जिल्हा परिषद ठाणे जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2025 संपन्न

पालघर जिल्हा प्रतिनिधी :
जिल्हा परिषद ठाणे जिल्ह्याचा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोहळा 2025 बी. जे. हायस्कूल ठाणे येथे उत्साहात पार पडला. सन 2025-26 या वर्षासाठी सहा शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला.या मानकरी शिक्षकांमध्ये वर्षा जगदीश भानुषाली, पुष्पावती तुकाराम भोईर, राजाराम वामन वेखंडे, अविनाश तुकाराम सुरोशे, नवनीत भाऊ बर्डे आणि राजाराम गायकर यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रोहन घुगे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व कोकण विभागाचे आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.या प्रसंगी मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना शिक्षक हा समाजाचा घडवणारा खरा शिल्पकार असल्याचे सांगितले. शिक्षक हे नेहमीच आदर्श असतात, मात्र काहींच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यासाठी पुरस्कार दिले जातात, असे मत व्यक्त झाले.शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांच्या विविध समस्यांवर विधान परिषदेत सातत्याने आवाज उठवला असल्याचे सांगून, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्तता, BLO ड्युटी रद्द करणे, शाळांना सौरऊर्जेची सुविधा, तसेच आधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (योजना) श्रीमती भावना राजनोर, उपशिक्षणाधिकारी श्री. मोहिते, उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडित, विस्तार अधिकारी आशिष झुंझारराव, तसेच जिल्ह्यातील अनेक मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.