ताज्या घडामोडी

पदरातलं सुख-दु:खाचं आभाळ

स्त्री म्हणजे नेमकं काय?
हा प्रश्न सोपा वाटतो, पण याचे उत्तर इतके खोल आहे की त्यात कित्येक जन्म बुडून जातील. फक्त नऊवारी साडी नेसलेली, कपाळावर कुंकू लावलेली आणि हातात हिरव्या बांगड्या घातलेली एक सुंदर मूर्ती नाही, स्त्री म्हणजे एका संपूर्ण घराचा श्वास, नात्यांचा आधार आणि संकटांच्या वादळातही न डगमगणारी एक अद्भुत शक्ती.

आपण तिला पाहतो, पण तिला बघत नाही. आपण तिचे रूप पाहतो, पण तिचे मन पाहत नाही. आपल्याला तिची नऊवारी दिसते, पण त्या नऊवारीच्या पदराआड लपलेले आभाळ दिसत नाही.

नऊवारी साडी नेसून मिरवणं सोपं असतं, पण त्या साडीच्या पदरात किती दुःखं लपवावी लागतात, हे फक्त ती साडी नेसणाऱ्या स्त्रीलाच माहीत असतं. लोक म्हणतात, “काय सुरेख दिसतेस!” पण त्या कौतुकामागे किती रात्रजाग आहे, किती अश्रू आहेत, हे कोणालाच ठाऊक नसते.

तिच्या कपाळावरची टिकली सुंदर दिसते, पण त्या टिकलीमागे संसाराची काळजी असते. उद्या घरात काय शिजणार, मुलाची फी कशी भरणार, सासूचे औषध संपले आहे, नवऱ्याच्या चेहऱ्यावर काल काळजी का होती – या सगळ्या विचारांची गर्दी त्या छोट्याशा टिकलीमागे दडलेली असते.

तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र नात्याची खूण असतं, पण त्या नात्याला शेवटपर्यंत जपण्यासाठी तिने किती तडजोडी केल्या, याची साक्ष फक्त तिचं मन देऊ शकतं. मंगळसूत्राचे दोन मणी जसे एका धाग्यात गुंफलेले असतात, तशी तिने कित्येक नाती एका धाग्यात गुंफलेली असतात. तो धागा तुटू नये म्हणून ती रोज स्वतःलाच गाठ मारत असते.

तिच्या हातातल्या हिरव्या बांगड्या खणखणतात, तेव्हा घर भरल्यासारखे वाटते. पण त्या बांगड्यांच्या नादामागे तिच्या हातांची किती दुखणी दडलेली असतात, हे तिच्या हातांनाच माहीत. सकाळी पाच वाजता उठलेले हात रात्री अकरा वाजेपर्यंत थांबत नाहीत. कधी स्वयंपाक, कधी धुणी-भांडी, कधी मुलांचा अभ्यास, कधी पाहुणचार. ते हात थकतात, पण थांबत नाहीत.

लग्नाआधीची ती मुलगी आणि लग्नानंतरची ती स्त्री यांच्यात किती मोठा प्रवास दडलेला असतो, याची कल्पना फक्त स्त्रीच करू शकते.

माहेरच्या अंगणात मनसोक्त हसणारी, आईच्या कुशीत डोकं ठेवून रडणारी, वडिलांकडे हट्ट करणारी ती मुलगी – तिच्या जगात किती मोकळेपणा असतो. तिला भूक लागली की आई वाढते, तिला कंटाळा आला की मैत्रिणींकडे जाते, तिला रडावेसे वाटले की वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवते.

आणि एक दिवस तीच मुलगी दुसऱ्याच्या घराची ‘लक्ष्मी’ बनते. किती मोठा शब्द – लक्ष्मी. पण त्या शब्दामागे किती मोठी किंमत असते. नवीन माणसं, नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या आणि अपेक्षांचं मोठं ओझं घेऊन ती संसारात पाऊल ठेवते.

तिचे नाव बदलते, तिचे आडनाव बदलते, तिचे घर बदलते, तिची माणसे बदलतात. फक्त तिचे मन तेच राहते .प्रेम करणारे, जपणारे. पण त्या मनाला आता नव्या घराच्या आकारात बसवावे लागते.

