ताज्या घडामोडी

शून्यातून विश्व निर्माण करणारे ध्येयवादी व्यक्तिमत्व म्हणजे अस्लमभाई सय्यद

फुलाला फुल जोडले की फुलाची फुलमाळ बनते.
दिव्याला दिवा जोडला की दिव्याची दीपमाळ होते.
माणसाला माणूस जोडला की माणुसकीचे सुंदर नाते तयार होते. त्याप्रमाणे माणसाला माणूस जोडून माणुसकीचे सुंदर नाते तयार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे अस्लमभाई सय्यद होय.

विशेष प्रतिनिधी.. प्रा. महेश मोटे

प्रसिद्ध विचारवंत लीवो टॉलस्टॉय असे म्हणतात की, जर आपणाला वेदना जाणवत असतील तर आपण जिवंत आहोत आणि जर आपणाला दुसऱ्यांच्या वेदना जाणवत असतील तर आपण माणूस आहोत, अश्या प्रकारे दुसऱ्यांच्या वेदना जाणणारा माणुसकीचा झरा म्हणजे अस्लमभाई सय्यद आहेत. शिक्षण आणि यश या दोन गोष्टी भिन्न आहेत. शिकलेला माणूस यशस्वी होतोच असे नाही आणि यशस्वी झालेला माणूस शिकलेला असतोच असंही काही नाही. अत्यंत शांत, संयमी, नम्र, मनमिळावू स्वभाव, साधी राहणी व उच्च विचार असलेले अस्लम यांच्या वाट्याला शिक्षण मात्र अगदी नाममात्र आले. त्यांचा लोहारा तालुक्यातील माकणी या ठिकाणी सन १९८२ साली जन्म झाला. कौटुंबिक परिस्थिती बेताची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी कुटुंबाला तारेवरची कसरत करावी लागत असे म्हणून लहानपणापासूनच कोणत्याही कामाला कमी न समजता हातात पडतील ती विविध प्रकारची कामे करावी लागली. परिस्थितीने इयत्ता पाचवीच्या वर्गात असताना शाळा अर्धवट सोडावी लागली. गल्लोगल्ली फिरून पाव विकणे, बांगडी विकणे, विविध गावाचे बाजार, विविध गावाच्या यात्रा-जत्रा या ठिकाणी जावून चार पैसे पदरात पडावे, यासाठी आटोकाट प्रयत्न केला. कोथिंबरीचा व्यापार केला. लोहारा येथे चप्पल विक्रीचा व्यवसाय असे विविध व्यवसाय मन लावून प्रामाणिकपणाने केले पण नीतिमत्ता मात्र कधी ढळू दिली नाही. कधीकाळी पत्र्याच्या शेडमध्ये झोपणारे अस्लमभाई आज उंच इमारतींच्या सावलीत स्वतःच्या स्वप्नांचा महाल उभा करत आहेत. घर म्हणजे भिंती नाहीत, ती माणसाची प्रतिष्ठा आहे. आज लोक त्यांना बिल्डर म्हणून ओळखतात पण ते स्वतःला विटांचा शिल्पकार मानतात. त्या विटांमधून त्यांनी स्वप्नांची इमारत उभी केली. ज्या जमिनीवर त्यांनी पहिल्यांदा विटा उचलल्या, तिथे आज त्यांचा स्वतःचा व्यवसाय उभा केला. त्यांनी फक्त इमारती नव्हे, तर आशेचे विश्व उभे केले आहे. गरीबी, अपमान व थकव्यातही त्यांनी भविष्याच्या आराखड्याची कल्पना बांधली. त्यांनी अनेक इमारती बांधल्या पण त्याचवेळी लोकांच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांचे विश्व म्हणजे मेहनत, विश्वास आणि दृष्टी यांचा सुरेख संगम होय. ते पैसे कमवण्यासाठी काम करत नाहीत, तर शून्यातून शक्यता निर्माण करण्यासाठी काम करतात. त्यांची दूरदृष्टी, संघर्षप्रियता, करुणामयता, आत्मविश्वास या जोरावर त्यांनी कुणाकडूनही मदत न घेता, स्वतःच्या कष्टांनी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले. असाही एक काळ होता पन्नास, शंभर रुपये हातात आले की आनंद गगनात मावत नव्हता पण आज त्यांची करोडो रुपयांची उलाढाल आहे. आजच्या घडीला रियल इस्टेट क्षेत्रातील क्लासिक डेव्हलपर्स हे नाव एक ब्रँड बनून देशातच नव्हे तर विदेशातही पोहचले आहे. सध्या त्यांचे हात जरी आकाशाला टेकले असले तरी पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवून ठेवण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना दिली आहे. रियल इस्टेट म्हणजे प्लॉट खरेदी-विक्री व्यवसाय लोहारा पासून सुरुवात झालेला हा व्यवसाय आज महाराष्ट्राच्या विविध भागात व विदेशात पोहचला आहे. स्वतः आपल्या पायावर उभारून अनेकांच्या हाताला काम देण्यात ते यशस्वी झाले. अनेकांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. ईश्र्वरावर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे. परमेश्वराच्या परवानगीशिवाय आपण काहीच करू शकत नाही यावर त्यांच्या अढळ विश्वास आहे. त्यामुळे कितीही संकटे आली तरी माणसाने नीतीमत्तेनेच काम करावे, यावर त्यांच्या भर असतो म्हणून आपल्या आयुष्यातला काही वेळ ते जाणीवपूर्वक धर्म प्रसारासाठी व प्रबोधनासाठी देतात. स्वता सोसलेली गरिबी, भोगलेली यातना व दुःख याची जाणीव ठेवून ते सतत गरजवंताला मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक कुटुंबाला मोठा आधार दिला, मदत केली आहे. आरोग्य, पर्यावरण पूरक कार्य ते सतत करतात. गोरगरीब, होतकरू व गुणवंत विद्यार्थ्याना शालेय स्वरूपाची मदत, कोरोना काळात त्यांनी अनेकांना जीवन उपयोगी साहित्य पुरविले. हा त्यांचा सामाजिक व मानवतावादी दृष्टिकोन सर्वानाच हवाहवासा वाटतो. जिद्द, धाडस, चिकाटी, संयम, सातत्य, प्रामाणिकपणा याच्या जोरावर त्यांनी आपल्या व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आहे. अस्लमभाई सय्यद यांनी केलेल्या समाजकार्याची दखल घेऊन त्यांना ईगल फाउंडेशनकडून दिला जाणारा राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा ! शब्दांकन : प्रा. शरद गायकवाड समाजशास्त्र पदव्युत्तर विभाग श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम ता. उमरगा, जि. धाराशिव

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??