
शिराळा प्रतिनिधी
वारणा नदी पुलाजवळ सागाव येथील शेतकरी श्री.बाबासो विठू पाटील यांची तीन अश्वाशक्तीची,श्री बापूसो आनंदराव वंडकर यांची एक लाख रुपये किमतीची किर्लोस्कर कंपनीची पंधरा अश्वशक्तीची तर श्री सदाशिव आबा शिद यांची पंधरा अश्वशक्तीची टेक्समो कंपनीची एक लाख रुपये किमतीच्या विद्युत उपसा संच म्हणजेच इलेक्ट्रिक मोटारी दिनांक 22 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्री चोरीस गेल्या याबद्दल त्या बोलत होत्या.
गेल्या सहा-सात वर्षांपासून वारणा नदीकाठी असलेल्या विद्युत उपसा संचाच्या केबल सातत्याने चोरीस जात आहेत, सुमारे पाच ते दहा हजार रुपये किमतीच्या या केबल चोरीस गेल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन देखील कसलाच शोध लागत नाही.दोन वर्षांपूर्वी ग्राम पंचायत मालकीच्या जॅकवेलमधील सुमारे दीड लाख रुपयाची केबल चोरीस गेली याबद्दल देखील तक्रार देऊन देखील कसलाच उपयोग झालेला नाही.श्री बाबासो पाटील यांची गेल्या वर्षी देखील केबल चोरीस गेली होती तर त्यांचीच तीन वर्षांपूर्वी एक लाख रुपये किमतीची होस्टेल फ्रिजियन गाय चोरीस गेली होती.श्री सदाशिव शीद व बापूसो वंडकर यांच्या देखील गेल्या वर्षी दहा हजार रुपये किमतीच्या केबल चोरीस गेल्या होत्या तर श्री बाळासो केरू पाटील यांचा दोन वर्षांपूर्वी विद्युत उपसा संच चोरीस गेल्यानंतर त्यांनी नवीन खरेदी करून आणून बसवला परंतु तोही दुसऱ्यांदा चोरीस गेला होता.
सध्या अवेळी पावसाच्या आसमानी संकटामुळे शेतकरी अत्यंत अडचणीत आलेला आहे.सातत्याने उद्भवणारी महापूर परिस्थिती,खतांचे व विजेचे वाढलेले दर,शेतमालाला नसलेला भाव यामुळे आधीच शेतकरी वर्ग कोलमडून पडलेला आहे. पोलिसात वारंवार चोरीच्या तक्रारी होऊन देखील एकही चोरी उघडकीस येत नाही.रात्री ३-३ मोटारी चोरीस नेत असताना सुमारे दहा ते बारा मनुष्यबळा शिवाय शक्य नाही.त्याचा माग काढणे राहिले बाजूलाच.केवळ फिर्याद पंचनामा असे कागदी घोडे नाचवून तपास जैसे थे अवस्थेत ठेवल्याने बळीराजा हवालदिल झाला म्हणून ग्राम प्रशासन त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून चोरीस गेलेल्या त्यांच्या वस्तू त्यांना परत मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.
येत्या चार दिवसात तपासात प्रगती न झाल्यास सरपंच सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन शिराळा पोलीस स्टेशन समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करतील असे सरपंच सौ.अस्मिता पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


