प्रभागसंघाच्या सभागृहासाठी निधी देणार: आमदार डॉ. सुरेश भाऊ खाडे

सांगली /प्रतिनिधी
आरग तालुका मिरज येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. मिरज पूर्व भागातील मोठा प्रभागसंघ असणाऱ्या या विभागात महिलांच्या बैठका व इतर कामांसाठी कार्यालय व सभागृहाची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित होती. ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या जागेवर बांधकामासाठी निधी मिळावा अशी मागणी महिलांची होती. तसे निवेदन मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ .सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे देण्यात आले. यावेळी आवश्यक तो निधी मंजूर करत असल्याचे व बारा गुंठे परिसर महिलांना द्यावा अशी ही ग्रामपंचायतीस सूचना दिली. यावेळी परिसरातील दीडशे महिला उपस्थित होत्या.
आरग तालुका मिरज येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेदच्या माध्यमातून महिला बचत गटांचे काम चालते. येथे तीन ग्रामसंग व एक प्रभाग संघ कार्यरत असून प्रभागसंघासाठी हॉल मिळावा अशी महिलांची मागणी होती. याकरिता आरग, शिंदेवाडी, खटाव येथून महिला बचत गटातील महिला या निवेदन देण्यासाठी सांगलीत आल्या होत्या. हे निवेदन स्वीकारून आवश्यक तो निधी वर्ग करत असल्याचे आमदार डॉ .सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले. महिलांच्या इतर सर्व समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगतानाच केवळ महिलांसाठी बारा गुंठे जमीन वर्ग करावी व तेथे ऑफिस हॉल व बागबगीच्या करण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी ज्यांनी मिरज पूर्व भागात महिला बचत गटांची मुहूर्तमेढ रोवली व हा प्रवास इथपर्यंत आणला त्या बँक सखी शशिकला गावडे यांच्या पुढाकाराने उपस्थित असणाऱ्या महिलांनी आमदारांचे आभार मानले. गावडे यांनी वर्ल्डव्हिजनच्या माध्यमातून सामाजिक काम करत असताना पंचायत समितीच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेदच्या माध्यमातून पहिल्या बचत गटाला सुरुवात केली होती. आता आरग केडरमध्ये सव्वाशे पेक्षा अधिक महिला बचत गट कार्यक्षम आहेत. पंचायत समितीचे पदाधिकारी व जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी, सहाय्यक यांच्या सहकार्याने कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली जाते. कितीतरी महिलांनी स्वतःचे गृहउद्योग, कुटीरोद्योग सुरू केले आहेत. शासनाच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हाभरातील केडरांच्या बरोबरीने इथले केडरही राबवत असते. याविषयी माहिती आमदारांना देण्यात आली.
यावेळी आरग प्रभागाच्या समन्वयक रेश्मा सातपुते,या केडरच्या प्रमुख शशिकला गावडे, अधिका बाबर, नंदिता खटावे, प्रतीक्षा नाईक, स्वप्नाली गायकवाड, मेघा पुजारी या केडर बरोबरच राजयोग संघाच्या अध्यक्ष शुभदा गुरव, कोषाध्यक्ष संगीता जत्राटे व पदाधिकारी, झलकारी ग्रामसंघाच्या पदाधिकारी, राजमाता जिजाऊ ग्राम संघाच्या पदाधिकारी, सावित्रीमाई फुले ग्राम संघाचे पदाधिकारी, सावित्रीबाई फुले ग्राम संघ खटावच्या पदाधिकारी, उमंग ग्रामसंघ शिंदेवाडीच्या पदाधिकारी यांच्याबरोबरच आरग ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्जेराव खटावे, अजित कांबळे, किरण पाटील, सागर वडगावे यांच्यासह तब्बल दीडशे महिला उपस्थित होत्या.