ताज्या घडामोडी

अहिल्यादेवी होळकर : युगप्रवर्तक विचारांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

प्रा. डॉ. महेश मोटे
मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव.
भ्रमणध्वनी क्रमांक : ९९२२९४२३६२

सत्तेला जनसेवेचे अधिष्ठान प्राप्त करून देणाऱ्या इतिहासातील एक प्रभावीशाली व्यक्तिमत्व म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. खंडेरावांची पत्नी, मल्हाररावांची सून आणि माळव्याची लोकमाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवी केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या एक संस्था होत्या. अहिल्यादेवी होळकर या व्यक्ती नसून प्रणाली होत्या. त्यांनी सत्ता उपभोगण्याचे साधन न ठेवता, ती सेवेची संस्था बनविली. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला संस्था म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, त्या व्यक्तीने घालून दिलेल्या परंपरा, नैतिक मूल्ये आणि काम करण्याची पद्धत ही काळाच्या मर्यादा ओलांडून आजही मार्गदर्शक ठरतात. ज्या काळात स्त्रियांना चार भिंतींच्या आत बंदिस्त ठेवले जायचे, त्या काळात त्यांनी आपल्या अदम्य धैर्याने आणि कुशल प्रशासनाने १८ व्या शतकातील भारताला नवी दिशा आणि मार्ग दाखवला. न्याय, लोककल्याण आणि संस्कृती संवर्धनाचे त्यांचे कार्य म्हणजे आजही आधुनिक प्रशासनासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. शस्त्रे न वापरताही ज्यांनी शत्रू जिंकले, संस्कारांच्या बळावर राज्याचे रक्षण केले, त्या युगप्रवर्तक अहिल्यादेवी होळकर होत.
भारतीय इतिहासात ज्या मोजक्या राज्यकर्त्यांनी, त्यात महिला राज्यकर्त्या म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला, त्यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे स्थान अद्वितीय स्वरूपाचे आहे. त्या केवळ एक आदर्श शासक किंवा दानशूर राणी नव्हत्या, तर न्यायप्रिय, लोककल्याणकारी, दूरदर्शी आणि मूल्यनिष्ठ नेतृत्वाचे मूर्तिमंत उदाहरण होत्या. त्यांच्या कार्याचा प्रभाव केवळ त्यांच्या काळापुरता मर्यादित न राहता आजच्या लोकशाही, प्रशासन, सामाजिक न्याय आणि स्त्री-सशक्तीकरणाच्या संकल्पनांमध्येही प्रकर्षाने जाणवतो. न्यायाचे प्रतीक, लोकमाता अहिल्यादेवी, ​कुशल प्रशासन, लोककल्याण, सुराज्य, ​साधे जीवन, उच्च विचार, लोकराज्य निर्धार, ​प्रजेच्या कल्याण, समर्पित जीवन, ​युगप्रवर्तक प्रेरणा म्हणजे अहिल्यादेवी होळकर. संस्कृतीचे जतन आणि जनसामान्यांचे कल्याण, यातच खऱ्या शासकाची ओळख असते. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्ह्यातील चौंडी येथे साधारण कुटुंबात झाला. अहिल्यादेवी आपल्या विलक्षण बुद्धिमत्ता, संवेदनशीलता, धैर्य, धाडसी, स्वाभिमानी आणि कर्तृत्वाच्या बळावर इतिहासात अजरामर स्थान मिळवले. पती खंडेराव होळकर आणि सासरे मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर त्यांनी अत्यंत धैर्याने राज्यकारभाराची धुरा सांभाळली आणि माळवा प्रांताला समृद्धीच्या शिखरावर नेले.
O लोकाभिमुख आणि उत्तरदायी प्रशासनाचा आदर्श : अहिल्यादेवींनी सत्ता ही प्रजेच्या कल्याणासाठी असते, ही भूमिका स्वीकारली होती. माळव्याच्या राज्यकारभाराची सूत्रे वयाच्या ४२ व्या वर्षी सन १७६७ ते १७९५ असा सुमारे सलग २८ वर्षे आदर्श राज्यकारभार केला. त्यांनी त्यांचा दरबार सर्वसामान्यांसाठी कायम खुला ठेवला होता. प्रजेच्या तक्रारी थेट ऐकून त्यावर त्वरित निर्णय घेतला जात असे. आजच्या लोकसहभागी प्रशासन, ई-गव्हर्नन्स, जनसुनावणी आणि सामाजिक लेखापरीक्षण या संकल्पनांचा पाया त्यांच्या प्रशासनशैलीत दिसून येतो.
