नव दुर्गा – ब्रह्मचारिणी एच. सी. डॉ. सविता मदनलाल शेटीया

शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या
क्षेत्र कुठलेही असो….. स्त्री आपल्या कर्तुत्वाने, अस्तित्वाने आणि कार्याने त्या क्षेत्राला एक नवरूप ,एक नव वलय, एक नवी दिशा व एक नवी सिद्धी प्राप्त करून देते. अशाच प्रकारच्या सामान्यातून आपलं असामान्य कर्तुत्व सिद्ध करणाऱ्या आजच्या आमच्या पहिल्या नवदुर्गा आहेत, पुण्यातील एच. सी. डॉ. सविता मदनलाल शेटीया यांच्याशी नव दुर्गा विशेष २०२५ या सदर साठी खास बातचीत केली आहे रिता इंडिया फाउंडेशन च्या संस्थापिका डॉ. रिता शेटीया यांनी….
एक मध्यमवर्गातून आलेली सर्वसाधारण मुलगी ते तिने केलेला मानद डॉक्टरेट चा प्रवास या विषयी काय सांगाल.
मी सविता शेटीया, खूप शिकायचे अशी इच्छा तर होती पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे केवळ १० वि पर्यंत शिकता आले. लग्न झाले आणि संसारात गुंतले . पण आपल्या मनातील इच्छा , काहीतरी करण्याची जिद्द नेहमीच मला खुणवत राहायची. म्हणून शिक्षणाचा उपयोग मी शिकवण्या घ्यायला सुरवात केली. 1994 मध्ये अंगणवाडी शिक्षिकेच्या जागा निघाल्या. माझ्या पती ने मला प्रोत्साहित करत अर्ज भरायला लावला आणि माझी निवड झाली. तीन वर्ष काम केल्या नंतर मला सुपर वायझर च्या पोस्ट ची संधी मिळणार होती म्हणून किमान शिक्षण पदवी पर्यंत हवे होते. इथेही पतीने आणि मुलांनीही साथ देत माझा पुढील शिक्षणासाठी प्रवास सुरु झाला. इथे एक सांगावेसे वाटते की , ‘ Age is just a Number’ तुम्हाला शिकायची जिद्ध असेल तर तुम्ही कधीही आणि केव्हाही शिकण्यास सुरुवात करू शकता.
जीवन म्हटल की समस्या आणि संघर्ष हा आलाच , तुमच्या आयुष्यातील अश्या समस्येविषयी सांगा की तेथे तुम्हाला नव दुर्गेचे रूप घ्यावे लागले.
ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती प्रत्येक अनुभव कळत – नकळत काहीतरी शिकवून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही जगायचे कसे आणि कुणासाठी ते शिकवतात. समस्या, चढउताराचा सामना करत संसार चालू असतानाच मी पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना माझ्या पतीचे निधन झाले. आणि यानंतर मी पूर्णपणे कोलमडले पण पुन्हा मुलांकडे पाहत उभे राहिले आणि पुण्यात शिफ्ट झाले. दोन मुली आणि एक मुलगा त्याची आई – बाबा या दोन्ही भूमिका मलाच निभवायच्या होत्या. माझा खरा खडतर प्रवास इथून सुरु झाला. पुण्यात आल्यानंतर असलेला शिक्षिकेचा जॉब ही गेला. पण मला मुलांचे भविष्य घडवायचे होते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची माझी लढाई सुरू झाली. शाळेत असताना शिलाई काम शिकले होते , तेच मी पुण्यात आल्यावर सुरू केले . त्याच बरोबर शिकवण्या घेण्यास सुरुवात केली . मुलांनीही मला आधार तर दिलाच पण शिक्षण घेता घेता काम ही करायला सुरुवात केली. संघर्ष हा पावलो पावली होता , पण अश्या वेळी संयम आणि विनयता या दोन गोष्टींना मी माझे शस्त्र बनवले आणि येणाऱ्या प्रत्येक संघर्षावर धैर्य, चिकाटी आणि समय सुचकतेने त्याचा संहार केला. जसे नाव दुर्गेचे प्रत्येक रूप आपल्याला हेच सांगते की , नकारात्मक विचारांचा आचारांचा आणि उच्चारांचा तुम्ही संहार करा. तेच मी ही केले.
