विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून भानुदास म्हसकर यांनी जपला आदर्श वारसा – शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील

पालघर, प्रतिनिधी :
मासवण विभाग हायस्कूल, मासवणचे मुख्याध्यापक भानुदास म्हसकर यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पालघर येथील नवली सभागृहात नुकताच पार पडला. शिक्षण क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या म्हसकर यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख चंद्रकांत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रमोद पाटील, शिरगाव येथील यमुना निजामपूर हायस्कूलचे मुख्याध्यापक निरंजन पाटील, बोईसर येथील डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाचे मुख्याध्यापक नरेंद्र घरत, माजी केंद्रप्रमुख मधुकर म्हसकर यांच्यासह विविध शाळांतील आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रमोद पाटील म्हणाले की, शिक्षक होणे सोपे असले तरी विद्यार्थीप्रिय शिक्षक होणे अत्यंत कठीण असते. भानुदास म्हसकर यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांच्या घराघरांत जाऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या सुख-दुःखात सहभागी होत आपुलकीचे नाते निर्माण केले. विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध जपत त्यांनी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांच्या कार्यातून अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळत राहील, असे सांगून त्यांनी म्हसकर यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या बदलांना सामोरे जात निष्कलंक सेवा करणे ही मोठी कसरत असल्याचे नमूद केले. भानुदास म्हसकर यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना भानुदास म्हसकर यांनी आपल्या यशामागे संस्थेचे पदाधिकारी, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच कुटुंबीय यांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. विशेषतः पत्नी व कुटुंबीयांनी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या वतीने भानुदास म्हसकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक व नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भावनिक आणि कृतज्ञतेच्या वातावरणात पार पडला.



