ताज्या घडामोडी

लोकशाहीर अमर शेख : जनतेच्या काळजात रुजलेला, फुललेला बुलंद आवाज

जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात काही नावे अशी आहेत जी केवळ व्यक्ती उरत नाहीत, ती एक पर्व बनतात. लोकशाहीर अमर शेख हे असेच एक पर्व आहे. त्यांचे मूळ नाव मेहबूब हुसेन पटेल. २० ऑक्टोबर १९१६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका अत्यंत गरीब मुसलमान कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती. या निमित्ताने या महान लोकशाहिराला भावपूर्ण आदरांजली वाहताना त्यांच्या जीवनाचा, शाहिरीचा आणि विचारांचा धांडोळा घेणे हे आपले कर्तव्यच आहे.

अमर शेख यांची आई मुनेरबी. बुरखा पद्धतीत राहणारी, साधीभोळी गृहिणी. पण तिच्याकडे एक विलक्षण देणगी होती .ती स्वतः काव्य रचायची. तिला ‘दुसरी बहिणाबाई’ म्हटले जायचे. औपचारिक शिक्षण नसतानाही तिच्या ओव्या, तिची गाणी विद्वानांनाही लाजवतील अशी होती. त्या ओव्यांतूनच अमर शेख यांना मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा मिळाला. सोबत मिळाला निसर्गदत्त, पल्लेदार, पहाडी आवाज. जो आवाज पुढे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमणार होता.

पण गरिबीने त्यांची पाठ सोडली नाही. वडील हुसेन पटेल रेल्वेत तिकीट चेकर. पुढे आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि पालनपोषणाची सर्व जबाबदारी मुनेरबीवर आली. ती बार्शीच्या मंगळवार पेठेत भावाच्या आश्रयाला आली. अत्यंत हलाखीत तिने मुलाला वाढवले. शिक्षणाची आवड असूनही अमर शेख यांना सातवीपर्यंतच शिकता आले. पोटासाठी त्यांना वयाच्या अवघ्या १०-१२ व्या वर्षापासून काम करावे लागले. कधी बसच्या क्लीनर म्हणून, कधी ट्रकवर पाणक्या म्हणून, कधी बार्शीच्या राजन मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून. हीच कष्टाची कामे त्यांना जनतेच्या जवळ घेऊन गेली. गिरणीच्या धुराड्यात, ट्रकच्या चाकाखाली त्यांनी श्रमिकांचे, कष्टकऱ्यांचे जीवन जवळून पाहिले, अनुभवले.

राजन मिलमध्ये त्यावेळी आयटक या केंद्रीय कामगार संघटनेची शाखा होती. गेटसभा, मोर्चे, आंदोलने रोजच होत. त्या आंदोलनांनी अमर शेख भारावून गेले. ते कामगारांना संघटित करू लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना इंग्रज सरकारने विसापूरच्या तुरुंगात टाकले. हा तुरुंगवास त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

तुरुंगात त्यांची भेट झाली कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्याशी. त्या भेटीने मेहबूबचा अमर शेख झाला. ते कम्युनिस्ट विचारांनी भारावून गेले आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद झाले. तेथून सुटल्यावर पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते कोल्हापूरला आले. तेथे मास्टर विनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांच्या मित्रांनी त्यांचे नामकरण केले – ‘अमर शेख’. मेहबूब हुसेन पटेल हा आता कायमचा अमर शेख झाला. नावातच एक क्रांती होती – अमर असा जो शेख, जो हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होता.

१९३०-३२ च्या सुमारास ते राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. पुढे अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतसारा वाढीविरुद्ध त्यांनी बार्शीत २५ हजार शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढला. हा त्यांचा शेतकरी आणि कामगार यांच्याशी असलेल्या नाळेचा पहिला जाहीर आविष्कार होता.

अमर शेख यांच्या शाहिरीचा खरा सुवर्णकाळ म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. १९५६ ते १९६० हा काळ. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर द.ना. गव्हाणकर आणि अमर शेख – या त्रयीने लाल बावटा कला पथकाची स्थापना केली. इप्टा या डाव्या सांस्कृतिक चळवळीच्या प्रेरणेतून हे पथक उभे राहिले.

या पथकाचा उद्देश उपजीविका नव्हता, तर ध्येय होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. अमर शेख यांचा पहाडी आवाज, त्यांची धारदार गायकी, आणि अंगात आणणारा अभिनय – यामुळे सभा अक्षरशः पेटून उठायच्या. आचार्य अत्रे म्हणायचे, “अमर शेख म्हणजे धग, रग, धुंदी आणि बेहोशी यांची जिवंत बेरीज.”

