शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आणि शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांला समाजाशी जोडणारा दुवा – सायली घाग

शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध ज्याने ज्याने प्राशन केले, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले जाते. नुसते गुरगुरणेच नव्हे तर नाचणे,बोलणे, व्यक्त होणे, आत्मविश्वासू बनणे, आनंद देणे, घेणे, सारासार विचार करणे, स्वातंत्र्य देणे, घेणे या सर्व गोष्टी शिक्षणामुळेच होत असतात. त्यामुळे शिक्षण घेणारा जसा महत्त्वाचा आहे तसेच शिक्षण देणाऱ्याची ही भूमिका फार महत्त्वाची आहे.पाण्याचा एक थेंब जरी तव्यावर पडला तर त्याचे अस्तित्व संपून जाते.तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्या- सारखा चमकतोआणि तो जर शिंपल्यात पडला तर तो मोतीच होतो.थेंब एकच, फरक फक्त…॥ सहवासाचा ॥त्याप्रमाणे शिक्षकाला जर वाचनाची आवड असेल तर विद्यार्थी वाचक होतात, शिक्षकाला लेखनाची आवड असेल तर विद्यार्थी लेखक होतात. शिक्षकाला कवितांची आवड असेल तर विद्यार्थी कवी होतात,शिक्षकाला चित्रकलेची आवड असेल तर ते विद्यार्थी चित्रकार होतात.थोडक्यात शिक्षकांचे विद्यार्थी हे त्याचे प्रतिबिंब असुन शिक्षक हा विद्यार्थ्यांला समाजाशी दुवा असतो. एखाद्या डॉक्टरांच्या चुकीच्या ट्रीटमेंट मुळे एखादा पेशंट दगावेल. इंजिनिअरच्या चुकीमुळे एखादा पूल पडून 500 ते हजार लोकांचे प्राण जातील पण शिक्षकांच्या असंवेदनशील आणि अपरिपूर्ण गोष्टींमुळे पिढ्यानपिढ्यांचे नुकसान होऊ शकते आणि म्हणूनच शिक्षक हा फक्त सहा-सात तासांचा शिक्षक नसून तो आयुष्यभर आणि निवृत्तीनंतरही आपल्या विद्यार्थ्यांचा आणि समाजाचा शिक्षक असतो.साने गुरुजी, डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,लोकमान्य टिळक, सावित्रीबाई फुले, यांसारख्या शिक्षकांमुळेच आज अनेक पिढ्या घडल्या आणि घडत आहेत. साने गुरुजी नेहमी म्हणत, खोटं बोलून आपण वेळ निभावून नेऊ शकतो पण,आयुष्यभर माणूस स्वतःच्याच डोळ्यात टिकू शकत नाही. श्रीमंती ही कपड्यात किंवा पैशात नसते खरी श्रीमंती म्हणजे चांगला स्वभाव प्रामाणिकपणा, सेवावृत्ती.ही मूल्य साने गुरुजींनी कथा कवितातून आपल्या मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला.टिळकांनी जेव्हा केशरी मराठा वर्तमानपत्र सुरू केले तेव्हा विद्यार्थ्यांनी त्यांना विचारले सर हे पण शिक्षणच आहे का? टिळक म्हणाले, हो वृत्तपत्रातूनही समाज शिकतो. जागा होतो हेच खरे सार्वजनिक शिक्षण.शिक्षण फक्त शाळेतच नाही ते समाजातही दिले जाते.
फक्त विज्ञान न शिकवता मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी कसे जगावे हे विद्यार्थ्यांमध्ये रुजवणारे हाडाचे शिक्षक म्हणजे एपीजे अब्दुल कलाम तर, शेती चित्रकला निसर्ग संगीत यातून शिक्षण विद्यार्थ्यांनपर्यंत पोहोचवणारे होते रवींद्रनाथ टागोर.
शेवटी चाकोरी बाहेरचे out of box thinking मनात रुजवणारे शिक्षकच कायम लक्षात राहतात.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षक हा आता फक्त ज्ञानाचा वाहक राहिलेला नाही तर शिक्षकांची भूमिका आता बरीच वाढलेली आहे.
विद्यार्थीही अनेक ताणतणावांना सामोरे जात आहेत.त्यांना वर्गात येऊन बसण्याची गरजच वाटत नाही कारण त्यांच्याकडे माहितीचा स्त्रोत आहे. त्यामुळे आता वर्गात मुले टिकून ठेवणे, मुलांची कल्पनाशक्ती,सृजनशीलता या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे,अमली पदार्थाचे व्यसन, मोबाईलचे व्यसन यापासून मुलांना जागृत करणे, सर्वच विद्यार्थ्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात त्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच चष्म्यातून न पाहता प्रत्येकाचे वेगळे व्यक्तिमत्व लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला हाताळणे ही आता शिक्षकांसमोरील मोठी आव्हाने आहेत.
जागतिक धावपळीच्या, स्पर्धेच्या, A. I च्या युगात मनशांती टिकवून विविध मूल्यांचे परिपोषण करीत भारतात पुन्हा साने गुरुजी, टिळक, आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्यासारखे शिक्षक घडो
हि आजच्या दिवशी सदिच्छा