महसूल व्यवस्थेत त्यांनी पारदर्शकता ठेवली. शेतकऱ्यांवरील अन्याय टाळण्यासाठी न्याय्य करपद्धती राबवली. दुष्काळ किंवा संकटाच्या काळात करमाफी देऊन प्रजेला दिलासा दिला. आजच्या काळात प्रशासनातील भ्रष्टाचार, विलंब आणि असंवेदनशीलता पाहता अहिल्यादेवींचे लोककेंद्री, संवेदनशील आणि उत्तरदायी प्रशासन अधिकच प्रेरणादायी वाटते. अहिल्यादेवी होळकर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर सुशासनाची एक शाश्वत प्रणाली आहे. ज्यांनी आपला प्रभावशाली इतिहास निर्माण केला.
O न्यायव्यवस्थेतील निष्पक्षता आणि तत्परता :
अहिल्यादेवींची न्यायव्यवस्था अत्यंत सुलभ, त्वरित आणि निष्पक्ष होती. जाती, धर्म, लिंग किंवा सामाजिक स्तर यांचा भेद न करता त्यांनी सर्वांना समान न्याय दिला. कायद्यापुढे सर्व समान हे आधुनिक लोकशाहीचे तत्त्व त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून त्याकाळी जपले. न्याय आणि लोककल्याण ज्याचे ध्येय, तीच खरी राजसत्ता, असे अहिल्यादेवी होळकरांचे विचार होते. इतिहासात उल्लेख येतो की, अन्याय करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध त्यांनी स्वतःच्या नातलगांनाही माफ केले नाही. न्याय करताना, मी कोणाचीही मुलगी किंवा सून नाही, तर प्रजेची सेवक आहे, ही त्यांची भूमिका होती. आज न्यायालयांमधील प्रकरणांचा वाढता बोजा आणि न्याय मिळण्यातील विलंब पाहता, त्यांच्या त्वरित न्यायदानाच्या तत्त्वांचा पुनर्विचार होणे आवश्यक आहे.
समाजकल्याण आणि विकासाभिमुख दृष्टिकोन
अहिल्यादेवींनी विकासाचा अर्थ केवळ आर्थिक प्रगती मानला नाही, तर समाजहित, पर्यावरण आणि सांस्कृतिक जतन यांचा समतोल राखला. त्यांनी देशभर मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी, तलाव आणि रस्ते बांधले. काशी, गया, सोमनाथ, रामेश्वरम यासारख्या तीर्थक्षेत्रांचा त्यांनी जीर्णोद्धार करून सांस्कृतिक एकात्मतेला चालना दिली.
त्यांनी केलेले जलसंधारणाचे कार्य आजच्या शाश्वत विकास आणि ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चरच्या संकल्पनांशी सुसंगत आहेत. विहिरी, बारव आणि तलावांची निर्मिती ही केवळ सुविधा नव्हती, तर भविष्यातील पर्यावरणीय संकटांची दूरदृष्टी होती.
O आर्थिक नियोजन आणि आत्मनिर्भरतेचा आदर्श : अहिल्यादेवींचे आर्थिक धोरण हे प्रजेच्या समृद्धीवर आधारित होते. त्यांनी कापड उद्योग, शेती आणि व्यापाराला चालना दिली. व्यापाऱ्यांना सुरक्षित मार्ग, सुविधा आणि संरक्षण दिल्यामुळे इंदौर एक महत्त्वाची व्यापारी पेठ म्हणून उदयास आले. त्यांच्या आर्थिक धोरणातील तीन वैशिष्ट्ये म्हणजे राज्याचा निधी लोकहितासाठी वापरणे, कराचा बोजा न वाढवता व्यापार वृद्धिंगत करणे, स्वतःचे जीवन साधे ठेवून सार्वजनिक पैशाचा काटकसरीने वापर करणे. आजच्या युवकांसाठी हे आर्थिक व्यवस्थापनाचे सर्वोत्कृष्ट उदाहरणच म्हणावे लागेल. केवळ बचत नाही, तर कौशल्यविकास आणि उत्पादकतेत गुंतवणूक करण्याची शिकवण त्यांच्या कार्यातून दिसून येते.
O सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि सर्वधर्मसमभाव : अहिल्यादेवींचा सांस्कृतिक दृष्टिकोन अत्यंत व्यापक होता. त्यांनी संपूर्ण भारतातील धार्मिक स्थळांचे पुनरुज्जीवन केले. हे कार्य केवळ धार्मिक नव्हते, तर भारतीय सांस्कृतिक अस्मितेचे जतन आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणारे होते.
विशेष म्हणजे, त्यांनी केवळ हिंदू मंदिरांनाच नव्हे, तर मुस्लीम समाजाच्या धार्मिक कार्यांनाही मदत केली. यामुळे त्यांच्या सर्वधर्मसमभावी आणि समन्वयवादी दृष्टिकोनाचे दर्शन घडते.
O स्त्री-सशक्तीकरणाची प्रेरणादायी प्रतिमा :
पुरुषप्रधान व्यवस्थेत एक स्त्री म्हणून यशस्वी राज्यकारभार करणे ही अत्यंत मोठी कामगिरी होती. अहिल्यादेवींनी सिद्ध केले की नेतृत्वासाठी लिंग नव्हे, तर दूरदृष्टी, निर्णयक्षमता आणि संवेदनशीलता महत्त्वाची असते.
त्यांनी विधवांना संपत्तीचे अधिकार दिले, स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण केले आणि सामाजिक चौकटींना आव्हान दिले. आजच्या महिला राजकारणी, प्रशासक आणि समाजकारणींसाठी त्या प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत.
O आजच्या काळातील प्रासंगिकता :
आज भारत स्मार्ट सिटी, सुशासन, शाश्वत विकास आणि स्त्री-सशक्तीकरण यासारख्या संकल्पनांवर भर देत आहे. या सर्व मूल्यांची पायाभरणी अहिल्यादेवींनी २५९ वर्षांपूर्वीच केली होती. त्यांचे जीवन आजच्या युवकांसाठी आदर्शवत आहे. संकटातही धैर्याने कसे उभे राहावे, सामाजिक बांधिलकीची जपणूक कशी करावी, निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा जपणे, विकासात मानवी मूल्यांना प्राधान्य देणे.​ संकटांना संधीत रूपांतरित करणारी जिद्द म्हणजेच अहिल्यादेवींचा वारसा, जेव्हा सत्ता प्रजापालनाचे साधन बनते, तेव्हा राज्य रामराज्य होते. स्त्री-शक्तीचा विजय म्हणजे केवळ अधिकार मिळवणे नव्हे, तर समाजाला सक्षम नेतृत्वाची दिशा देणे होय. अहिल्यादेवी होळकर या केवळ इतिहासातील एक राणी नव्हत्या; तर त्या एक युगप्रवर्तक विचारवंत, लोकमाता, राजमाता आणि आदर्श शासनकर्त्या होत्या. त्यांच्या कार्यातून न्याय, समता, लोककल्याण, सांस्कृतिक अभिमान आणि स्त्री-सशक्तीकरण यांचे अद्वितीय दर्शन घडते. अहिल्यादेवी होळकर वयाच्या ७० व्या वर्षी म्हणजे १३ ऑगस्ट १७९५ मध्ये त्यांची प्राणज्योत मावळली. आज त्यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणे म्हणजे केवळ अभिवादन नव्हे, तर त्यांच्या नैतिक मूल्यांचा स्वीकार करणे होय. पुतळे उभारण्यापेक्षा त्यांनी दाखविलेला लोककल्याणाचा मार्ग अनुसरणे. पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यापेक्षा, त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचे पुष्प समाजमनात फुलवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अहिल्यादेवींचे जीवन हे इतिहासातील एक सुवर्णपान नसून आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी एक शाश्वत प्रेरणास्त्रोत आहे, असेच म्हणावे लागेल.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??