पी.व्ही.पी. महाविद्यालयात संख्याशास्त्राचे अतिथी व्याख्यान

कवठेमहांकाळ : (दि. ७) प्रा. विजय कोष्टी याजकडून
येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील, महाविद्यालयामध्ये संख्याशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच बी. एस्सी. भाग-३ च्या विद्यार्थ्यांसाठी अतिथि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अतिथि व्याख्यानासाठी आजरा महाविद्यालय, आजरा येथील संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. किरण पोतदार उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. पोतदार यांनी विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यास त्यांना प्रशासकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात मनासारख्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील असे सांगून विद्यार्थ्यांनी आतापासूनच विविध विद्यापीठांच्या पात्रता परीक्षा तसेच प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेऊन आपले ध्येय निश्चित्त करावे असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी त्यांच्या आवडत्या स्टॅटिस्टिकल इन्फरन्स या विषयातील विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तरे देऊन इन्फरन्स सारखा कठीण भाग अगदी सोप्या पद्धतीने विविध उदाहरणे देऊन समजावून सांगितला. संख्याशास्त्र विषयाची व्याप्ती आणि विविध क्षेत्रातील वाढती उपयुक्तता विचारात घेता संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या प्रचंड संधी आहेत. तथापि, त्यांना त्यासाठी पदव्युत्तर शिक्षणासाठी मिळेल त्याठिकाणी प्रवेश घ्यावा लागेल. अतिथि व्याख्याना नंतर डॉ. पोतदार यांनी विद्यार्थ्यांना संख्याशास्त्रा मधील पदवीनंतर अनेक अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्यांना मिळत असणाऱ्या सुविधांचा योग्य वापर करून आपले भवितव्य उज्वल करावे अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य प्रा.(डॉ.) एम. के. पाटील यांनी सध्याचे दशक हे संख्याशास्त्राचे असून विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यास त्यांना चांगल्या नोकरीच्या संधी सहज मिळतील असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एस्सी. भाग-३ मधील विद्यार्थिनी कु. स्वरांजली कारंडे तर आभार प्रदर्शन प्रा. गणेश सातपुते यांनी केले. अतिथि व्याख्यात्यांचा परिचय प्रा. विजय कोष्टी यांनी करून दिला. अंतिथी व्याख्यानाचे नियोजन महाविद्यालयाच्या संख्याशास्त्र विभागातील डॉ. अण्णासाहेब सूर्यवंशी, प्रा. शीतल पाटील, प्रा. स्नेहल झरेकर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, सचिव सुदर्शन शिंदे आणि प्राचार्य डॉ. एम.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिथि व्याख्यान यशस्वीपणे संपन्न झाले.