कौटुंबिक जीवन ते व्यावसायिक प्रवास ते सामाजिक कार्याकडे तुमचा प्रवास कसा सुरु झाला.
लहान पणापासून आई – बाबांनी एक चांगली गोष्ट सांगितली की तुम्ही 100 रुपये जरी कमवले तर त्यातील 10 रुपये सामाजिक कार्यासाठी काढून ठेवा. हेच मी माझ्या मुलांनाही सांगितले . संघर्षमय प्रवास करताना मी मात्र ठरवले होते कि समाजासाठी जे करता येईल ते करूया . स्वतः साठी आणि परिवारासाठी प्रत्येक जण कार्य करत असतो , आपण समाजासाठी काहीतरी करायचे या भावनेने अगदी छोटे छोटे जे कार्य करता येईल ते करायला सुरुवात केली. जसे की, वाढदिवस अनाथाश्रम मध्ये जाऊन तेथील लोकांन बरोबर साजरा करणे. गाईच्या रक्षणासाठी दान करणे, वृक्षारोपण, शिक्षणासाठी गरीब घरातील , गरजू पण हुशार विद्यार्थिनीस आर्थिक मदत करणे. यातूनच 2015 मध्ये माझी मुलगी सामाजिक कार्यात अग्रेसर आहे, त्यातूनच आम्ही “रिता इंडिया फाउंडेशन” ची स्थापना करून शिक्षण आणि आरोग्य या साठी निधी जमवून गरजू लोकांना मदत करणे या उद्देशाने त्याची वाटचाल सुरु केली . शेवटी एवढेच सांगेल कि , तुमच्या जवळ पैसे असेल तर ती मदत करा पण नसेल तर तुमच्या ज्ञानाचा वापर, तुमच्यातील कौशल्याचा वापर आणि तुमचा वेळ इतरांना द्या . वेळ देणे आर्थिक मदती पेक्षाही फार मोठे आहे.
कोविड 19 च्या काळात तुम्ही तुमच्या फाउंडेशन मार्फत केलेल्या कार्या विषयी सांगाल
माझे वय 65 असतानाही कोविड च्या काळात मी सामाजिक कार्यासाठी बाहेर पडले. कारण
या काळात सगळ्यात जास्त मदतीची आवश्यकता होती ती नोकरी / कामासाठी स्थलांतरित झालेल्या कामगार वर्ग, कर्मचारी वर्ग, दिव्यांग, ट्रान्सजेंडर यांना एकूण 1500 पेक्षा जास्त अन्न धान्य किट आणि २०,०० पेक्षा जास्त सॅनिटायझर चे वितरण केले. १००० पेक्षा जास्त मेडिकल किट ट्रॅफिक पोलिस , कर्मचारी वर्ग यांना दिले.
तुमच्या मानद डॉक्टरेट च्या प्रवासाविषयी सांगाल.
आपण केलेल्या कार्यासाठी काही संस्थांकडून कौतुकाची थाप मिळाली. जसे की , नेहरू युवा केंद्र आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ आदर्श माता ‘ हा पुरस्कार संकेत कला क्रीडा कडून सामाजिक कार्यासाठी, भू देवी पुरस्कार, इंदिरा गांधीच्य नावाचा प्रियदर्शनी पुरस्कार , काँगेस ज्येष्ठ नागरिक संघाकडून मिळाला. २०२५ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे गौरव पुरस्कार , कोविद कार्याची दखल यूएसए/सिंगापूर मधील ग्रेस लेडीज या संस्थेने घेतली आणि या संस्थेतर्फे मला मी केलेल्या कार्यासाठी, ‘मानद डॉक्टरेट’ ही पदवी मिळाली.
आजच्या युवतींना / महिलांना तुम्ही काय संदेश द्याल
स्वत्व, स्वतःवर प्रेम, स्वतःचा आदर तुम्ही करा. तरच तुमचे अस्तित्व तुम्ही जपू शकता. आलेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही फायदा घ्या . स्वतःवरील आत्मविश्वास आणि चिकाटी हेच तुम्हाला आकाशाला गवसणी घालण्यास मदत करतील.
डॉ. रिता मदनलाल शेटीया
संस्थापिका रिता इंडिया फाउंडेशन