प्रशिक्षक वर्षा बिरारी ज्योती पाटील यांनी ग्रामीण भागातील शंभर महिलांना दिले केक बनविण्याचे धडे

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
अमळनेर : ग्रामीण भागातील महिलांच्या स्वावलंबनासाठी व आर्थिक सक्षमीकरणासाठी आधार बहुउद्देशीय संस्था मार्फत राबविण्यात येणाऱ्या स्वामिनी प्रोजेक्ट अंतर्गत चार दिवसीय केक मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम अमळनेर येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमामध्ये अमळनेर व परिसरातील ग्रामीण भागातील 100 हुन अधिक महिला व किशोरवयीन मुलींनी सहभाग नोंदविला. महिलांनी आनंदी वातावरणात केवळ प्रशिक्षण घेतले नाही तर प्रत्यक्ष केक बनवून दाखवले आणि स्वतःचा आत्मविश्वासही दृढ केला. प्रशिक्षणाच्या तिसऱ्या दिवशी महिलांनी स्वतः विविध प्रकारचे केक तयार केले. या अनुभवामुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढला असून आम्ही घरी बसून केक मेकिंग व्यवसाय सुरू करू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहभागी महिलांनी सांगितले की अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे घर चालवण्यासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षणादरम्यान पायनॅपल, चॉकलेट, रसमलाई, स्ट्रॉबेरी, रेड रोज, व्हाईट फॉरेस्ट, ब्लॅक फॉरेस्ट, फ्रेश क्रीम, मावा केक, डॉल केक, ट्रिपल केक, जेली केक आदी अनेक प्रकारचे आकर्षक केक शिकविण्यात आले. महिलांना केक बनवण्याचे तंत्र, साहित्याचा योग्य वापर, सजावट, पॅकिंग व विक्रीसंदर्भात आवश्यक असे मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षक वर्षा बिरारी व ज्योती पाटील यांनी महिलांना सोप्या व प्रात्यक्षिक पद्धतीने मार्गदर्शन केले. ग्रामीण पार्श्वभूमीतील महिलांना समजेल अशा पद्धतीने प्रशिक्षण दिल्यामुळे महिलांना शिकणे सोपे झाले.
चार दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद झळकत होता. या उपक्रमातून ग्रामीण भागातील महिलांनी प्रेरणा घेतली असून आम्हीही काहीतरी करू शकतो असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. महिलांनी स्वावलंबनाचा संकल्प करत स्वतःचा लघुउद्योग सुरू करण्याची तयारी दर्शवली. आधार संस्थेचे अध्यक्ष भारती पाटील यांनी महिलांना मार्गदर्शन केले उमेद अभियानाच्या समन्वयीका सीमा रगडे व ज्योति भावसार यांचे देखील प्रशिक्षण दरम्यान मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट कॉर्डिनेटर मुरलीधर बिरारी, समन्वयक उर्जीता शिसोदे, अश्विनी भदाणे, आनंद पगारे, राकेश महाजन व दीपक विश्वेश्वर यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे आणि मार्गदर्शनामुळे ग्रामीण महिलांसाठी हा उपक्रम केवळ प्रशिक्षणापुरता मर्यादित न राहता त्यांना रोजगाराच्या दिशेने पुढे नेणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.