डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक दृष्टीकोन

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांनी देशात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा या दृष्टीने स्वातंत्र्य, समता व बंधुता या त्रिसूत्रांचा पुरस्कार केला. समाज प्रबोधन डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी व्यक्ती, समाज व शासन या तिन्ही घटकांच्या जबाबदारीच्या एकाच धाग्याने गुंफण्याचे मौलिक कार्य केले. गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, कामगार-मालक हे घटक कायद्यापुढे समान आहेत, ही संकल्पना त्यांनी जनमानसात दृढ करून देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क प्राप्त करून दिला.
आपल्या जीवनात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी चांगले जाणले होते. आपल्या जीवनात जातीभेद, अस्पृश्यतेचे चटके सहन करुन आपले शिक्षण पूर्ण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना समानतेचा रंग देणारे एक पथदर्शक होते. गरिबी व निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणे असल्याने ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही शिकवण त्यांनी दिली शिकल्याशिवाय आपल्यावर अन्याय होतोय हे कळत नाही आणि आपले हक्क मिळत नाहीत, हा विचार पददलितांना देऊन सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि पाच हजार वर्षांपासून हीन जीवन जगणाऱ्यांमध्ये स्वाभिमानाची आणि सन्मानाची ज्योत पेटवली.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे हत्यार असून त्यामुळे माणसाला आपल्या घटनादत्त अधिकार व कर्तव्याची जाणीव होते आणि तो विवेकी व विचारी होतो. स्त्रियांना शिक्षण दिले तर त्या मुलांवर बालवयातच चांगले संस्कार घडवू शकतील. वंचित, उपेक्षित वर्गासाठी सोलापूर, पनवेल, ठाणे, पुणे, नाशिक, बेळगाव येथे वसतिगृहे, औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, मुंबईत सिद्धार्थ कॉलेज, लॉ कॉलेज याशिवाय मुंबई, औरंगाबाद, पंढरपूर, दापोली, नांदेड येथे शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले.
‘ ज्याप्रमाणे माणसाला अन्नाची गरज आहे त्याप्रमाणे त्याला विद्येची गरज आहे’ हा विचार बाबासाहेब आंबेडकरांनी १२ डिसेंबर १९५५ रोजी मिलिंद महाविद्यालयाच्या बोधी मंडळात मांडला. शिक्षणाचे महत्त्व सांगताना बाबासाहेब आंबेडकरांनी १५ जुलै १९२७ च्या ‘बहिष्कृत भारत’ या दैनिकाच्या स्तंभात लिहिताना सांगितले की, “उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस हिंमत गमावून अल्पायुषी होतो, पण शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो.” दास्यमुक्ततेसाठी शिक्षणाची अपरिहार्यता आंबेडकरांना अभिप्रेत होती; कारण सहस्त्रावधी वर्षे शिक्षण किंवा ज्ञान हे केंद्रीत होते. विकेंद्रीकरणाचा स्पर्श शिक्षणाच्या व ज्ञानाच्या क्षेत्रात होऊ नये, म्हणून त्या काळच्या समाजधुरीणांद्वारे हेतुत: दक्षता घेण्यात आली होती; कारण त्यामुळे उच्च दर्जाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अधिसत्तेला सुरुंग लागणार होता. शिक्षणामुळे मनुष्याला आत्मज्ञान होते यावर बाबासाहेबांचा विश्वास होता. “शिक्षणाने माणूस घडणार नसेल, तर ते शिक्षण कसले?” म्हणूनच सर्वसामाजिक दुखण्यावर शिक्षण हाच एक उपाय आहे, अशी त्यांची धारणा होती.’खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याने जे आकलन मानण्यात येते, ते आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून चूक आहे. हिंदुस्थानातील दलित समाजाची शैक्षणिक उन्नती न करता केवळ त्यांची आर्थिक उन्नती करून, अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करणे म्हणजे पुन्हा एकदा त्यांना उच्चवर्णीयांच्या दावणीला बांधणे आहे,’ असे आंबेडकरांचे मत होते. दलित समाजाला शिक्षण देऊन त्यांच्यामधील न्यूनगंड नाहीसा करून त्यांना त्यांच्या स्वाभिमानाची जाणीव करून देणे हेच खरे तर दूरगामी उपयोगाचे आहे, असे बाबासाहेब मांडतात. (‘दैनिक जनता’, २२ सप्टेंबर १९५२)
मानवी उन्नतीचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. समाजपरिवर्तनाचा विचार पारंपरिक शिक्षणपद्धतीत नसल्याने त्याला व्यक्तिस्वातंत्र्याचा पुसटसा स्पर्शही झाला नाही, मग व्यक्तीच्या मानसिक व बौद्धिक विकासाचा प्रश्न तर दूरच राहिला. म्हणून मूल्याधिष्ठित शिक्षण हेच बाबासाहेबांचे ध्येयसूत्र होते. ज्यांनी धर्मशास्त्रे निर्माण केली, त्यांनी नीतिशास्त्राचा अवलंब कधीही केला नाही. शिक्षण व ज्ञानाचा तर नीतिशास्त्राशी घनिष्ठ संबंध आहे. समान शिक्षणनीतीशिवाय ज्यांनी ‘राष्ट्र’ संकल्पनेचा उद्घोष केला तो उद्घोष वांझ होता, असेच म्हटले पाहिजे. म्हणूनच स्त्री-पुरुषांना समान शिक्षण आणि एकत्र शिक्षणाचा पुरस्कार करणे गरजेचे होते. शिक्षणाला आधुनिकतेचा वसा घेऊनच मार्गक्रमण करणे श्रेयस्कर ठरेल, या धारणेनेच त्यांनी प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंतची सूत्ररूप मांडणी केली.
