मनातली कोजागिरी

वआश्विन महिना संपत आला की हवा बदलते. पावसाचा ओलसरपणा जाऊन हवेत एक कोरडा, हवाहवासा गारवा येतो. भाताची कणसे पिवळी पडू लागतात, झेंडूची फुले अंगणभर फुलतात आणि रात्रीचे आकाश स्वच्छ होऊ लागते. अशा वेळी येते ती कोजागिरी पौर्णिमा.
कोजागिरी – को जागर्ति? कोण जागे आहे?पुराणकथा सांगते की या रात्री लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि विचारते – कोण जागे आहे? जो जागा असेल त्याला ती धन देते. म्हणून लोक रात्रभर जागे राहतात. पण याचा खरा अर्थ फार वेगळा आहे. ही जागृती डोळ्यांची नाही, तर मनाची आहे. कोणाचे मन जागे आहे, हे लक्ष्मी पाहते. आणि लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, तर समाधान, शांती आणि आपलेपणा.
आणि म्हणूनच या कोजागिरीच्या पार्श्वभूमीवर त्या ओळींचा अर्थ अधिक गहिरा होतो – आठवणींच्या मंद आचेवर मनाचे दूध आटवायला ठेवावे.कोजागिरीतले दूध आणि मनातले दूध .कोजागिरीच्या रात्री दूध आटवण्याची प्रथा का आहे? त्यामागे आयुर्वेद आहे, शास्त्र आहे. शरद ऋतूतील चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, त्याची किरणे सर्वात शीतल आणि अमृतमय असतात. या किरणांमध्ये दूध ठेवले की ते अमृत बनते. असे म्हणतात.
पण यामागे एक मानसशास्त्रही आहे. दूध आटवणे ही क्रिया मोठ्या आचेवर होऊ शकत नाही. दूध हे अत्यंत नाजूक आहे. मोठी आच दिली की ते उतू जाते, भांड्याबाहेर पडते, जळते. त्याला मंद आचच लागते. लाकडाच्या चुलीवर, किंवा अगदी बारीक गॅसवर तासभर ठेवले की ते हळूहळू घट्ट होते.
आपले मनही तसेच आहे. मन हेही दुधासारखेच नाजूक आहे. त्याला मोठ्या आचेवर म्हणजे सततचा ताण, स्पर्धा, द्वेष, मत्सर, सूड यांच्या आचेवर ठेवले की ते उतू जाते. नाती जळतात. माणसे दुरावतात. मागे उरतो फक्त करपट वास.
कोजागिरी आपल्याला शिकवते मंद आच. या धावपळीच्या जीवनात थोडी मंद आच हवी. संध्याकाळी दिवा लावल्यावर पाच मिनिटे निवांत बसणे, दिवसभरात घडलेल्या गोष्टी आठवणे, कोणाचा शब्द मनाला लागला, कोणाचा हसरा चेहरा मनात राहिला, हे आठवणे . हीच मंद आच. या मंद आचेवरच मनाचे दूध खरे आटते. इंस्टाग्रामच्या वेगाने नाही.
दुधात पाणी असते. ते दिसत नाही, पण असते. ते पाणी काढल्याशिवाय दूध घट्ट होत नाही, त्याला बासुंदीचा दर्जा येत नाही. आपल्या मनातही असेच पाणी असते. ते म्हणजे नकोश्या आठवणी.
कोणीतरी चारचौघात केलेला अपमान, एखाद्या जवळच्या माणसाने केलेला विश्वासघात, एखादे अपयश, एखादी न मिळालेली संधी – या आठवणी आपण दुधातल्या पाण्यासारख्या मनात घट्ट धरून ठेवतो.
