ताज्या घडामोडी

५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचा आजपासून थरार!

अहिल्यानगर सज्ज – २४ जिल्ह्यांचे ८७० खेळाडू मैदानात उतरणार

राष्ट्रीय संघ निवडीसाठी चुरस

अहिल्यानगर (क्री. प्र.) : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या व अहिल्यानगर जिल्हा खो-खो संघटना यांच्या मान्यतेने मा. श्री. अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठाण, विश्वंभरा प्रतिष्ठाण बुऱ्हाणनगर व बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचा थरार आज, गुरुवारपासून (ता. ४ डिसेंबर) श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर, अहिल्यानगर येथील मैदानावर ४ ते ७ डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. संपूर्ण शहरात खो-खो क्रीडा वातावरणाचा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे.

या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे महाराष्ट्र संघाची निवड कर्नाटक येथे होणाऱ्या ४४ व्या कुमार-मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणार आहे. प्रत्येक जिल्हा पूर्ण क्षमतेने मैदानात उतरणार आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांतील तब्बल ८७० खेळाडू व प्रशिक्षक सहभागी होणार असून चार मैदानांवर सामने रंगणार आहेत. सर्व यंत्रणा, व्यवस्था, निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा आणि मैदानाची तयारी पूर्ण झाल्याचे संयोजकांनी सांगितले.

स्पर्धेचे उद्घाटन सायंकाळी ६ वाजता होणार असून त्याप्रसंगी अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले जिल्हाध्यक्ष, भा.ज.पा. युवा मोर्चा महिल्यानगर (दक्षिण) संचालक-जिल्हा सहकारी बँक, मा. ना. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा तथा पालकमंत्री, संग्रामभैय्या जगताप, पंकज आशिया, जिल्हाधिकारी, सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक (SP) अहिल्यानगर, आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. त्यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार, सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील गटवारी पुढीलप्रमाणे :
मुले गट
अ गट : धाराशिव, रायगड, पालघर
ब गट : सांगली, नंदूरबार, छ. संभाजीनगर
क गट : सोलापूर, जालना, सिंधुदुर्ग
ड गट : पुणे, धुळे, लातूर
इ गट : अहिल्यानगर, बीड, परभणी
फ गट : ठाणे, मुंबई उपनगर, हिंगोली
ग गट : नाशिक, रत्नागिरी, जळगाव
ह गट : मुंबई, सातारा, नांदेड

मुली गट
अ गट : धाराशिव, रायगड, परभणी
ब गट : सांगली, नंदूरबार, बीड
क गट : सोलापूर, धुळे, लातूर
ड गट : ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग
इ गट : नाशिक, पालघर, छ. संभाजीनगर
फ गट : मुंबई उपनगर, सातारा, नांदेड
ग गट : पुणे, अहिल्यानगर, हिंगोली
ह गट : रत्नागिरी, जालना, जळगाव

खो-खोच्या वेग, चपळाई आणि रणनीतीने सजलेल्या या रोमांचक स्पर्धेत कोण ठरणार अजिंक्य? कोण मिळवणार महाराष्ट्राचा मान आणि राष्ट्रीय स्पर्धेची तिकीट? हे पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??