ताज्या घडामोडी

करिअर घडविण्यासाठी अभ्यासासोबत संस्कारांची आवश्यकता – डॉ. गीतेश पाध्ये

जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानतर्फे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

जय हिंद जनजागृती प्रतिष्ठानच्या वतीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या सफाळे परिसरातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. देवभूमी सभागृह, सफाळे (पूर्व) येथे आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉ. गीतेश पाध्ये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, करिअर घडविण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे तर संस्कार, कौशल्ये आणि खेळ यांचाही महत्त्वाचा वाटा असतो. दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध असून आपल्या आवडीनुसार योग्य दिशा निवडणे आवश्यक आहे. आई-वडिलांकडून मिळणारे संस्कार हे यशस्वी आयुष्याचा भक्कम पाया ठरतात, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाध्यक्ष जयवंत राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यास भविष्यात सुजाण आणि जबाबदार नागरिक घडतील, असे ते म्हणाले.

शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी यशासाठी माध्यम हा अडथळा ठरत नाही, असे सांगितले. इयत्ता दहावी ही केवळ सुरुवात असून ध्येय साध्य करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संस्थापक अध्यक्ष जयवंत राऊत व कार्याध्यक्षा भाग्यश्री गोंधळेकर यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे व इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे हा होता. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालघर जिल्हाध्यक्ष कुंदन राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पालक प्रतिनिधी जतिन कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यश्री गोंधळेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रिती राऊत यांनी तर आभार प्रदर्शन महेंद्र पाटील यांनी केले.

यावेळी प्रत्येक शाळेतील पहिले तीन अशा ४१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??