कधी सासूच्या मनात जागा निर्माण करायची असते. सासूच्या हातची चव शिकायची असते, तिच्या सवयी समजून घ्यायच्या असतात. कधी नवऱ्याच्या अडचणी समजून घ्यायच्या असतात. तो बाहेरून हसून येतो, पण आतून थकलेला असतो, हे तिलाच कळते. तर कधी मुलांच्या भविष्याची चिंता करत स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवायची असतात.

तिला चित्रकलेची आवड होती, पण मुलांच्या परीक्षेमुळे ब्रश बाजूला पडतो. तिला नोकरी करायची होती, पण घरासाठी ती थांबते. तिला फिरायला जायचे होते, पण सासऱ्यांच्या आजारपणामुळे ती घरातच राहते. घरात सगळ्यांच्या आवडी जपताना स्वतःच्या आवडीनिवडी कधी हरवून जातात, हे तिलाही कळत नाही.

ती हरवते, पण तक्रार करत नाही. कारण तिला शिकवलेलं असतं – “संसार म्हणजे त्याग”.

घरात पैसा कमी पडला की ती स्वतःच्या इच्छा मारते. दिवाळीत सगळ्यांना नवे कपडे घेते आणि स्वतःसाठी जुन्याच साडीवर समाधान मानते. मुलांच्या शिक्षणासाठी स्वतःच्या आवडीच्या वस्तू घेणं टाळते. नवऱ्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसली की स्वतःच्या डोळ्यांतलं दुःख लपवून त्याला धीर देते. “काळजी करू नका, सगळं ठीक होईल”, असे ती म्हणते, पण तिच्या मनातली भीती ती कोणालाच दाखवत नाही.

घरात सगळे जेवून झाले की कधी कधी स्वतःच्या ताटात काय उरलंय, हे पाहून ती समाधान मानते. उरलेली भाजी, थोडा भात – त्यातही ती आनंद शोधते. आईने शिकवलं होतं, अन्न वाया घालवू नये.

पण गंमत बघा ना, तिच्या या त्यागाला अनेकदा तिचं कर्तव्य समजलं जातं, प्रेम नाही.

“ती करते, कारण तिने करायलाच हवे”, ही भावना घरात रुजते. तिच्या प्रेमाला कर्तव्याचे लेबल लागते. आणि कर्तव्याला कुणी सलाम करत नाही, त्याला गृहीत धरले जाते.

ती दिवसभर काम करते, तेव्हा कुणाला तिचा थकवा दिसत नाही. तिचे पाय दुखतात, तिची पाठ अवघडते, पण ती सांगत नाही. कारण सांगून काय होणार? “सगळ्यांनाच थकायला होतं”, हेच उत्तर मिळणार.

ती शांत राहते, तेव्हा कुणाला तिच्या मनातलं वादळ ऐकू येत नाही. तिला बोलायचं असतं, पण ऐकायला वेळ कोणाकडे आहे? सगळे आपापल्या मोबाईलमध्ये, आपापल्या कामात.

ती हसते, तेव्हा सगळ्यांना वाटतं की ती आनंदी आहे; पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती अश्रू सुकले आहेत, हे विचारण्याची फुरसत कोणाला असते? तिचे हसू हे तिचे कवच असते. त्या कवचाआड ती तिचे दुःख लपवते, जेणेकरून घराचे हसू टिकून राहील.

खरं तर प्रत्येक स्त्रीच्या मनात एक न बोललेली कहाणी असते. काही कहाण्यांना शब्द मिळतात, काहींना अश्रूंची वाट मिळते, तर काही कहाण्या आयुष्यभर तिच्या काळजातच गाडल्या जातात.

कधी ती तिच्या मैत्रिणीला सांगते, कधी डायरीत लिहिते, कधी देवासमोर रडते. पण बऱ्याचदा ती काहीच सांगत नाही. ती फक्त जगते. रोज. शांतपणे.