प्राथमिक शिक्षण हा सर्व शिक्षणाचा पाया आहे. प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व जाणूनच महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले यांनी सर्वांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे हवे, हा विचार मांडला. प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीचा कायदा करताना ते शिक्षण सर्वांना मोफत मिळायला हवे, अशी आग्रहाची मागणी बाबासाहेबांनी केली, जेणेकरून जे पददलित वर्षानुवर्षे शिक्षणापासून वंचित राहिले आहेत व त्यांना शिक्षण शुल्क देण्याची ऐपत नाही, त्यांना शिक्षण अनिवार्य व मोफत मिळावे. (‘बहिष्कृत भारत’, २१ मे १९२९)
टिपणे लिहिणाऱ्यांची त्यांनी निर्भत्सना केली होती. जुनाट शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल झाल्याशिवाय शिक्षकांच्या मानसिकतेत परिवर्तन होणार नाही. संशोधन कार्याची अनिवार्यता, गुणवत्ता व अभ्यासाची शिस्त ही शिक्षकांमध्ये हवी, असे त्यांचे मत होते.
‘सामाजिक लोकशाही’, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व सामाजिक न्यायावर अवलंबून आहे. त्यासाठी सहशिक्षण हे महत्त्वाचे सूत्र आहे. स्त्रियांसाठी स्वतंत्र शिक्षणाची सोय त्यांना अमान्य होती. पुराणमतवाद्यांनी भारतात स्त्री-शिक्षणाला नेहमीच विरोध केला होता. शिक्षणाचा आणि नीतिमत्तेचा परस्परसंबंध कसा असतो आणि कसा असावा यासंबंधीची रचना व निर्भय विचार त्यांच्याकडे होते, ज्यामुळे पुराणमतवाद्यांनी निर्माण केलेल्या बागुलबुवाचा पर्दाफाश झाला. उच्च शिक्षण केवळ एका वर्गाची मिरास नाही. तसे झाले तर ते राष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. शिक्षणाचे दरवाजे तळागाळातील समाजासाठी, दुर्बल घटकांसाठी उघडे व्हायला हवेत.
डॉ. आंबेडकरांनी स्वकर्तृत्वाने व धाडसाने शिक्षण क्षेत्रात अनन्यसाधारण कामगिरी केली. कोलंबिया विद्यापीठातून ‘भारताचे राष्ट्रीय उत्पन्न: एक ऐतिहासिक व विश्लेषणात्मक अध्ययन’ या विषयावर संशोधन करून पीएचडी संपादन केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, “मी आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणून कसोशीने आणि प्रामाणिकपणे काम करणार आहे. त्यासाठी मी एवढा विद्याभ्यास केला आहे. मी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ माझे कुटुंब व माझा समाज यासाठी करणार नाही, तर सर्व समाजासाठी त्याचा उपयोग करीन. अस्पृश्यांचे प्रश्न फार बिकट आहेत याची मला जाणीव आहे. हे सर्व प्रश्न मी सोडवू शकणार नाही; परंतु ते सर्व प्रश्न जगासमोर मांडून मी त्याकडे सर्व जगाचे लक्ष वेधून घेईन, एवढा मला आत्मविश्वास आहे.” त्यांनी आपले जीवन लोकांसाठी समर्पित करून शिक्षणाचा खऱ्या अर्थाने उपयोग या देशातील शोषित , पिडीत,वंचित, उपेक्षित, मागास, आदिवासी, कष्टकरी यांच्यासाठी केला.
(लेखक मराठी विषय शिक्षक असून लेखन, वक्तृत्व, संशोधन यांची आवड आहे.)
प्रा दिलीप आनंदराव जाधव
रयत शिक्षण संस्थेचे, बळवंत काॅलेज विटा.ता.खानापूर, जि.सांगली.
७६२०८४८६४९
Email: deelipjadhav 2272@gmail.com



