतानाच त्यानेच माझ्यातील कलाकार हेरला आणि म्हणाला पंडित भानु शंकर शास्त्री या भूमिकेसाठी तुम्ही एकदम परिपूर्ण आहात. मी म्हणाली, अरे ! हे कसे शक्य आहे. पण त्याने सांगितले या भूमिकेला न्याय तुम्हीच देऊ शकाल. मग काय मी ती भूमिका केली. खरंच चित्रपटातील त्यांच्या सहज अभिनयाने सर्वांचेच मन जिंकले. विशेष म्हणजे सर मराठीत उत्तम बोलले. त्यातील प्रत्येक गाणे हिट तर झालेच पण चित्रपटही सुपरहिट झाला.
माझे सर्व प्रश्न विचारून झाले आणि मी सरांना धन्यवाद! म्हटले, सर लगेच म्हणाले, अजुन काही विचारायचे असेल तर विचार, मी लगेच म्हणाले, विचारायचे तर नाही, पण तुम्हाला काही तरी द्यायचे आहे, त्यावर सर एकदम चकित होऊन म्हणाले, अरे! प्रत्येक वेळी पत्रकारांना आम्हाला गिफ्ट द्यावे लागते, आयुष्यात तू पहिली अशी पत्रकार भेटलीस जी मला गिफ्ट देऊ इच्छिते. यावर सर्वच जण हसले. जेव्हा मी त्यांना गिफ्ट बॉक्स दिला, आणि म्हणाले, हा खास मी स्वतः तयार केला आहे. तर लगेच म्हणाले तू इतका हाताने बनवला आहेस तर तुझ्या समोरच पाहतो तू काय काढले आणि लिहिले आहेस त्यावर. मी कट्यारच्या आकारात त्यांचा फोटो लावलेला पाहून ते म्हणाले, “what a creativity” क्या, दिमाग लगाया है! बहोत बढीया! जिंदगी मै पहली बार इतना बढीया गिफ्ट मुझे मिला है! खूप वेळ तो गिफ्ट बॉक्स न्याहाळत, त्यावर काय लिहिले आहे ते वाचत, मग हि कल्पना तुला कशी सुचली, अश्या बऱ्याच गप्पा अजुन सुरु झाल्या. मला म्हणाले, तुम्हारा ये गिफ्ट बहोत खास है, मी माझ्या घरात माझ्या मिळालेल्या ट्रॉफी जवळ ठेवेल याला. लगेच त्यांच्या पत्नी कडे देत म्हणाले, तुम भी देखो, कितना प्यारा गिफ्ट बनाया है! चलो, इस बात पे, गिफ्ट बॉक्स के साथ एक फोटो तो बनता है! मग काय, चार – पाच फोटो घेतले आणि मग बोलत बोलतच मला दुसरीकडे कार्यक्रमाला जायचे आहे म्हणाले आणि निघाले.
आयुष्यात इतक्या उंचावर गेलेला व्यक्ती, पण त्याचे पाय धर्तीवरच असलेले पाहिले. बोलण्यातील नम्रता, चेहऱ्यावरील स्मित हास्य आणि सगळ्यांना आदर देण्याची त्यांची भावना पाहून, मनातील त्यांचे स्थान आणि त्यांच्या विषयी वाटणारा आदर अजुनच वाढला.
डॉ. रिता मदनलाल शेटीया
लेखिका रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका आहेत.