त्यांची गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत. “माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली” – हे विरहगीत असले तरी त्यातून त्यांनी विस्थापित कामगाराचे दुःख मांडले. “शिवाजी महाराजांची पोवाडा” ज्यात त्यांनी शिवाजी महाराजांना ‘समाजवादी राजा’ म्हणून मांडले. शिवाजी हा केवळ हिंदू राजा नाही, तर रयतेचा, समतेचा राजा आहे, ही मांडणी त्या काळात क्रांतिकारी होती.

अमर शेख हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते. ते राष्ट्रीय शाहीर होते. गोवा मुक्ती आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९६२ च्या चीनी आणि १९६५ च्या पाकिस्तानी आक्रमणाच्या वेळी त्यांनी आपल्या शाहिरी कार्यक्रमातून लाखो रुपयांचा निधी गोळा करून संरक्षण निधीला दिला. ही देशभक्ती वरवरची नव्हती, ती त्यांच्या आंतरराष्ट्रीयतावादी, मानवतावादी विचारांतून आली होती.

स्वतः एक श्रमिक म्हणून त्यांनी सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न पाहिले. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये सगळे होते. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते.

अमर शेख हे केवळ गायक नव्हते, ते साहित्यिकही होते. ‘कलश’ (१९५८) आणि ‘धरतीमाता’ (१९६३) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह, ‘अमरगीत’ (१९५१) हा गीतसंग्रह आणि ‘पहिला बळी’ (१९५१) हे नाटक त्यांनी लिहिले. ‘कलश’ या काव्यसंग्रहाला आचार्य अत्रे यांनी ६० पानांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली होती, यावरूनच त्यांच्या साहित्याचे मोल लक्षात येते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर आणि उधमसिंग यांचे पोवाडे लिहिले, जे आजही शाहिरीचे मानदंड मानले जातात.

त्यांनी ‘प्रपंच’ आणि आचार्य अत्रे यांच्या ‘महात्मा ज्योतीबा फुले’ या राष्ट्रपती पदक विजेत्या चित्रपटात तसेच ‘झगडा’ या नाटकात प्रभावी भूमिका केल्या. ‘प्रपंच’ मधील देवा कुंभाराच्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषकही मिळाले होते.

वैयक्तिक आयुष्यात त्यांनी १९४७ साली ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो.

त्यांची कविता यमकप्रचुर, अंतर्लयीने नटलेली आणि रौद्र रसाचा आविष्कार घडवणारी होती. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या तरी त्यात विचारांचे थरारते चैतन्य होते. प्र. के. अत्रे, म. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने त्यांचा गौरव केला. अत्रे त्यांना ‘महाराष्ट्राचा मायकोव्स्की’ म्हणत. रशियन कवी मायकोव्स्की म्हणायचा, कवीला दोन गोष्टी लागतात – सामाजिक ऊर्मी आणि आपण कोणत्या वर्गाचे प्रतिनिधी आहोत याची जाणीव. या दोन्ही गोष्टी अमर शेख यांच्याकडे होत्या.

आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी पक्ष सोडला, पण मार्क्सवादावरची आणि मानवतेवरची त्यांची निष्ठा कधीच ढळली नाही.

२९ ऑगस्ट १९६९ रोजी इंदापूरजवळ एका भीषण मोटार अपघातात या महान शाहिराचे अकाली निधन झाले. महाराष्ट्र हळहळला. एक बुलंद आवाज कायमचा शांत झाला.

पण शाहीर मरत नाहीत. ते लोकांच्या ओठांवर जगतात. आज मुंबई विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख अध्यासन’ सुरू करण्यात आले आहे, जिथे लोककला, शाहिरी आणि तिच्या वारशावर संशोधन होते.

अमर शेख यांना सर्वात प्रिय असलेली पदवी होती ‘लोकशाहीर’; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनता-जनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यातल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रुजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली.

आज जेव्हा समाजात पुन्हा जातीय तेढ, धर्मांधता आणि विषमता वाढत आहे, तेव्हा मेहबूब हुसेन पटेल नावाच्या गरीब मुस्लिम पोराने ‘अमर शेख’ बनून दिलेला हिंदू-मुस्लिम ऐक्याचा, समतेचा आणि मानवतेचा संदेश अधिकच प्रासंगिक ठरतो. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना हीच खरी आदरांजली असेल की, आपण त्यांचा तो समतेचा, बंधुतेचा डफ पुन्हा खांद्यावर घेऊ.लोकशाहीर अमर शेख यांना भावपूर्ण आदरांजली…!!
प्रा. दिलीप आनंदराव जाधव
राज्य कोषाध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??