ताज्या घडामोडी

पत्रकाराला धमकी प्रकरणी मुरूम शहर पत्रकार संघाकडून पोलिसांना निवेदन

बातमीत नाव न दिल्याच्या कारणावरून पत्रकाराला अश्लील शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; पत्रकार स्वातंत्र्यावर थेट घाला….

मुरूम, ता. उमरगा,  ( प्रतिनिधी) :
मुरूम शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि अधिस्वीकृती धारक पत्रकार रामलिंग काशिनाथ पुराणे यांना बातमीत नाव न दिल्याच्या कारणावरून तुगाव (ता. उमरगा) येथील भालचंद्र अंकुश लोखंडे या व्यक्तीने अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपीविरोधात कडक कारवाईची मागणी करत मुरूम शहर पत्रकार संघाकडून शनिवारी (ता. २६) रोजी मुरूम पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेतील (आयपीसी) संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून तात्काळ अटकेची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, ता. २५ रोजी तुगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाची बातमी रामलिंग पुराने यांनी त्यांच्या डिजिटल माध्यमावर प्रसिद्ध केली होती. या बातमीत माझे नाव न आल्याने संतप्त झालेल्या भालचंद्र लोखंडे यांनी फोनवरून अश्लील भाषा वापरत पत्रकाराला जीवे मारण्याचा दम दिला, तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. पत्रकार संघटनेने याप्रकरणी चिंता व्यक्त करत म्हटलं आहे की, बातमी संकलन व प्रसारण हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानिक अधिकार असून, त्यावर अशा धमक्या म्हणजे थेट पत्रकारितेवरच हल्ला आहे. याशिवाय, संबंधित आरोपीचा राजकीय दबाव आणि पार्श्वभूमी लक्षात घेता, या प्रकाराकडे गंभीर दृष्टीने पाहण्याची आवश्यकता असल्याचंही संघटनेने स्पष्ट केलं आहे. सदर निवेदनावर मोहन जाधव, नाहीरपाशा मासुलदार, अजिंक्य मुरूमकर, रफिक पटेल, रवी अंबुसे, राजेंद्र कारभारी, इम्रान सय्यद, लखन भोंडवे, हुसेन नुरसे यांच्यासह अनेक पत्रकारांनी सह्या करून एकजूटीतून पत्रकारांच्या सुरक्षेचा आवाज बुलंद केला आहे. संघटनेने इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने या प्रकरणात तातडीने आणि ठोस पावले उचलली नाहीत, तर जिल्हास्तरीय तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील शहर पत्रकार संघाकडून पोलीस ठाण्यात निवेदन देताना पोलीस अधिकारी व पत्रकार बांधव.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??