ताज्या घडामोडी

२१ सप्टेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिरात राज्यस्तरीय सांस्कृतिक मेळावा

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची लाभणार प्रमुख उपस्थिती
,
मुंबई (शांताराम गुडेकर)
महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान २०२४ यांच्या वतीने रविवार, २१ सप्टेंबर रोजी रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे भव्य महाराष्ट्र राज्यस्तरीय कलावंत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. देशाचे नेते, माजी संरक्षण व कृषी मंत्री, भारत सरकार माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे. महाराष्ट्रभरातून विविध कलाक्षेत्रातील नामवंत व नवोदित कलावंत, संगीतज्ञ, नर्तक, कलाकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर एकत्र येणार आहेत.सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय शरदचंद्रजी पवार, सौ. प्रतिभाताई पवार , कलावंतांच्या आधारस्तंभ सुप्रियाताई सुळे , शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, , युवा आमदार पवार, संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, अभिनेते किरण माने यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कलावंत मेळाव्यात कार्यक्रमात गणेश पूजन, सरस्वती पूजन आणि महामानव पूजन, महाराष्ट्रातील नामवंत कलावंतांचे सादरीकरण, भजन, गोंधळ, दशावतार, पोवाडे, लावणी, वाघ्या मुरळी, आदिवासी नृत्य, कोळीनृत्य यांसारखे रंगतदार कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शनपर व भाषण, संस्थेच्या कार्याचा आढावा आणि कलावंतांचा गौरव सोहळा होणार आहे. महाराष्ट्राची परंपरा आणि लोककला जपणे, कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नव्या पिढीला सांस्कृतिक वारसा समजावून सांगणे महाराष्ट्राच्या कलावंतांसाठी हा कार्यक्रम एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे. सर्व रसिक, कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक अध्यक्ष शरदचंद्र प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान,महाराष्ट्र राजाराम बुवा शेलार यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??