ताज्या घडामोडी

आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धे’त दोन्ही रेल्वे संघांचा दबदबा!

परळच्या लाल मैदानावर रंगणार ‘सेंट्रल रेल्वे विरुद्ध वेस्टर्न रेल्वे’ महामुकाबला
उपांत्य फेरीत थरार, वेग आणि रणनीतीची आतषबाजी
रेल्वे संघांची दमदार अंतिम फेरीत धडक

मुंबई : परळच्या ऐतिहासिक लाल मैदानावर सुरू असलेल्या ‘पहिली व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धा २०२६’ मध्ये आता अंतिम विजेतेपदासाठी रेल्वेचा महासंग्राम रंगणार आहे! मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) स्पोर्ट्स क्लब आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. चुरशीच्या लढती, दमदार संरक्षण, अचूक रणनीती आणि शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला थरार यामुळे लाल मैदानावरील वातावरण भारावून गेले. अखेर सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.

सेंट्रल रेल्वेचा दमदार डाव; रचना नोटरी वर्क्सची झुंज अपुरी
पहिल्या उपांत्य फेरीत सेंट्रल रेल्वेने रचना नोटरी वर्क्सचा ११-१० (मध्यंतर १०-६) असा ७.५० मि. राखून थरारक पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत सेंट्रल रेल्वेने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. विजयी संघाकडून शुभम थोरात (१.५०, १.४० मि. संरक्षण व १ गुण), अवधूत पाटील (२.५० मि. संरक्षण), रामजी कश्यप (१.५० मि. संरक्षण व ३ गुण), निखिल बी. (२.१० मि. संरक्षण व १ गुण) आणि मिलिंद चावरेकर (२.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी शानदार खेळ करत संघाचा विजय निश्चित केला. तर पराभूत रचना नोटरी वर्क्सकडून प्रथमेश दुर्गावले (१ मि. संरक्षण व २ गुण), सदाशिव पालव (१ मि. संरक्षण), ओमकार मिरगळ (१.३० मि. संरक्षण), रुपेश कोंढाळकर (१.१० मि. संरक्षण व ३ गुण) आणि यश बोरकर (१.२० मि. संरक्षण व १ गुण) यांनी कडवी झुंज दिली, मात्र अंतिम फेरीचे स्वप्न अधुरेच राहिले.

वेस्टर्न रेल्वेची विजयी मुसंडी; महाराष्ट्र पोस्टचा निसटता पराभव
दुसऱ्या उपांत्य फेरीत वेस्टर्न रेल्वेने महाराष्ट्र पोस्टचा ८-९ (मध्यंतर ४-९) असा १ डाव राखून १ गुणाने धुव्वा उडवत अंतिम फेरीत शानदार प्रवेश केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच वेस्टर्न रेल्वेने अचूक डावपेच आणि मजबूत संरक्षणाच्या जोरावर सामन्यावर वर्चस्व राखले. विजयी संघाकडून राहुल मंडल (२.५०, १.३० मि. संरक्षण व १ गुण), महेश शिंदे (१.५०, २.१० मि. संरक्षण), अभय रत्नाकर (२ गुण), वृषभ वाघ (३ गुण), आदित्य गणपुले (२.१०, २.३० मि. संरक्षण), निखिल सोडिये (नाबाद १.२० मि. संरक्षण व १ गुण) आणि विजय शिंदे (२.४० मि. संरक्षण व १ गुण) यांनी अप्रतिम खेळाची झलक दाखवत संघाला विजय मिळवून दिला. तर पराभूत महाराष्ट्र पोस्टकडून तांबे (१ मि. संरक्षण), धीरज भावे (१.४० मि. संरक्षण), प्रतीक देव्हारे (३ गुण), आकाश साळवे (१.२० मि. संरक्षण व १ गुण) आणि शुभम शिंदे (१.५० मि. संरक्षण व १ गुण) यांनी आटोकाट प्रयत्न केले, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही.

अंतिम फेरीकडे संपूर्ण खो-खो विश्वाचे लक्ष
आता या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सेंट्रल रेल्वे आणि वेस्टर्न रेल्वे यांच्यात विजेतेपदासाठी जबरदस्त संघर्ष रंगणार असून, परळच्या लाल मैदानावर पुन्हा एकदा वेग, चपळाई आणि रणनीतीचा अद्भुत संगम पाहायला मिळणार आहे. खो-खो प्रेमींमध्ये अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धा २०२६’चा किताब कोण पटकावणार याकडे संपूर्ण क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??