खेटरं @डॉ°डी°एस°काटे°°

“उद्योजकीय परिवर्तन” या सदरातील एक व्याख्यान मी शांतपणे ऐकत होतो. व्याख्यानकार सांगत होते….”एक थोडासा अशिक्षित -अविकसित अर्थात मागासलेला देश होता.तेथील नागरिक पायामध्ये पादत्राणे सुद्धा घालत नव्हते .
एका आंतरराष्ट्रीय कंपनीने आपला पादत्राणे उद्योग या देशांमध्ये सुरू करण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी एक समूह तेथे पाठवला.त्या देशातील परिस्थिती आणि तेथे व्यवसाय जर टाकला तर त्यात नफा होईल की नाही? याबद्दल अहवाल मागितला! सर्वांनी कंपनीला असे सांगितले की येथे आपली कंपनी चालू शकत नाही.. *कारण की तेथील लोक चप्पल, बूट घालतच नाही.आपण येथे कंपनी सुरू केली तर ती तोट्यात जाईल!”मालकाने सर्वांचे विचार व सल्ला ऐकून घेतला आणि सर्वांना आदेश दिला की उद्यापासून त्याच देशांमध्ये आपल्या कंपनीचे काम सुरू होईल.तुमचा अविवेकी, अविचारी, असृर्जनशील सल्ला मी मानणार नाही. कारण की तेथील नागरिक पादत्राने वापरत नाही याचा अर्थ त्यांना पादत्राणे वापरायची सवय लावा! जाहिराती करा. तेथे आपला चांगला व्यवसायात निश्चित भरभराटीस येईल.ती एक जगातील चांगली कंपनी त्या मागासलेल्या देशात स्थापन झाली. *लोकांना सवय लागल्यामुळे चप्पल/ बूट यांचा खप वाढला. ग्राहकांच्या उड्या पडू लागल्या आणि सर्वच लोक पादत्राणे वापरायच्या सवयीकडे वळली..”*काही लोकांची व्यवसायामध्ये इच्छाशक्ती वेगळी असते आणि ते वेगळेपणाने विचार करतात.अर्थातच आकलनीय बुद्धी ही माणसाला यशस्वी बनवते.इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे.”A quitter never wins _and a Winner never quit”*याचा अर्थ आहे की *यशस्वी व जिंकणारे लोक कधीही माघार घेत नाही आणि माघार घेणारे कधीही यशस्वी होत नाहीत.माझा जन्म ग्रामीण भागामध्ये झाला. आणि बालपणही गाव खेड्यामध्येच गेले. त्याकाळी माझ्या आजोबांचे पायतान म्हणजे खेटर …याची बांधणी पूर्णपणे कातड्याने बनवलेली असायची.बूट व चप्पल याची मधली आवृत्ती म्हणजे खेटर!!विशेष म्हणजे त्याचा पुढचा भाग थोडासा चौकोनी, सरळ व मागील निमुळता असे. त्याची बांधणी रुबाबदार,
काहीसी वेगळीच असे.
गावातील चांभाराचा कातड्याचे चप्पल, बूट बनवण्यामध्ये हातखंडा असायचा!! बाहेर गावचे लोक सुद्धा यासाठी येत असत. चांभाराकडे त्याकाळी जनावरांची कातडी, त्याचबरोबर त्यावर प्रक्रिया करण्यात येणारे साहित्य,मीठ,पाणी यांचे साठे असायचे. आणि ही सर्व प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक पद्धतीने केली जायची. आणि प्रत्यक्ष माप घेऊन पायानुसार पादत्राणे बनवले जायचे. ग्रामीण व्यवस्थेतील हे उत्कृष्ट उदाहरण होते.आमची आजी आम्हाला कधी कधी कोडं सांगायच्या…. मुलांनो *काळी गाय काटे खाय”* म्हणजे काय?? आम्हाला काहीच उत्तर देता येत नसायचे. पण त्याचं उत्तर म्हणजे *चप्पल.*!!
चप्पलेत काटे शिरतात म्हणून ती ‘काटे खाय’ असा उद्देश.पादत्राणे साठी खालील समानार्थी शब्द आहेत.खेटर/ चप्पल/ जोडा /पायताण /पायपोस /बूट/ वाहण.त्या अनुषंगाने मराठी मधे खालील म्हणी पडल्या
१”आपल्या खेटरावर माया: ती दुसऱ्याच्या पोरावर नाही.”
