शिक्षक हा आदर्श नागरिक घडवणारा महान कलाकार, लोककवी अरुण म्हात्रे

- काव्यमैफलीत रंगला गौरवाच्या सन्मान सोहळा
पालघर जिल्हा प्रतिनिधी, दि. १४
“ शिक्षक हा आदर्श नागरिक घडविणारा महान कलाकार आहे. समाजाचे ते दिशादर्शक आहेत. जीवन हे कपाळावर आट्या घेऊन न जगता प्रसन्न चेहऱ्याने जगता आले पाहिजे म्हणूनच बालमनावर शिक्षकांनी केलेले संस्कार विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनासाठी अनमोल ठरतात. निसर्गाच्या रूपसंगतीशी एकरूप होत त्यात संगीत आणि अर्थ मिसळून जगले तरच जीवनाचे खरे सौंदर्य उलगडते ,” अशा ओजस्वी शब्दांनी लोकप्रसिद्ध कवी, गीतकार व निवेदक अरुण म्हात्रे यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे आदर्श शिक्षिका स्वर्गीय प्रणिता प्रवीण पाटील स्मृती प्रित्यर्थ व सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग झुऱ्या वर्तक यांच्या सौजन्याने “पालघर जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार व लायन्स गौरव सन्मान २०२५” चे वितरण देवभूमी सभागृह, सफाळे येथे करण्यात आले.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या कवी अरुण म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “मराठी भाषेमधून शिक्षण घेतलेली अनेक मंडळी आज विविध क्षेत्रांत यशस्वी ठरली आहेत. मराठीची पायाभरणी चांगली असल्यास इतर भाषांवर प्रभुत्व मिळवणे सहज शक्य होते, असे सांगून त्यांनी कवी पारगावकर, फ. मु. शिंदे, नायगावकर आणि आपल्या स्वतःच्या कविता वेगवेगळ्या शैलीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
या प्रसंगी फर्स्ट वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नटवर बंका यांनी लायन्स इंटरनॅशनलच्या जागतिक कार्याचा गौरव करत, “शिक्षक व विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान करणाऱ्या सफाळे क्लबचे अभिनंदन” केले. तर ट्विनिंग फेलोशिप डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन मनमोहन गुप्ता यांनी, शिक्षकांचे समाजातील स्थान सर्वोच्च असल्याचे प्रतिपादन करत लायन्स क्लबचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लब प्रेसिडेंट मनोज म्हात्रे होते. झोन चेअरपर्सन प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक तर सेक्रेटरी जतिन कदम यांनी आभार मानले.
सत्कारमूर्तींमधून सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके, मुख्याध्यापिका रुपाली भोईर, सहशिक्षिका मनीषा गोसावी आणि कृषी तज्ञ भूषण वर्तक यांनी मनोगत व्यक्त केले.या समारंभात जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक विभागातील १२ गुणवंत शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार, १२ विविध क्षेत्रातील मान्यवरांना लायन्स गौरव सन्मान २०२५, तसेच ३ विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी क्लबचे प्रेसिडेंट मनोज म्हात्रे, लोकप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, डिस्ट्रिक्ट वाईस गव्हर्नर नटवर बंका, फिल्म निर्माता तथा डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन मनमोहन गुप्ता, सफाळे गावच्या सरपंच तनुजा कवळी, रिजन चेअर पर्सन अतुल दांडेकर, झोन चेअर पर्सन प्रमोद पाटील, उद्योजक निकेश वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लबचे सेक्रेटरी जतीन कदम, ट्रेझरर कुंदन राऊत, उपाध्यक्ष सचिन वर्तक तसेच निवड समितीचे सर्व सदस्य आणि लायन्स क्लबचे सदस्य यांनी मेहनत घेतली.प्रतिभा कदम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ सोहळ्यात प्राथमिक विभागातून नितीन बाजीराव समुद्रे (सहशिक्षक), रुपाली श्रीकांत भोईर (मुख्याध्यापिका), दत्ता अंगत उमाटे (प्रमुख शिक्षक), रामचंद्र दामोदर मोकाशी (प्रमुख शिक्षक), ज्ञानेश्वर दिगंबर सरक (प्रमुख शिक्षक), बाळू हिरा पारधी (सहशिक्षक) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माध्यमिक विभागातून रुचिता महेश सूर्यवंशी (सहशिक्षिका), पराग नारायण पाटील (सहशिक्षक), मनीषा हेमंत गोसावी (सहशिक्षिका), गणेश अशोक कोर (सहशिक्षक), डॉ. महादेव दिनकर इरकर (सहशिक्षक), हेमाली विठ्ठलभाई भंडारी (सहशिक्षिका) यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याच वेळी लायन्स गौरव सन्मान २०२५ अंतर्गत डॉ. अनुप पाटील, सफाळे (वैद्यकीय), शैलेश ठाकूर, माकुणसार (सेवा निवृत्त सैनिक), दत्ता शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सफाळे (पोलिस), भूषण वर्तक, चटाळे (कृषी), कु. राशी राकेश ठाकूर, माकुणसार (क्रीडा), नितीन बोंबाडे, सफाळे (पत्रकारिता), स्वाती भोईर, सफाळे (साहित्यिक), ॲड. निलेश राऊत, दातिवरे (सामाजिक), संजीव म्हात्रे, रामबाग (सहकार), नरेश गायकवाड, भावरपाडा (परिचारक), प्रकाश काळे, सफाळे (पर्यावरण मित्र), कल्पेश तळकर, माकुणसार (आपत्ती व्यवस्थापन) यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय विशेष सत्कार लायन महेंद्र किणी, मधुरा राऊत व महिमा म्हात्रे यांचे करण्यात आले.