सेंद्रिय शेतीला पूरक नाविन्यपूर्ण व्यवसाय गांडूळखत निर्मिती सौ. सुषमा संभाजी पाटील

कोल्हापूर – भारत हा कृषिप्रधान देश असून देशातील बहुसंख्य लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे. परंतु मागील काही वर्षांत रासायनिक खतांचा वाढता वापर, जमिनीची घटती सुपीकता, उत्पादन खर्चात वाढ आणि मानवाच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्वभूमीवर गांडूळखत निर्मिती हा सेंद्रिय शेतीला पूरक, कमी खर्चात सुरू होणारा आणि चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय ठरत आहे.असे सामाजिक कार्यकर्त्या सुषमा पाटील यांनी सांगितले त्या यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने शाहुवाडी शेतकरी संवाद या आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, जिल्हा संपर्क प्रमुख सुनील शेळके, शाहुवाडी तालुका अध्यक्ष सुभाष वगरे शाहूवाडी तालुका संपर्क प्रमुख दत्तात्रय मुडळे, उपाध्यक्ष दादासो गावडे युवक अध्यक्ष संजय डफडे इत्यादी उपस्थित होते.
त्या बोलताना पुढे म्हणाल्या गांडूळखत हे नैसर्गिक पद्धतीने तयार होणारे सेंद्रिय खत आहे. शेण, पालापाचोळा, पिकांचे अवशेष यांसारख्या सेंद्रिय पदार्थांपासून गांडुळांच्या साहाय्याने हे खत तयार केले जाते. या खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सुधारते आणि पिकांची वाढ चांगली होते.
गांडूळखत युनिट उभारण्यासाठी फार मोठ्या जागेची किंवा खर्चाची आवश्यकता नसते. आधुनिक पद्धतीने ४ बाय १२ आकाराचा बेड छोट्या सावलीच्या जागेत सहज तयार करता येतो. एका बेडसाठी सुमारे ₹३००० खर्च येतो. सुरुवातीला ३ किलो गांडूळ कल्चर लागते, ज्याची किंमत अंदाजे ₹१०५० असते. आवश्यक कच्चामाल जसे शेण आणि पालापाचोळा हे शेतात सहज उपलब्ध होत असल्यामुळे उत्पादन खर्च कमी राहतो.
एका बेडमधून तीन महिन्यांत सुमारे ९०० ते १००० किलो गांडूळखत तयार होते. हे खत ₹१० प्रति किलो दराने विकले, तरी सुमारे ₹१०,००० उत्पन्न मिळते. याशिवाय गांडूळ कल्चर ८ ते १० पट वाढते आणि ते स्वतंत्रपणे विक्री करून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येते. तसेच वर्मीवॉशसारखे द्रवरूप खतही तयार होते, ज्याला बाजारात मोठी मागणी आहे.
मी गेली तीन वर्षे गांडूळखत युनिट चालवत आहे. सुरुवातीला स्वतःच्या शेतात कांदा व लसूण पिकांसाठी गांडूळखत वापरले. त्यानंतर शेजारील गावांतील शेतकऱ्यांना खत विकण्यास सुरुवात केली. त्या वेळी सेंद्रिय शेतीबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढत असल्याचे लक्षात आले. विशेषतः कोरोना काळानंतर लोक विषमुक्त अन्नधान्याला अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत.
माझे सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण केव्हीके कांचनपूर, कनेरी मठ, हैदराबाद आणि एन.आय.पी.एच. येथे झाले. या प्रशिक्षणातून प्रेरणा घेऊन मी सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर गावातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा विचार मनात आला.
उमेद अभियानांतर्गत आर.एस.पी.आय. ट्रेनिंग सेंटर, मिरज येथे गावातील ४० महिलांना गांडूळखत निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर “भुजननी गांडूळखत महिला उत्पादक गट” स्थापन करण्यात आला. या गटाच्या माध्यमातून २० बेडचे मोठे युनिट उभारण्यात आले आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.
या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी मदत झाली. दीड वर्षांच्या कालावधीत घेतलेल्या कर्जाची मोठी रक्कम परत करण्यात आली आणि प्रत्येक महिलेला बोनसही देण्यात आला. यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला आणि सेंद्रिय शेतीबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.
सुरुवातीला अनेक लोक गांडूळखताबद्दल शंका व्यक्त करत होते. “शेणखताला कोणी विचारत नाही, मग गांडूळखत कोण घेणार?” असेही बोलले जात होते. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. अनेक शेतकरी गांडूळखताचे महत्त्व समजू लागले आहेत. उत्पादनात वाढ, जमिनीची सुधारलेली गुणवत्ता आणि विषमुक्त शेती यामुळे गांडूळखताची मागणी सातत्याने वाढत आहे.
गांडूळखतामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश यांसारखी आवश्यक अन्नद्रव्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध होतात. जमिनीचा पीएच संतुलित राहतो आणि दीर्घकाळ जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्यामुळे भविष्यात सेंद्रिय खतांना आणि विशेषतः गांडूळखताला अधिक मागणी वाढणार आहे.
आजच्या काळात शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पूरक व्यवसायाचा विचार करणे आवश्यक आहे. गांडूळखत निर्मिती हा कमी खर्चात सुरू होणारा, पर्यावरणपूरक आणि चांगले उत्पन्न देणारा व्यवसाय आहे. विशेषतः महिलांसाठी हा स्वयंरोजगाराचा प्रभावी मार्ग ठरू शकतो.
सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि विषमुक्त अन्नधान्य निर्मिती यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने गांडूळखताचा वापर वाढवणे ही काळाची गरज आहे. सेंद्रिय शेतीसाठी हा माझा छोटासा खारीचा वाटा आहे.
कार्यक्रमास पदाधिकारी व शेतकरी मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते..



