पलूस मधील शासकीय कार्यालयांची दयनीय अवस्था उघड — स्वच्छतेचा मृत्यू, दुर्गंधीचा सुळसुळाट.. ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ची स्वच्छतेची मागणी..

पलूस,(प्रतिनिधी)
पलूस येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, व नगरपरिषद कार्यालय यांसह अन्य शासकीय कार्यालयांची अवस्था अत्यंत दयनीय असून स्वच्छतेचा अभाव, तुटक्या सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाबत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन – पलूस तालुका शाखेने काल प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा पंचनामा केला.
शौचालयांची विदारक स्थिती
तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील सार्वजनिक मूत्रालयात पाण्याची सोय नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिक मूत्रालयाऐवजी शेजारील मोकळ्या जागेचा वापर करत आहेत. यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.कार्यालयातील महिला व पुरुष शौचालयांची अवस्था इतकी खराब आहे की, पाण्याअभावी त्यात घाण साचलेली आहे. एका महिला मूत्रालयात तर अडगळीचे साहित्य टाकून ती जागा बंद करण्यात आली आहे, ज्यामुळे महिला कर्मचाऱ्यांसमोर आरोग्याचा व प्रतिष्ठेचा प्रश्न उभा ठाकला आहे.न वापरल्या जाणाऱ्या सरकारी इमारतींची पडझडमा. पतंगराव कदम साहेब यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेले तहसीलदार व नायब तहसीलदारांचे निवासस्थान सध्या पूर्णपणे बंद असून वर्षानुवर्षे कोणताही अधिकारी त्या वास्तूत राहत नाही. परिणामी ती इमारत पडझडीत सापडली आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांना भाड्याच्या इमारतीत ठेवण्यासाठी सरकारी निधी खर्च केला जातो, ही बाब वेदनादायक आहे.
एटीएम सुविधा बंद
कार्यालय परिसरात शासनाच्या निधीतून बसवलेले पाण्याचे एटीएम बंद पडले असून, पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे ती सुविधा निष्प्रभ ठरली आहे.
स्वच्छ भारत मोहिमेची धज्जी
मोदी सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होतात, पण गावपातळीवरील कार्यालयांत शौचालय स्वच्छ ठेवणेही शक्य होत नसेल, तर हे अपयश कुणाचे?
संघटनेची मागणी — त्वरित दुरुस्ती करा!
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन – पलूस तालुका शाखेने प्रशासनाला निवेदन दिले असून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये तातडीने दुरुस्ती, स्वच्छता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने वेळेत लक्ष दिले नाही, तर ही परिस्थिती लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण होत आहे आणि त्यातून आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही.