ताज्या घडामोडी

वैभव सूर्यवंशीचा आदर्श घ्या; खो-खोमध्येही मोठी कामगिरी करा..५२व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार दिलीप माने यांचे खेळाडूंना प्रेरणादायी आवाहन;
राज्य स्पर्धांसाठी ‘रॉयल्टी’ रद्द करण्याची प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांची घोषणा

सोलापूर, दि. ३ जून : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कुमार आणि मुली गटातील खो-खोपटूंनी क्रिकेटमधील युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी साकारावी, असे प्रेरणादायी आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले. कमी वयात सातत्य, मेहनत आणि दर्जेदार कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे खो-खो खेळाडूंनीही जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा उंचावावा, असे त्यांनी सांगितले.

भव्य वातावरणात स्पर्धेचे उद्घाटन
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन आणि किरण स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२व्या कुमार व मुली राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे उद्घाटन नेहरूनगर येथील शासकीय मैदानावरील स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडा नगरीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे होते. प्रारंभी अलकाताई राठोड, नागेश बिराजदार, मोहन रजपूत आणि शिवशंकर राठोड यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

‘खेळाडू शपथ पाळतात, आम्ही राजकारणी नाही!’
कार्यक्रमात सोलापूरची राष्ट्रीय खो-खोपटू स्नेहा लामकाने हिने उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ दिली. या शपथविधीचा संदर्भ घेताना दिलीप माने यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवणारे, पण तितकेच वास्तववादी विधान केले. “खेळाडू नेहमी प्रामाणिकपणे घेतलेल्या शपथेचे पालन करतात आणि खेळाडूवृत्ती जपतात; मात्र आम्ही राजकारणी लोक त्याप्रमाणे आचरण करत नाही,” अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

राज्य स्पर्धांसाठी ‘रॉयल्टी’ कायमची बंद
यावेळी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. महाराष्ट्र खो-खो संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ यापुढे राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनासाठी कोणत्याही जिल्हा संघटनेकडून किंवा आयोजक संस्थेकडून ‘रॉयल्टी’ आकारली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. तसेच या स्पर्धेतून निवडले जाणारे महाराष्ट्राचे कुमार व मुली संघ हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत राज्याचा गौरव वाढवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती
या उद्घाटन सोहळ्याला गोविंद शर्मा, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पवन पाटील, डॉ. प्रशांत इनामदार, सचिन चव्हाण, डॉ. बापूसाहेब अडसूळ, अश्विनी चव्हाण, डॉ. अरुण मनगोळी, महेश गादेकर, श्रीकांत ढेपे, अजितकुमार संगवे, सुनील चव्हाण, श्रीरंग बनसोडे, उमाकांत गायकवाड, राजाराम शितोळे, अजित शिंदे आणि संतोष कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य अंबादास पांढरे यांनी प्रास्ताविक केले, सचिन मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रीकृष्ण कोळी यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??