नव दुर्गा (माता कात्यायनी) फ्रेनी तारापोर,डायरेक्टर तारा मोबाइल क्रेचेस पुणे

समाजाचा दृष्टिकोन जर बदलायचा असेल तर अशा क्षेत्रात कार्य करायचे की त्यातून भावी पिढी घडेल आणि समाजात आपले एक वेगळे स्थान निर्माण करेल. सांगत आहेत आजच्या आपल्या नव दुर्गा फ्रेनी तारापोर यांच्याशी नवरात्र विशेष २०२५ निमित्ताने रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी केलेली खास बातचीत.
तुमच्या विषयी थोडक्यात सांगाल. सध्या आपण कोठे कार्यरत आहात ?
मी फ्रेनी तारापोर , सध्या मी विविध संस्थामध्ये विविध पदावर कार्यरत आहे. जसे कि मी राष्ट्रीय स्तरावरील फॅमिली प्लांनिंग अससोसिएशन (एफपीएआय) ची उपाध्यक्ष गोरान ग्रॉस्कोप फॅमिली क्लिनिक, एफपीएआय, पुणे ची संयोजक, तारा मोबाईल क्रेचेस, पुणे: बांधकाम स्थळांवर स्थलांतरित कामगारांच्या ११०० मुलांना डे केअर सेवा प्रदान करणाऱ्या या संस्थेची डायरेक्टर आहे.
विविध संस्थांमध्ये तुम्ही कार्य केलेले आहे त्याविषयी सांगाल.
पुण्यातील एस एन डी टी होम सायन्स महाविद्यालयाची माझी प्राचार्य म्हणून गेली २८ वर्ष मी काम केले आहे. या दरम्यान मी विविध प्रकारचे नवीन कोर्सेस, पदव्युत्तर कोर्स सुरु केले. आज पर्यंत ज्या मुली शिकून गेल्या आहेत त्या आज उच्च पदावर भारतात आणि भारताबाहेर कार्यरत आहेत. दुसरे म्हणजे बालपण शिक्षण शिक्षकांसाठी अभ्यासक्रम नियोजन या अंतर्गत बालपण शिक्षणामध्ये मी नवीन पद्धती आणून विविध खेळांद्वारे त्यांना विविध गोष्टींचे ज्ञान कसे मिळेल याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये माझे विशेष योगदान आहे. मुलांची वैचारिक क्षमता आणि तार्किक क्षमता वाढवण्यासाठी विविध नवीन पद्धती आणल्या. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, पश्चिम प्रदेश, भोपाळ (मानव संसाधन मंत्रालय) याची सदस्य., संचालक: अंजली मॉरिस फाउंडेशन फॉर हेल्थ अँड एज्युकेशन, पुणे, शैक्षणिक अक्षमता असलेल्या मुलांसाठी या अंतर्गत कार्यक्रम केले जातात. सल्लागार समिती सदस्य, लीला पूनावाला फाउंडेशन, पुणे., संस्थापक आणि कार्यकारी समिती सदस्य, विद्या ज्योती स्पेशल स्कूल, पुणे., सदस्य, नीतिमत्ता समिती संस्थात्मक पुनरावलोकन मंडळ पुणे., भारतातील आईपासून बाळापर्यंत एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय बहुकेंद्रित अभ्यासासाठी बीजे मेडिकल कॉलेज, पुणे, सदस्य., बाल मदत लाइन, पुणे सदस्य., बालपण शिक्षण आणि विकास मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याच्या समितीचे सदस्य., अश्या अनेक प्रकारच्या संस्थांमध्ये मी कार्यरत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक नामवंत विविध संस्थांमध्येही मी काम केलेले आहे. जसे कि NCRT, NIPCCD, IFB, FBI, NCTE, UNICEF, WHO इत्यादी .
तुमचे वय आज ८८ आहे तरी तुम्ही इतक्या संस्थांवर काम करत आहात, इतकी ऊर्जा तुम्हाला कशी मिळते.
जर तुम्हाला काम करायची आवड असेल तर तुम्ही कोणतेही काम करू शकता त्यासाठी वय हि मर्यादा नाही. ऐज इस जस्ट अ नंबर. हे सर्व काम करत असताना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान मला अजून काम करण्यासाठी ऊर्जा आणि प्रेरणा देत असते. मी स्वतः विविध शिष्यवृत्तीद्वारे माझे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यावेळीच मी ठरविले होते शिक्षण आणि आरोग्य या ज्या आज मूलभूत गरजा आहेत त्यावर काम करायचे. बऱ्याच हुशार मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही विशेषतः बांधकाम स्थळांवर स्थलांतरित कामगारांच्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना खूप समस्या येतात. त्यांच्यासाठी काही तरी करावे या विचारातूनच तारा मोबाइल ची स्थापना झाली. त्याचबरोबर समाजातील वंचित घटकांना सुविधा सहज मिळाव्या या संकल्पनेतून गोरान ग्रॉस्कोप फॅमिली क्लिनिक, एफपीएआय, पुणे कार्य करत आहे.
तारा मोबाइल या संस्थेच्या कार्याविषयी सविस्तर सांगा.
