सेवा निवृत्तीनंतरही अभ्यासाची ज्योत तेवत! कमलाकर मोटे यांना छत्रपती संभाजीनगर येथे राज्यपालांच्या हस्ते ‘डॉक्टरेट’ पदवी प्रदान

लातूर शहराच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहासावर केला शोधप्रबंध सादर
६७ व्या दीक्षांत समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गौरव
मुरूम, ता. उमरगा, ता. ५ (प्रतिनिधी) : इच्छाशक्ती आणि अभ्यासाची जिद्द असेल तर वयाची किंवा निवृत्तीची कोणतीही अट आड येत नाही, हे मुरूम येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तथा आष्टा (का.) येथील रहिवासी कमलाकर मोटे यांनी सिद्ध केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर च्या ६७ व्या दीक्षांत समारंभात त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती मा. जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते बुधवारी (ता. ४) रोजी ‘डॉक्टरेट’ (पीएच.डी.) पदवीने सन्मानित करण्यात आले.
या भव्य दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णु देव वर्मा होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल तंत्रज्ञान’ (ICT) चे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. बाबासाहेब डोळे, प्रा. डॉ. संजय कवडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. कमलाकर मोटे यांना ही पदवी बहाल करण्यात आली.
डॉ. कमलाकर मोटे यांनी “लातूर शहराचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास” या महत्त्वपूर्ण विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. हा संशोधन कार्य त्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील प्रा. डॉ. भीम माने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केला.
सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही स्वरूपाचा प्रत्यक्ष आर्थिक किंवा सेवाविषयक लाभ नसताना केवळ ज्ञानाची लालसा आणि संशोधनाची आवड म्हणून त्यांनी ही पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, नवनिर्वाचित पदवीधर आमदार प्रतापसिंह पाटील, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. व्यंकटेश लांब, इतिहास तज्ञ प्रा. डॉ. ओमशिवा लिगाडे (नळेगाव), रोटरीचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. गुणवंत जाधवर, गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत, प्रा.डाॅ.ओमप्रकाश चिलगर,प्रा.डाॅ.सुधीर पंचकले,प्राचार्य लंकेश्वर थोरात(कळंब),गणेश शिंदे(ज्ञानोपासक काॅलेज,परभणी),केंद्रप्रमुख बबिता महानूर, कंटेकूर शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्रामप्पा तडकले, अर्जुन धुळेकर यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, नातेवाईक आणि मित्र परिवाराने त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे. डॉ. मोटे यांचे हे यश शिक्षण क्षेत्रात व समाजमनात कौतुकाचा विषय ठरला असून नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