तिच्या त्या मौनात एक मोठी ताकद असते. ते मौन कमजोरीचे नाही, ते सहनशीलतेचे आहे. पण त्या सहनशीलतेला मर्यादा असतात, हे आपण विसरतो.

आणि म्हणूनच, एखादी स्त्री नऊवारी साडी नेसून उभी असते, तेव्हा तिच्याकडे केवळ सौंदर्य म्हणून पाहू नका. त्या साडीच्या प्रत्येक घडीत तिच्या संस्कारांचा सुगंध आहे, तिच्या आईने दिलेल्या शिकवणीची ऊब आहे, तिच्या संसारासाठी केलेल्या त्यागाची आठवण आहे आणि कितीही संकटं आली तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद आहे.

नऊवारी ही फक्त नऊ वार कापड नाही, ती नऊ रूपे आहेत स्त्रीची – मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई, सासू, आजी, मैत्रीण आणि शेवटी ती स्वतः.
कारण घराला घरपण देणारी स्त्री जेव्हा मनातून खचते, तेव्हा घराच्या भिंती उभ्या राहतात; पण त्या घरातला आनंद हरवू लागतो.

घर म्हणजे काय? चार भिंती आणि छप्पर? नाही. घर म्हणजे सकाळी चहाचा वास, संध्याकाळी दिव्याची वात, मुलांच्या हसण्याचा आवाज आणि जेवणाच्या ताटाभोवतीची माया. हे सगळं कोण निर्माण करते? तीच. ती नसेल तर घर हे फक्त इमारत होते.

म्हणून तिचे मन जपणे म्हणजे घर जपणे आहे. तिचे हसू जपणे म्हणजे घराचा आनंद जपणे आहे.

म्हणून आपल्या आयुष्यातील आई, बहीण, पत्नी, मुलगी किंवा कोणत्याही स्त्रीकडे पाहताना तिच्या सौंदर्यापेक्षा तिच्या मनाचा आदर करा. तिच्या कपड्यांपेक्षा तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करा. तिच्या चुका मोजण्याआधी तिने तुमच्यासाठी केलेल्या हजारो गोष्टी आठवा.

तिने केलेल्या चुका मोजायला एक हात पुरतो, पण तिने केलेले उपकार मोजायला दोन्ही हात कमी पडतील.

तिला विचारा “तू थकलीस का?” ,तिला विचारा “तुला काय हवंय?,” तिला विचारा “तुझं स्वप्न काय आहे?” हे प्रश्न तिला रडवतील, पण त्या अश्रूंमध्ये तिला समजून घेतल्याचा आनंद असेल.

शेवटी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा… नऊवारी साडी नेसलेली स्त्री सुंदर दिसते म्हणून ती खास नसते; तर त्या साडीच्या पदरात संपूर्ण कुटुंबाचं सुख जपण्याची ताकद असते म्हणून ती महान असते!

तिच्या चेहऱ्यावरचं हसू जपा, तिच्या मनातल्या भावना समजून घ्या आणि तिच्या स्वप्नांना तुमच्या प्रेमाचा आधार द्या. कारण संसार फक्त एका स्त्रीच्या त्यागावर चालू नये; तो स्त्री-पुरुषांच्या समान प्रेमाने, विश्वासाने आणि सन्मानाने फुलावा.

स्त्रीचा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही, तर संपूर्ण समाजाच्या संस्कारांचा आरसा आहे. ज्या समाजात स्त्री हसते, तो समाज प्रगत होतो. ज्या घरात स्त्रीचा आदर होतो, त्या घरात देवता नांदतात. हे आपल्या शास्त्रांनी सांगितले आहे, पण आपण विसरलो आहोत.

नवरात्रात आपण देवीची पूजा करतो. पण खरी पूजा तेव्हाच होईल, जेव्हा घरातल्या जिवंत देवीचा सन्मान करू. तिच्या पदरात फक्त दुःख न ठेवता, तिच्या पदरात थोडा आनंद, थोडा आदर आणि थोडे प्रेम ठेवूया.
प्रा. दिलीप आनंदराव जाधव
सांगली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??