कोजागिरीच्या रात्री काय करतात? तर दूध उघडे ठेवतात, जेणेकरून चांदणे त्यात पडेल. आणि चांदण्याच्या शीतलतेने त्या दुधातला जडपणा निघून जाईल. तसेच मनाचेही करावे लागते. मन उघडे ठेवावे लागते. या नकोश्या आठवणींना वाफ होऊन जाऊ द्यावे लागते.
वाफ होणे म्हणजे विसरून जाणे नव्हे. वाफ होणे म्हणजे क्षमा करणे. क्षमा म्हणजे दुसऱ्याला मोठे करणे नव्हे, तर स्वतःला त्या ओझ्यातून मुक्त करणे. जसे पाणी वाफ होऊन आकाशात जाते आणि पुन्हा निर्मळ पावसाच्या रूपाने खाली येते, तशा या आठवणींना जाऊ दिले की मन निर्मळ होते. कोजागिरीची रात्र हीच शिकवण देते .जे जड आहे, जे नकोसे आहे, ते वाफ होऊन जाऊ दे, आकाशाकडे सोडून दे.
दूध आटवताना त्यावर एक नाजूक पापुद्रा येतो ,साय. लहान मुलांना ती नको असते, पण जाणत्यांना माहित असते की खरी श्रीमंती त्या सायीतच आहे. ती साय म्हणजे दुधाचा आत्मा.
शरद ऋतू हा साईसारखाच आहे. वर्षा ऋतू हा मोठ्या आचेसारखा – गडगडाट, विजा, पूर. पण शरद ऋतू हा मंद आचेसारखा – शांत, स्वच्छ, प्रसन्न. आणि या शांततेतच संस्कारांची साय जमते.
आपल्या मनावरही हळूहळू एक साय जमलेली असते. आईने लहानपणी शिकवलेले – “अन्न वाया घालवू नये”, वडिलांनी सांगितलेले “कोणाचेही देणे लागू देऊ नये”, आजीने सांगितलेली एखादी बोधकथा, शाळेतील एखाद्या शिक्षकाने मारलेली प्रेमाची छडी हे सगळे संस्कार काळाच्या ओघात सायीसारखे मनावर जमलेले असतात.
धावपळीत आपण त्या सायीकडे पाहतही नाही. पण कोजागिरी सारख्या शांत रात्री, जेव्हा सगळे दिवे लागतात, जेव्हा आकाश निरभ्र असते, तेव्हा ती साय विरघळू लागते. आणि ती विरघळली की मन श्रीमंत होते. ज्या मनावर सायच नाही, ते मन कितीही मोठ्या बंगल्यात राहिले तरी दरिद्रीच राहते.आता दूध घट्ट झाले. साय विरघळली. पण तरीही त्याला बासुंदी म्हणता येणार नाही. त्याला सुगंध येण्यासाठी त्यात काहीतरी घालावे लागेल.
कोजागिरी ही एकत्र येण्याची रात्र आहे. पूर्वी या रात्री गावातले सगळे लोक एकत्र येत, एका मोठ्या पातेल्यात दूध आटवत आणि गप्पा मारत बसत. वेलची छोटी असते, पण तिचा सुगंध आसमंतात पसरतो. नातीही तशीच असावीत. शंभर व्हॉट्सअॅप ग्रुपपेक्षा दोन-तीन खरी माणसे जवळ असावी. ती वेलचीसारखी तोंडात टाकल्यावर तिचा स्वाद शेवटपर्यंत राहतो. या रात्री अशा नात्यांची आठवण काढावी. एखाद्या जुन्या मित्राला फोन करावा. आई-वडिलांच्या जवळ बसावे. हीच वेलची.
