ताज्या घडामोडी

नव दुर्गा विशेष (माता सिद्धीदात्री) राणी इंदोरे/पवार,उद्योजिका

आयुष्य म्हटलं की संघर्ष हा असतोच! प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष करावा लागतो, मग तो जगण्यासाठी असो किंवा आनंदी राहण्यासाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात छोटी-मोठी संकट ही येत असतात, ज्यांचा सामना हा प्रत्येकाला करावा लागतो. अनेकदा प्रत्येकाला आपला स्वतःचा संघर्ष हा फार मोठा वाटत असतो. पण काही लोक असेही असतात जे आयुष्यात कितीही संकट आले तरी हार मानत नाही. प्रत्येक संकटाला ते जिद्दीने सामोरे जातात.

त्यातल्याच “राणीताई इंदोरे-पवार”! यांच्याशी नवदुर्गा विशेष २०२५ निमित्ताने रिता इंडिया फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी केलेली खास बातचीत.

तुमच्या विषयी सांगाल.
माझे नाव राणी इंदोरे/पवार. मी अपंगत्वावर मात करीत, यशस्वीरित्या चालवत आहे ऑनलाइन बिजनेस. मी मंचर, चांडोली येथे राहते. वयाच्या १० व्या वर्षी मी शेतातील बांध्यावरून पाय घसरून पडले आणि त्यामध्ये माझ्या पायातील जीवच कमी होत गेला. बऱ्याच डॉ.ना दाखवल्यानंतर डॉ. नि सांगितले तुम्हाला मस्क्युलर डिस्ट्रोफी आहे. तसे जन्मतःच हा प्रॉब्लेम थोड्या प्रमाणात होता पण पडल्या नंतर तो आजार वाढत गेला.. आई वडिलांनी बरेच प्रयत्न केले पण काहीही उपयोग झाला नाही. मला शिकण्याची खूप इच्छा होती. आई वडिलांनी माझ्या शिक्षणासाठी मला पाठिंबा दिला. मी एम ए पर्यंत शिक्षण केले. असे असतानाही मी घरातील सर्व काम करत होते. यातच माझ्या वडिलांनी माझे लग्न ठरविले. सासरकडचे सर्व एकदम चांगले मिळाले. इतका प्रॉब्लेम असतानाही सगळ्यांनी मला समजून घेतले आणि मीही सर्व काही काम माझे मीच करत होते. संसार उत्तम प्रकारे चालू होता.

असा एखादा अनुभव ज्यामध्ये तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिल्या.
लग्नानंतर सर्व काही उत्तम चालू होते जरी मला त्रास होत होता तरी मला त्रास जाणवत नव्हता कारण लग्नाच्या १ वर्षा नंतरच मला मुलगी झाली. ती झाली आणि जगण्याची उमेद निर्माण झाली. तिच्या येण्याने आमच्या आयुष्यात आणि घरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले. ती झाल्या नंतर माझ्या आईनेच तिला जास्त पाहिले कारण तिच्या जन्म नंतर माझा हा आजार जास्तच वाढत गेला. यामुळे जितके काम मी करत होते ते सर्व काम करणे कमी झाले. आई वडिलांनीच तिला अगदी आपल्या मुलीसारखे वाढविले तिला शाळेत टाकले ती पाचवीत असताना ती आजारी पडली आणि आम्हाला सोडून गेली. आम्ही तिच्या साठी खूप प्रयत्न केले पण शेवटी ती गेली. आयुष्यात एक आशेचा किरण होता तो हि गेला. एका मागून एक येत गेलेले हे आघात सहन करता येण्यासारखे नव्हते. मी पुनः पणे कोलमडून गेले. त्या काळात मी खूप टेन्शन मध्ये राहायची खूप शांत राहायची हे पाहून एक दिवस माझे वडील माझ्या कडे खूप रडले. तेव्हा मी ठरविले आज माझी मुलगी गेल्याने मला जसा त्रास होत आहे तसा माझ्या आई वडिलांना मी (त्यांच्या मुलगी) सतत दुःखी राहत असल्याने होत असेल. त्यावेळी मी ठरविले कि आता आई बाबांसाठी जगायचे आणि काही तरी करून दाखवायचे. मी स्वतःला सावरले आणि पुन्हा जगण्याची उभारी घेत स्वतःला खंबीर केले.

