महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या समरगीत / स्फुर्तीगीत स्पर्धा उत्साहात संपन्न

कोल्हापूर : (वार्ताहर)
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने ९ ऑगष्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून, गटस्तरीय समरगीत / स्फूर्तीगीत स्पर्धा शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापुर येथे उत्साहात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उदघाटन परीक्षक राजेंद्र राऊत, शुभम विभुते, शिला लोंढे पाटील, गुणवंत कामगार सर्जेराव हळदकर, सुरेश पोवार, कल्याण निरीक्षक संभाजी पवार व कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपास पाणी घालून पार पडले.
स्पर्धेमध्ये औद्योगीक कामगार व सहकार क्षेत्रातील कामगारांचे ०८ संघ सहभागी झाले. या स्पर्धेमध्ये कडे गर्जीले सह्याद्रीचे, कामगार तु कष्टकरी तु, चला उगवतीकडे सिंहगर्जना अशा विविध स्फूर्तीगीतांनी झाली.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे उमेश नेरकर (संगीत दिग्दर्शक), कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश केसरकर (अध्यक्ष- राज्य गुणवंत कामगार असोसिएशन), प्रमुख पाहुणे सुरेश पोवार (गुणवंत कामगार) तुकाराम जाधव (सिनी. बँक मॅनेजर कर्नाटका बँक), प्रमोद निकम (संचालक, डीडी इंटिग्रेटेड) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
पारितोषिक समारंभावेळी अध्यक्षीय भाषणात सुरेश केसरकर यांनी मंडळांच्या योजना व उपक्रम तसेच विविध कार्यक्रम हे सर्वसामान्य कामगार, कामगार कुटुंबिय व त्यांच्या पाल्यांची सर्वांगीण उन्नती व प्रगती साधणारे आहेत. ज्या घटकांपर्यंत या योजना व उपक्रम आजअखेर पोहोचलेले नाहीत, त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्याचबरोबर मंडळाच्यावतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमधून देशप्रेम, देशभक्ती व देशनिष्ठा वाढीस लागते असे सांगितले. प्रमुख पाहुणे उमेश नेरकर यांनी, गायन आणि संगीत या कला असून कामगारांनी या कलेची उपासना करून आपले ध्येय साध्य करावे व अशा कलात्मक कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त कामगारांनी सहभागी व्हावे. प्रसंगी मार्गदर्शनही करू असे सांगितले. परिक्षक शाहिर पुरुषोत्तम उर्फ राजेंद्र राऊत यांनी, महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या साक्षरता मोहिमेपासून ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यापर्यंत कोल्हापूरला कलानगरी म्हणून नावारूपाला आणले आणि त्या साक्षरतेतूनच उदयाला आलेल्या शाहिरी कलेला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या व्यासपीठावरून संधी दिली जाते, हे खूप विशेष आहे असे गोरवोद्गार काढले.
स्पर्धेमध्ये कामगार कल्याण भवन इचलकरंजीचा (जवाहर सहकारी साखर कारखाना) संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. ललित कला भवन राजारामपुरीचा (घाडगे पाटील इंडस्ट्रीज) संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. कामगार कल्याण केंद्र बिंदू चौकचा संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्यांना धनादेश, तसेच सहभागी सर्व संघांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली.
मंडळाचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी उपस्थित सर्वच पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी संजय सासने, भगवान माने, संजय गुरव, विजय आरेकर, सर्जेराव हळदकर आदी. गुणवंत कामगार, विविध संघटनांचे कामगार प्रतिनिधी, व्यवस्थापकिय अधिकारी व कामगार कर्मचारी आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विजय शिंगाडे (कामगार कल्याण अधिकारी) यांनी केले. सूत्रसंचालन सचिन आवळेकर यांनी केले तर आभार दिपक गांवराखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता संभाजी पवार, चंद्रकांत घारगे, दिवेश सोळंकी, सचिन खराडे, विजय खराडे, अशोक कौलगी, शोभा पोरे, लता कांबळे, सुजाता कलकुटकी, स्वाती वायचळ, अक्षया माने, सुचित्रा चव्हाण, श्वेतल सुतार आदीनी विशेष परिश्रम घेतले.