केशर हे जगातील सर्वात महाग आहे. चिमूटभर केशरासाठी शेकडो फुले लागतात. आणि चिमूटभर केशरही अख्ख्या पातेल्याचारंग बदलून टाकते. आपुलकीही तशीच आहे. ती बाजारात मिळत नाही. ती फक्त मनापासून देता येते. “कसा आहेस?” असे वरवर विचारण्यापेक्षा, “तू ठीक नाहीस हे मला जाणवतेय” असे म्हणणे, हे केशर आहे. आजच्या काळात आपल्याकडे सगळे आहे – पैसा, गाडी, मोबाईल – पण आपुलकीचे केशर कमी पडले आहे. कोजागिरीच्या रात्री हे केशर पुन्हा शोधावे लागेल. कोणाच्या तरी पाठीवर हात ठेवावा लागेल.
आणि शेवटी वात्सल्याची साखर गरजेपुरती.
कोजागिरीच्या दुधात साखर जास्त झाली तर ते बिघडते. ते गोड लागत नाही, उबट लागते. जीवनातही प्रेम, माया, वात्सल्य हवे, पण गरजेपुरते. अती लाड, अती अपेक्षा, अती चिकटपणा याने नाती गोड होत नाहीत, तर कडू होतात. मुलावर प्रेम करावे, पण त्याला त्याच्या चुका कळू द्याव्यात. मित्रावर प्रेम करावे, पण त्याला त्याची स्पेस द्यावी. हीच गरजेपुरती साखर. ही साखर म्हणजे समतोल. ही साखर म्हणजे निरपेक्ष प्रेम.
ही साखर घातली की मनाला ऋणानुबंधाचा रंग चढतो. ऋणानुबंध म्हणजे काय? तर या जन्मापुरते नाही, तर अनेक जन्मांचे नाते. काही माणसे आपल्याला पहिल्यांदाच भेटतात, पण वाटते – यांना आपण युगांपासून ओळखतो. हाच तो रंग. तो रंग एका रात्रीत चढत नाही. तो अशा मंद आचेवर आटवलेल्या मनालाच चढतो. तेव्हा मनातली कोजागिरी साजरी झालीच म्हणून समजा.आणि मग शेवटचा क्षण येतो. मनभर आपलेपणा पसरतो. जसा बासुंदीचा सुगंध घरभर पसरतो, तसा आपलेपणा मनभर पसरतो. आणि त्या आपलेपणाला जेव्हा चांदण्याचा स्पर्श होतो.
कोजागिरीचे चांदणे हे साधे चांदणे नसते. ते शरदाचे चांदणे असते. त्यात शीतलता असते, प्रसन्नता असते, पावित्र्य असते. त्या चांदण्यात उष्णता नाही, दाह नाही. त्या चांदण्यात फक्त शांती आहे.
जेव्हा आपल्या मनातल्या आपलेपणाला अशा शांततेचा, समाधानाचा स्पर्श होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने कोजागिरी साजरी होते.
बाहेरची कोजागिरी तर सगळेच साजरी करतात. पातेल्यात दूध आटवतात, त्यात बदाम-पिस्ते टाकतात, चंद्राकडे पाहतात आणि फोटो काढून स्टेटसला टाकतात. पण खरी कोजागिरी बाहेर नाही, आत आहे.
बाहेर कितीही सुंदर चंद्र असला, आणि आत मनात द्वेष, मत्सर, राग, अपमान यांचा अंधार असेल, तर ती कोजागिरी कसली?
खरी कोजागिरी तेव्हा होते, जेव्हा मनातला अंधार संपतो. जेव्हा नकोश्या आठवणींचे पाणी वाफ होऊन जाते. जेव्हा संस्कारांची साय विरघळते. जेव्हा नात्यांची वेलची आणि आपुलकीचे केशर मनात दरवळते.
या कोजागिरीला आपण बाहेरचे दूध तर आटवूच, पण एका रात्री स्वतःसाठी वेळ काढून मनाचे दूधही मंद आचेवर ठेवूया. बघा, चंद्र तिथेच आहे, बाहेरही आणि आतही. फक्त त्याचा स्पर्श होण्याची वाट पाहत आहे.
*प्रा.दिलीप आनंदराव जाधव*
*सचिव*
*सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.*