बांधकाम साइटवर काम करणाऱ्या मुलांचे बालपण आनंदी, सुरक्षित आणि संगोपनयुक्त असावे (विशेषतः मुली, ज्यांच्यावर घरकामाचे ओझे असेल आणि लहान भावंडांची काळजी घेण्याची जबाबदारी असेल), अश्या वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त भारतात फिरणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी डे केअर (‘मोबाइल क्रेचेस’ नावाच्या एक मजबूत चळवळ) सुरु झाली. आज पुण्यात ‘तारा मोबाइल क्रेचेस’ अंतर्गत स्थलांतरित कामगारांच्या ११०० मुलांना डे केअर सेवा प्रदान करण्यात येत आहे. बदलाच्या सिद्धांताचा स्वीकार करून, वंचित समुदायातील मुलांच्या विकासात धोरणात्मक गुंतवणूक ही परिवर्तनात्मक परिणामाची बीजे आहेत. त्यांच्या क्षमतेचे पालनपोषण करून, शिक्षणाला प्रोत्साहन देऊन आणि त्यांना समग्र आधार देऊन, त्यांच्या होणाऱ्या गैरसोयीचे चक्र तोडण्याचे आणि प्रत्येक मुलाची भरभराट होऊ शकेल आणि समाजात सकारात्मक योगदान देऊ शकेल असे भविष्य घडवण्याचे उद्दिष्ट याद्वारे आम्ही ठेवले आहे. स्रियांचे हक्क आणि अधिकार यावर काम करतो.
गोरान ग्रॉस्कोप फॅमिली क्लिनिक, एफपीएआय, पुणेच्या कार्याविषयी सविस्तर सांगाल.
फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीए इंडिया) ही भारतातील १८ राज्यांमध्ये लैंगिक आणि प्रजनन आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आवश्यक आरोग्य सेवा प्रदान करणारी एक सामाजिक प्रभाव पाडणारी संस्था आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया (एफपीए इंडिया) ही एक स्वयंसेवी गैर-सरकारी संस्था आहे . १९४९ मध्ये स्थापित, एफपीए इंडियाला लैंगिक आणि प्रजनन आरोग्याच्या क्षेत्रात सात दशकांचा अनुभव आहे. एफपीए केंद्र आणि राज्य सरकारे, स्वयंसेवी संस्था आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निधी संस्थांशी जवळून भागीदारीत काम करते. एफपीए इंडिया दरवर्षी ३० दशलक्षाहून अधिक लोकांचे जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करते. गेल्या काही वर्षांत, असोसिएशनचे कार्यक्रम गर्भनिरोधक, सुरक्षित गर्भपात, सुरक्षित मातृत्व, किशोरवयीन पुनरुत्पादक आणि लैंगिक आरोग्य, बाल आरोग्य, लिंग-आधारित हिंसाचार (GBV) प्रतिबंध आणि कमी करणे, लैंगिक संक्रमित आणि पुनरुत्पादक मार्गाचे संक्रमण प्रतिबंध आणि व्यवस्थापन, कर्करोग, असंसर्गजन्य रोग आणि उप-प्रजनन क्षमता संबोधित करणे यासारख्या विविध लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि हक्कांच्या मुद्द्यांचा समावेश करण्यासाठी विकसित झाले आहे.
तुम्ही इतकी वर्ष झाले सामाजिक बांधिलकी मधून कार्य करत आहात तेव्हा कौतुकाची थाप म्हणून मिळालेल्या पुरस्कारांविषयी सांगाल
पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र घडत असते. खरं तर माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार हा जेव्हा या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद मी बघते तीच खरी पावती आणि तोच खरा पुरस्कार आहे. तसे महाराष्ट्र सरकारकडून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, एमएस विद्यापीठ, कुटुंब संबंध, एमएस विद्यापीठ, बडोदा, मोंटेसरी इंटरनॅशनल पुणे चॅप्टर, बडोदा येथील एम.एस. विद्यापीठातील नेहरू चेअरचे अभ्यागत प्राध्यापक, रेसिडेन्सी क्लबने २००१ मध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी पुणे गौरव पुरस्कार, संसाधनांच्या गतिशीलतेसाठी (रिसोर्स मोबिलायझेशनसाठी) एफपीएआय फ्लॅश पुरस्काराचे पहिले मानकरी, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुणे येथील विद्यापीठ महिला संघटनेने सन्मानित केले.
नव दुर्गा या सदर अंतर्गत तुम्ही महिलांना काय संदेश द्याल.
तुमच्यातील शक्तीला ओळखा. तुम्ही कितीही मोठ्या अडचणींना तोंड देत असाल, तरी तुमच्यातील शक्ती काही कमी होणार नाही. जग बदलण्यासाठी महिलांना सशक्त बनवणे आवश्यक आहे, कारण तीच आहेत ज्यांचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात आहे. तुमची ओळख तुमच्या अस्तित्वात, सामर्थ्यात आणि संघर्षात आहे. तेव्हा इतरांसाठी स्वतःला बदलू नका.
शब्दांकन
डॉ. रिता मदनलाल शेटीया
संस्थापिका रिता इंडिया फाउंडेशन