ताज्या घडामोडी

शिक्षक हा समाज परिवर्तनाचा शिल्पकार – प्रमोद पाटील

डॉ. होमी भाभा विद्यालयाचे शिक्षक रमेश गिरासे यांचा सेवापूर्ती सत्कार उत्साहात

बोईसर : शिक्षक हा समाज परिवर्तनाचा खरा शिल्पकार असून आपल्या ज्ञान, संस्कार आणि समर्पित कार्यातून तो समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत असतो, असे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील यांनी केले.

बोईसर येथील डॉ. होमी भाभा विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक रमेश गिरासे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. बोईसर येथील टिमा हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास विविध शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुशक्ती मराठी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनय थत्ते होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पण भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांची समाजाला नितांत गरज असल्याचे सांगितले. शिक्षकाच्या यशस्वी सेवाकार्यात कुटुंबाचा, विशेषतः पत्नीचा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित आणि आनंदी होण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रमोद पाटील यांनी रमेश गिरासे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, इंग्रजीसारखा अवघड विषय विद्यार्थ्यांना सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजावून सांगणे तसेच विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक बनणे ही मोठी किमया आहे. गिरासे यांनी अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत मॉडरेटर म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा सत्कार होत असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे यांनी रमेश गिरासे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक केले. त्यांच्या लोकसंपर्क कौशल्याचा उपयोग भविष्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्काराला उत्तर देताना रमेश गिरासे यांनी आपल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. संस्थेने आणि शाळेने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. सहल प्रमुख म्हणून तब्बल ३५ शैक्षणिक सहलींचे यशस्वी आयोजन केल्याचा उल्लेख त्यांनी केला. भविष्यात सामाजिक कार्यासोबतच सार्वजनिक जीवनातही सक्रिय राहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी रमेश गिरासे यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरव करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??