मुलांच्या प्रतिक्षेत रानमेवा

अशोक जाधव, चिंचोली.
मे महिना म्हणजे बालगोपाळांचा शालेय सुट्टीचा महिना… छान आनंदाने बागडायचा… लाडक्या मित्रांन सोबत मस्त हिंडत, नदीमध्ये मनसोक्त पोहायचा… मनमुराद रानमेवा खायचा… नातेवाईकांच्या अस्सल गावरान मेजवानीचा आस्वाद घ्यायचा… असा हा मे महिना म्हणजे जीवन शिक्षणाची अनुभूती देणारा… पुस्तकी ज्ञानापेक्षा धाडस, धैर्य, सर्जनशीलता शिकवणारा….
डोंगरदऱ्यातील चडउतारातून तोल सावरत, जाळवंडातून अंग चोरून, काट्याकुट्यांचा रस्ता सावधपणे तुडवत, तर कधी ढुंगणावरती बसून घस्टत पुढे सरकत… मेणचट हिरवीगार पानं आणि टोकदार दणकट काट्यांमध्ये लपलेली काळीभोर करवंदे शोधून खायची गंमत काही न्यारीच… गोड चवीच्या करवंदाचा रस शोषून बिया थुंकून टाकायच्या तर कधी त्या चावून खायच्या…
आंबट करवंदाचा चावा घेताच डोळे आपोआप बारीक होवून, तोंडाचा चंबू व्हायचा… वाऱ्याने कपडे फडफडावी तशी मान नको नको करायची…आणि बंदुकीतून गोळी सुटावी तसं ते करवंद तोंडातून जीभ बाहेर फेकायची…
कधी एक एक करवंद खायच तर कधी करवंदाचा घसच्या घस तोंडात कोंबून चावल्याने ऊसाच्या घाण्यातून रस निघावा तसा करवंदांचा रस जिभेच्या मोटेतून… घश्याच्या पाटातून सरळ पोटात…
काही वेळा दोन्ही पायाच्या तर काही वेळा एका पायाच्या चौड्यावरती उभे राहून, संपूर्ण शरीर रबरासारखे ताणून जाळीच्या शेंड्याकडील करवंद काढण्यासाठी कसरत करावी लागायची… कधी पुढे तर कधी बाजूला वलकांबून करवंद काढताना काटे बोचण्याचे, टोचण्याचे काम सर्कशीतल्या रिंगमास्टरसारखे इमानेइतबारे करायचे आणि तोल सावरण्याची जाणीव करून द्यायचे. या सगळ्या कसरती करत सोबत असलेल्या आपल्या भावंडांना, मित्रांना करवंद खायला घालायची आणि स्वतःही खायची. हा वाटून खायचा निस्वार्थ जिव्हाळा म्हणजे मेच्या कडक उन्हात काळ्या कातळातून निर्झर पाझरावा तसा असायचा…. शबरीने प्रेमाने रामाला बोरं खाऊ घालावी अन् सुदाम्याचे पोहे मोठ्या आनंदाने कृष्णाने खावे तसा हा स्नेहाचा ओलावा एकमेकांच्या ह्रदयात असायचा…
सहकार्य, आदर, बंधुभाव या भावना विकसित करणारी मूल्य अंगी झिरपली जायची परंतु आता शाळेतून मूल्यशिक्षणाचे संस्कार दिले तरीही ते अंगी रुजले जात नाहीत हे दुर्दैवी आहे. कारण अंगी असलेल्या उत्तम गुणापेक्षा प्रश्नपत्रिकेतील उत्तराच्या लांबी रुंदीवरुन गुणवत्ता ठरवण्याकडे अधिक भर दिला जातो त्यामुळे खरे जीवन जगण्यात गडबड होत आहे.
करवंद खाऊन तृप्त झाले की घरच्यांना पण करवंद घेऊन जाण्यासाठी पळसाची पान तोडून त्याचा द्रोण करायचा. तो करण्यासाठी आधी गवताची कठीण काडी शोधायची…वळवाचा पाऊस पडून गेला असेल तर गवताची काडी दिसायला कडक पण मऊ पडलेली असायची त्यामुळे त्याचा उपयोग व्हायचा नाही. मग करवंदीचा लांबसडक परंतु बारीक काटा किंवा कठीण काटकीचा वापर करून द्रोण तयार करायचा त्यामध्ये मग आंबटगोड चवीची पिकलेली,अर्धी पिकलेली करवंद भरायची आणि घरी आणायची. घरी आल्यानंतरही भावंडे, मित्रांसोबत एक करवंद हातात घेऊन ओळखा पाहू कोंबडा की कोंबडी ? हा खेळ सुरू व्हायचा. ते करवंद आर्धे खाऊन दाखवायचे त्या करवंदाचा गर लाल असेल तर कोंबडा आणि पांढरा गर निघाला तर कोंबडी. ही या खेळातील गम्मत असायची. बरोबर उत्तर देणाऱ्याला एक-दोन करवंदाचे बक्षीस द्यायचे अशा या खेळातून, द्रोण तयार करण्यातून मुलांच्या अंगी सर्जनशीलता रुजली जायची. नवनिर्मिती करण्याची क्षमता निर्माण व्हायची.
मे महिना म्हणजे रानमेव्याची जणू पर्वणीच असते… माणसांच्या कोणत्याही देखभालीशिवाय, नैसर्गिकरित्या पिकणारी करवंद, जांभळं, आळू, तोरणं असा आरोग्यदायी, आंबटगोड अवीट चवीचा रानमेवा डोंगरदऱ्यांमधून भटकंती करीत तो शोधून खाण्याची मजा काही औरच… परंतु सध्याच्या फास्ट फूडच्या जमान्यात अनेक मुलांना मोबाईलवरती रील्स पाहात, गादीवर लोळत पिझ्झा बर्गर, चायनीज पदार्थ खाण्याची चटक लागल्याने मे महिन्याच्या सुट्टीची मज्जा न लुटता रुक्षपणे घालवत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
अशा लेकरांना डोंगरदऱ्या मधील रानमेवा जणू आर्जव करत आहे. या रे या मुलांनो फुलपाखरांसारखं बागडत या… आमची मुबलकता पाहून आनंदाने खूश व्हा… अन् मोठमोठ्याने ओरडा, नाचा… आणि आमच्या आंबटगोड चवीचा पुरेपूर आस्वाद घ्या…
तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आम्हाला खाऊन घ्या… आणि निरोगी रहा…
आज्जी-आजोबांच्या अंगाखांद्यावर जसे आपुलकीने खेळता तसे निसर्गासोबतही खेळा…
या मुलांनो या… डोंगरदऱ्या पालथ्या घालत या… स्वछंदी फिरत… स्वच्छ हवा घेत शरीरयष्टी मजबूत करा…
तंत्रज्ञानाच्या युगात भावनिक परिपक्वता आणि माणुसकीही टिकवून ठेवा….या लेकरांनो या… जणू असच काहीसं मुलांच्या प्रतिक्षेत असलेला रानमेवा, डोंगरदऱ्या काकुळतीला येऊन म्हणत असल्याचा भास होत आहे.



