गुरुवर्य कै. भ. का. देशपांडे यांची जयंती उत्साहात साजरी.

शिराळा प्रतिनिधी
शिराळा येथील तरूण मित्र मंडळ वाचनालय, शिराळा येथे माजी कार्यवाह गुरुवर्य कै. भ. का. देशपांडे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी वाचनालयाच्या संचालकांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.कै. देशपांडे यांनी वाचनालयाच्या बिकट परिस्थितीत त्याची जबाबदारी स्वीकारून २७ वर्षे त्याची निष्ठेने सेवा केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून त्यांनी वाचनालयाला नावलौकिक मिळवून दिला. त्यांच्या कार्यकाळातच वाचनालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने गौरवण्यात आले.जयंतीनिमित्त बाल वाचकांना मोफत पुस्तके वाटण्यात आली. वाचनालयाचे कोषाध्यक्ष दिनेश हसबनीस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, “आजचे बाल वाचक हेच उद्याचे वाचक आहेत. वाचनामुळे आयुष्य समृद्ध होते.” त्यांनी बाळकृष्ण हसबनीस, प्रसाद देशपांडे, मेघराज नरगुंद, शुभम हावळ अशा अनेक वाचकांची उदाहरणे दिली, ज्यांनी वाचनामुळे आपल्या आयुष्यात यश मिळवले.या कार्यक्रमाला श्री. मिरजकर, ए.डी. गायकवाड, श्री. अनगळ, श्री. नालबंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.