ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे म्होरके प्रा.लक्ष्मण हाके हे एकटेच जीवाचे रान करत आहेत

ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे म्होरके प्रा.लक्ष्मण हाके हे एकटेच जीवाचे रान करत आहेत.मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी प्रा.लक्ष्मण हाके राज्यभर बैठकीच्या माध्यमातून विरोध करत आहेत.राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडूनही आजपासून नागपूर येथे साखळी उपोषण सुरू होत आहे.आज ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये राखीव जागा असल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य,सरपंच,नगर परिषद सदस्य ,नगराध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य,जिल्हापरिषद अध्यक्ष,महानगर पालिका सदस्य आणि महापौर ही पदे भोगायला मिळतात हे ओबीसी प्रवर्गातील जातींनी लक्षात ठेवावे.शासकीय ,निमशासकीय सरकारी नोकऱ्या,अनुदानित शैक्षणिक संस्था मध्ये नोकऱ्या या आरक्षित जागेमुळे ओबीसी जातीतील लोक आज दिसत आहेत या आरक्षणामुळे ओबीसी प्रवर्गामध्ये स्थिरता प्राप्त झाली आहे.आणि हे आपले आरक्षण कोणीही हिरावून घेऊ शकत नाहीत या भ्रमात हा वर्ग गाफील आहे असे दिसून येत आहे.कुणबी आणि मराठा एकच आहेत असा आदेश काढून सरसकट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे आणि सगेसोयरा आदेशाची अंमल बजावणी करावी,हैदराबाद ,सातारा गॅझेट लागू करावे या मागण्या साठी आजपासून मुंबई येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत.आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या संख्येने
गरीब मराठा समाज मुंबई येथे उपस्थित राहिला आहे मराठा समाजाने झुंडशाही दाखवत सणासुदीच्या आणि श्री गणेशोत्सव काळात मुंबईत कोंडी करून महाराष्ट्र सरकारला आणि शासनाला कोंडीत पकडले आहे.आता ओबीसी प्रवर्ग आणि यातील समाविष्ट जाती गाफील राहिल्या आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनास पाठिंबा दिला नाही आणि ताकत दाखविला नाही तर ओबीसी आरक्षण असून नसल्यासारखे होईल हे लक्षात घ्यावे .मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले तर आज एकही ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व मिळणार नाही.अनेक शैक्षणिक संस्था,सहकारी संस्था,बँका आदी संस्थावर मराठा समाजाचे प्राबल्य असल्यामुळे एकाही ओबीसी समाजाच्या व्यक्तीला नोकऱ्या मिळणार नाहीत.खुल्या गटातून मराठाच आणि ओबीसी आरक्षण मधून ओबीसी मराठा आरक्षण घेणार दोन्हीकडे मराठा समाजाचीच व्यक्ती दिसेल आणि जातीयवादी मनोज जरांगे यांना हेच हवे आहे.हे सर्व ओबीसीने लक्षात घ्यावे आणि सर्व शक्तिनिशी लढण्यासाठी पुढे आले पाहिजे. मंडल यात्रा काढून ओबीसी समाजाला आपलेसे करू पाहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे,प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मनोज जरांगे यांच्या मागणीला विरोध करताना दिसून येत नाहीत. मंडल यात्रेच्या माध्यमातून ओबीसीला आकर्षित करण्याचा डाव आखत सरकारला कोंडीत पकडत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व आमदारांनी मनोज जरांगे यांच्या मागणीला पाठिंबा व्यक्त करत मराठा समाजाला खुश करण्याचा डाव आखला आहे आणि मराठा समाजाची सहानुभूती मिळवत आहेत हे स्पष्ट दिसत आहेत.ओबीसी मतावर निवडून येऊन मराठा समाजाचे आमदार ओबीसी आरक्षणाच्या बाजूने उभे न राहता ओबीसी आरक्षणाचे लचके तोडत आहेत हे स्पष्ट दिसत आहे..कुणबी आणि मराठा एकच आहेत असा शासकीय आदेश काढून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे धनगर समाजाचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील,माळशिरसाचे आमदार उत्तम जानकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख या तीन आमदारांनी पाठिंबा दिल्याचे माध्यमातून जाहीर झाले याचा धनगर समाजाला खेद वाटतो आहे.आज धनगर समाजस ओबीसी मधूनच स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये प्रतिनिधित्व मिळते याचे भान देखील या तीन आमदारांन भान राहिल्याचे दिसत नाही.ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी या आमदारांनी उभे राहायला पाहिजे होते पण खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाला छुपा पाठिंबा असल्याने खासदार शरद पवार याचा रोष पत्करायला नको म्हणून या आमदारांनी पाठिंबा दिला आहे असे वाटते.प्रा.लक्ष्मण हाके म्हणतात ते सत्य आहे.ओबीसी आरक्षण संपल्यात जमा आहे हे ओबीसी समाजाने ओळखावे .ओबीसीमधून आरक्षण दिले जाऊ शकत नाही असे ना.बावनकुळे म्हणत आहेत.ओबीसी आरक्षणाच्या बाजूने भारतीय जनता पक्षातील ओबीसी नेते आहेत आज दिसून येत आहे.काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट,शिवसेना दोन्ही गट ही ओबीसींच्या बाजूने बोलताना दिसून येत नाही असे दिसून येते.प्रा.देवेंद्र मदने सोलापूर राजकीय विश्लेषक.