समतेचे प्रणेते : महात्मा बसवेश्वर

क्रांतिसूर्य, समतानायक, जगतज्योती महात्मा बसवेश्वर हे महामानव जन्माला आले. त्यांच्या महान विचाराची आजही सर्वांनाच गरज आहे. कारण या महामानवाने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनतेच्या हितासाठी, अस्पृश्यता निवारण्यासाठी, स्त्री पुरुष समानतेसाठी, आयुष्यभर धर्मांध समाजाच्या विरोधात लढा दिला. महात्मा बसवेश्वर (१२ वे शतक) हे कर्नाटकातील एक महान समाजसुधारक, वीरशैव लिंगायत धर्माचे संस्थापक, कवी आणि समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी बाराव्या शतकात जातीभेद, अस्पृश्यता आणि स्त्री-पुरुष असमानतेविरुद्ध लढा देत, ‘अनुभव मंटप’ (पहिली संसद) स्थापन करून लोकशाही व सामाजिक समतेचा पाया रचला. बसवेश्वरांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी इ.स. ११०५ साली एका ब्राह्मण कुटुंबात झाला. वडिलांचे नाव मादीराज आणि आईचे नाव मादलांबिका होते . लहानपणापासूनच त्यांनी उपनयन संस्कार नाकारून जातीभेदाचा विरोध केला. त्यांनी कूडलसंगम येथे शिक्षण घेतले आणि निराकार शिवभक्तीचा (लिंगायत धर्म) पुरस्कार केला.महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि कार्य :
सामाजिक समता: महात्मा बसवेश्वरांचे मुख्य विचार सामाजिक समतेवर आधारित आहेत. त्यांनी १२ व्या शतकात जातीभेद, अस्पृश्यता, आणि स्त्री-पुरुष असमानतेविरुद्ध लढा देत अनुभव मंटपाच्या माध्यमातून समतावादी समाजाची पायाभरणी करून लिंगायत धर्माद्वारे मानवी समानतेचा पुरस्कार केला.
कायक वे कैलास: श्रम हीच पूजा काम करणे ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती ईश्वराची आराधना (पूजा) मानली पाहिजे.कायका प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि शारीरिक कष्ट करून केलेले कार्य म्हणजे ‘कायक.कैलास कामात मग्न राहणे म्हणजे कैलास मिळवणे, म्हणजेच कामातूनच मोक्ष मिळतो. कामाची प्रतिष्ठा सर्व प्रकारच्या कामांना (शारीरिक व बौद्धिक) समान मान आणि प्रतिष्ठा दिली गेली पाहिजे, कोणताही व्यवसाय कनिष्ठ नसतो.
लिंग समानता: स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने सामाजिक व आध्यात्मिक अधिकार मिळवून दिले. बसवेश्वरांनी स्त्री आणि पुरुष यांच्यात आत्मिकदृष्ट्या कोणताही भेदभाव मानला नाही. ‘शिव’ भक्तीमध्ये दोघेही समान आहेत, हा विचार त्यांनी रुजवला. १२ व्या शतकात स्थापन केलेल्या जगातील पहिल्या संसद ‘अनुभव मंटप’ मध्ये त्यांनी अक्का महादेवी, नीलाम्बिका यांसारख्या अनेक महिलांना स्थान देऊन त्यांना विचारांचे स्वातंत्र्य दिले. बसवेश्वरांनी स्वतःच्या पत्नीव्यतिरिक्त इतर सर्व स्त्रियांना माता किंवा बहीण म्हणून सन्मान देण्याची शिकवण दिली, ज्यामुळे समाजात स्त्रियांना आदराचे स्थान मिळाले.
त्यांनी बालविवाह, सती प्रथा यांसारख्या स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रूढींना कडाडून विरोध केला आणि पुनर्विवाहाला पाठिंबा दिला.
अंधश्रद्धा निर्मूलन: बसवेश्वरांनी बाह्य पूजा, जत्रा, बळी प्रथा आणि अंधश्रद्धा पूर्णपणे नाकारल्या. त्यांनी “जुने जाऊ द्या मरणालागुनी” असे म्हणत जुन्या रुढी-परंपरा जाळून टाकण्याचे आवाहन केले. केवळ अंधभक्ती न करता, कार्यकारणभाव आणि अनुभवावर आधारित विचारांना त्यांनी महत्त्व दिले. अंधश्रद्धेपेक्षा नैतिक आचरण (सदाचार) श्रेष्ठ मानले. खोटे बोलू नका, हिंसा करू नका, चोरी करू नका, असे सांगून माणसाने स्वतःला शुद्ध करावे असे सांगितले.
जगातील पहिली संसद : त्यांनी ‘अनुभव मंटप’ या जगातील पहिल्या संसद सदृश संस्थेची स्थापना करून, लिंग, जात आणि वर्णाचे भेदभाव मोडून काढले. अनुभव मंटपला जगातील पहिली संसद म्हणून ओळखले जाते, कारण येथे लोकशाहीची मूल्ये – जसे की मुक्त भाषण, समान प्रतिनिधित्व, आणि सामूहिक निर्णय प्रक्रिया – प्रत्यक्षात आणली गेली होती, जी आजच्या संसदेसारखीच आहे.अनुभव मंटपमध्ये अक्का महादेवींसारख्या महिला संतांना पुरुषांच्या बरोबरीने वैचारिक व्यासपीठ देऊन त्यांनी स्त्री-सक्षमीकरणाचा पाया रचला.
आंतरजातीय विवाह: बसवेश्वरांनी बाराव्या शतकात, शाहू-फुले-आंबेडकरांच्या खूप आधी, समतावादी समाजाच्या निर्मितीसाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले.त्यांनी मागास जातीतील संत हरळय्या यांचा मुलगा शीलवंत आणि सवर्ण (ब्राह्मण) मंत्री मधुरस यांची कन्या कलावती यांचा विवाह लावून दिला. आंतरजातीय विवाह घडवून आणून तत्कालीन रूढीवादी समाजात मोठी क्रांती केली होती.
लिंगायत धर्माची स्थापना: बसवेश्वरांनी वेदशास्त्र, यज्ञ, कर्मकांड, पशूबळी, आणि जातीव्यवस्थेला कडाडून विरोध केला . त्यांनी तत्कालीन सामाजिक शोषण थांबवण्यासाठी, शिव-शरण परंपरेचा पाया रचून ‘लिंगायत’ हा स्वतंत्र धर्म स्थापन केला.
महात्मा बसवेश्वर हे केवळ धर्मगुरू नव्हते, तर ते क्रांतिकारक समाजसुधारक , होते म्हणून ‘क्रांतिकारी’ आणि ‘समतेचे जनक’ म्हटले जाते.
त्यांनी १२ व्या शतकात लोकशाही, समता आणि श्रमाची प्रतिष्ठा या तत्त्वांवर आधारित समाज घडवला. त्यांचे हे विचार आजच्या तरुणांना व समाजाला दीपस्तंभ ठरणार आहेत. त्यांच्या विचाराची गरज आजही आहे. अशा या सिद्ध पुरुषास विनम्र अभिवादन.
अभ्यासक :- सुयश सुभाष हुलपल्ले मुरूम, ता. उमरगा जि.धाराशिव मोबाईल नं. 8788409795