तुम्ही तुमच्या ऑनलाईन व्यवसायाला कशी सुरवात केली.?
जितका पाठिंबा माझ्या आई वडिलांचा होता तितकाच पाठिंबा माझा भाऊ आणि वहिनींचा होता. त्यांनतर माझ्या भावाने मला अँड्रॉइड मोबाइल घेऊन दिला. फेसबुक अकाउंट ओपन करून दिले जेणेकरून मी माझे मन इतर गोष्टीत घालवेल. एकदिवस असेच फेसबुक स्क्रोल करत असताना मला ऑनलाईन प्रॉडक्ट सेलिंग ची आयडिया मिळाली आणि मी ठरविले कि हा व्यवसाय सुरु करायचा ज्यामध्ये सर्वच वस्तू ग्राहकांना देता येईल. मग त्यामध्ये ज्वेलरी, साड्या , कॉस्मेटिक उत्पादने , बॅग्स असे बरच काही मी सेल करू लागले. मी इथेच थांबले नाही तर ‘जॉब सिकर होण्यापेक्षा जॉब क्रिएटर झाले.’ आज माझ्या अंडर बरेच रेसेल्ल्लर्स हि हा व्यवसाय करत आहे. आपल्याकडे काय नाही याचा विचार करत बसण्यापेक्षा काय आहे हे पाहणे आणि त्याचा उपयोग करणे महत्वाचे आहे. आज केवळ मी घराला हातभार लावते एवढेच नाही तर चांगल्या प्रकारे ग्राहकांचा आणि मला उत्पादने पुरवणाऱ्या व्हेंडरचा माझ्या यशा मागे हात आहे. उत्तम सेवा, गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि ग्राहकांशी उत्तम संवाद हि त्रिसूत्री मी सांभाळते आणि गेली ७ वर्ष झाले माझा हा व्यवसाय खूप चांगला चालू आहे. सोशियल मीडियाचा योग्य वापर केवळ तुम्हालाच घडवतो असे नाही तर इतरांनाही घडवत असतो.

असा एखादा प्रसंग जेव्हा तूम्हाला नव दुर्गेचे रूप घ्यावे लागले.

दुःखाला कवटाळत न बसता मी माझ्या व्यवसायातून खूप चांगली भरारी घेतली खूप चांगले चालू होते पण पुन्हा एकदा परमेश्वर माझी परीक्षा पाहत होता. कोविड १९ च्या काळात माझे वडील आणि त्यांचे २ भाऊ गेले. एकामागून एक असे आघात होत होते. वडिलांचे जाणे मला खूपच दुःखी करून गेले. पण पुन्हा विचार केला माझ्या वडिलांना मी दुःखी असेलली अजिबात आवडत नव्हते. तेव्हा पुन्हा ठरवले आपल्यालाच सर्वाना धीर हि द्यायचा आहे आणि एकमेकांना आधार हि द्यायचा आहे. यातून स्वतःला सावरत मी पुन्हा माझ्या व्यवसायाकडे लक्ष दिले. या व्यवसायाने केवळ मला जगण्याची प्रेरणा दिली असे नाही तर जगायचे कसे हे हि शिकवले. नव दुर्गेचे धैर्य, शांतता, संयम आणि सामर्थ्य या गुणांचा इथे मी वापर केला.आयुष्याकडे सकारात्मकतेने बघणारी ही ‘वाघीण’ आणि अपंगत्वावर मात करत स्वतःला सिद्ध करणारी हि ‘स्वयंसिद्धा’ इतरांना प्रेरणा देणारी अशीच आहे.

शब्दांकन
डॉ. रिता मदनलाल शेटीया
संस्थापिका रिता इंडिया फाउंडेशन

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??