२”वडिलांचे खेटर घेऊन पळणारा” ( अवज्ञा करणारा)
३”माझं काय खेट्टर आडलंय?”
४”खेटर तुटो -जळो”
इ.अर्थात पादत्राणे याचा इतिहासही फार जुना आहे. संस्कृत भाषेत त्यास पादुका असे म्हटले जायचे. लाकडी तळवे म्हणजे पायाच्या बोटाला एक गाठ असे. वेगवेगळ्या धर्मातील संत महंत /भिक्षु हे वापरत असे. पादुकांची पूजा भक्तगण करत असत. त्यातूनच त्यांचे दर्शन घेणे, देव मानणे ही प्रथा सुरू झाली. रामायणामध्ये सुद्धा भरताने रामाच्या पादुका ठेवून रामच राज्य करत आहेत असा संदेश दिला..मानवी इतिहासात हजारो वर्षापासून माणसं पायाला कपडे, झाडाचा पाला, साल,लाकूड,ऊस,बांबू असल्या वस्तू बांधून आपल्या पायाचे संरक्षण करत असे..पुढे जनावराच्या कातडीपासून पादत्राणे बनवण्यास सुरुवात झाली मग त्यांची रचना बदलत गेली. युद्धामध्ये विशेष करून कातडी बुटांचा वापर होऊ लागला. त्यामुळे जगभर मागणी वाढत गेली.चर्मउद्योग व पादत्राणे उद्योग यास भरभराट आली.
१९४० च्या दशकात एक नवीन क्रांतीचा अध्याय रचला गेला. मानवनिर्मित प्लास्टिकचं मिश्रण असणारे, कापडाद्वारे बुट व चप्पल बनवण्यास सुरुवात झाली. *एकंदरीत पादत्राणाचं प्लास्टिक युग सुरू झालं.”*
खेळाला आणि व्यायामाला जसजसे प्राधान्य प्रसिद्धी आणि महत्त्व येऊ लागले… तसेच स्पोर्ट शूज ची ही मागणी वाढली. कोल्हापूर चपलेची कलाकुसर व गुणवत्ता यामुळे *कोल्हापुरी चप्पल* हा जगप्रसिद्ध ब्रँड झाला आहे.१९६४ साली लावणीच्या धरतीवर मराठी गीत रोशन सातारकर यांनी गायले होते ते भरपूर गाजले.. त्यामध्ये सुद्धा चप्पल सांधायचा उल्लेख
आहे.उन्हातानात चालण्याचं त्रास@दिल्या ती चपल्या सांधायला @.हो येऊ कशी,तशी मी नांदायला @.*
अनवाणी राहणे त्याचबरोबर पादत्राने काढून घरात व मंदिरामध्ये प्रवेश करणे एक आदरयुक्त भाव असतो.
एकमेकाचा आदर करण्यासाठी किंवा त्यागाचे प्रतिक म्हणून पादत्राणांचा त्याग करणारे माणसेही आहेत.जसे कपडे रुबाबदार असल्यामुळे व्यक्तिमत्व खुलतं .तसंच पादत्रानांमुळं सुद्धा व्यक्तिमत्व खुलण्यास मदत होते .परदेशात कपडे व इतर जीवणाश्यक वस्तू बरोबरच पादत्राणे यांचे सुद्धा मोठमोठे मॉल असतात.
फॅशन सुद्धा या व्यवसायामध्ये शिरलेली आहे.. वेगवेगळ्या प्रकारची.. चैनीची चप्पल/ बूट बनवणे हा मोठा व्यवसाय झालेला आहे .करोडो रुपयांच्या चप्पल व बुटांचे जोड सध्या उपलब्ध आहेत.
भौतिक सुखामध्ये अर्थात चैनीमध्ये सुद्धा पादत्राणांची भूमिका मानवी जीवनामध्ये वाढत आहे.
विश्वास बसणार नाही आणि खरंही वाटणार नाही !! पण जगातील “मुन स्टार शूज” या सर्वात महागड्या बुटाची किंमत १६४ कोटी रुपये आहे.
वडीलधाऱ्यांच्या; रुबाबदार व देखण्या कातडी बुटांचा कर्र कर्र आवाज काही औरच होता!! ही लहानपणीची आठवण येते..