समाज परिवर्तनाची सुरूवात आपल्यापासून करावी लागेल : गणेश शिंदे

परमहंस नगर विराट हिंदू संमेलनाच्या समारोप सत्रात सर्व वक्त्यांचा कुटुंब प्रबोधनावर भर
पुणे, दि. 26 मार्च : मनुष्य स्वतःला सृष्टीतील सर्वांत हुशार प्राणी समजतो. पण ही हुशारी सिद्ध करायची असेल तर ती केवळ भौतिक प्रगतीच्या जोरावर नाही करता यायची. त्यासाठी अपेक्षित संवेदनशीलता, डोळ्यांत प्रेम व हृदयात वात्सल्य जिवंत आहे का यावर ती आपल्याला सिद्ध करावी लागेल. समाजाचा गाभा म्हणजे कुटुंब आणि कुटुंबाची सुरूवात आपल्यापासून होते. समाजाचे परिवर्तन व्हायचे तेव्हा होईल. पण त्याची सुरूवात आपली आपल्यापासून करावी लागेल. प्रत्येकाने ते ठरवले तर जग बदलायला वेळ लागणार नाही असे मत गणेश शिंदे यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील परमहंस नगर परिसरात सकल हिंदू समाजाद्वारा आयोजित विराट हिंदू संमेलनानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आजचे तिसरे व अंतिम पुष्प शिंदे यांनी गोवले त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी रा.स्व.संघ परमहंस नगराचे संघचालक हिरामण जगताप, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नगरसेवक किरण दगडे पाटील, दिनेश माथवड, अल्पना वर्पे, रुपाली पवार, वासंती जाधव, पृथ्वीराज सुतार, भाजपचे नेते गणेश वर्पे, नवनाथ जाधव, संमेलन संयोजन समितीचे मार्गदर्शक महेंद्र जेजुरीकर व राजेंद्र गोस्वामी, सहसंयोजक रोहित इनामदार व संतोष पोतदार यांच्यासह परिसरातील मान्यवर व्यक्ती व मोठ्या संख्येने हिंदू नागरिक उपस्थित होते.
आपल्या धर्माने कायमच नाविन्याची कास धरली. जे जे वाईट होतं ते टाकून दिलं. साधुसंतांनीही समाजातील दोष दूर केले. आपणही धर्माच्या, समाजाच्या हिताचे हे तेच स्वीकारले पाहिजे. जे अयोग्य आहे त्याला ‘नाही’ म्हणता आले पाहिजे. त्यातूनच धर्मरक्षण शक्य होणार आहे असे शिंदे यावेळी म्हणाले.
कुटुंबाचे महत्त्व विशद करताना शिंदे पुढे म्हणाले, अहंकार गेला की कुटुंब एक राहते. पण अहंकर आला की कुटुंबातील सदस्य दूर होतात. साधने वाढली पण कुटुंबातील प्रेम कमी झाले. कुटुंब एकमेकांपासून दुरावली. पूर्वीच्या काळी साधनांचा अभाव होता पण प्रेम होते, सुख होते. आधुनिकीकरण, नाविन्य, नवीन तंत्रज्ञान, एआय हे सगळे स्वीकारा पण कुटुंबातील जिव्हाळा संपू देऊ नका अशी साद त्यांनी उपस्थितांना घातली. आपल्या भाषणात त्यांनी कुटुंबातील विविध नात्यांचे महत्त्व विविध रंजक उदाहरणे देऊन सांगितले.
व्याख्यानमालेच्या आजच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी संमेलनाची सुरूवात सामुहिक रामरक्षा पठणाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भंडारे, धातूशास्त्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ उदयन पाठक, सुप्रसिद्ध व्याख्याते व कवी तसेच आजचे मुख्य व्याख्याते गणेश शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक दिलीप चोरघे, नथाराम राठोड उपस्थित होते. यानंतर सांस्कृतिक वार्तापत्राच्या ‘हिंदू जागरणाची १०० वर्षांची यात्रा’ या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
*संघ शिवछत्रपतींच्या विचारांचा आहे -*
शिव-शंभू चरित्र व्याख्याते ह.भ.प. धर्मराज महाराज हांडे यांनी आपल्या आशीर्वचनपर उद्बोधनात धर्मकार्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी पुढे येण्याची आवश्यकता विशद केली. हिंदू समाजात आणखी प्रगल्भता यायला हवी हे सांगतानाच त्यांनी समाजात धर्माचरण वाढविण्याच्या आवश्यकतेवर जोर दिला. दक्षिण भारतातील हिंदू जाणीवपूर्वक हिंदू पेहराव परिधान करण्याचा आग्रह धरतात. मात्र आपण विसरत चाललो आहोत. आपण आपले संस्कार, संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवेत. डॉ. हेडगेवारांसारख्या महापुरुषांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला म्हणून आज आपण हे दिवस पाहत आहोत. हिंदुस्थानात संघ आहे म्हणूनच हिंदूस्थानचे नाव अजून हिंदुस्थान आहे. संघ हा शिवछत्रपतींच्या विचारांचा आहे असे हांडे यावेळी म्हणाले.
*हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीशक्तीला सर्वाधिक महत्त्व -*
भारतीय संस्कृतीमध्ये सर्वाधिक महत्व कुटुंबाला आहे. सुदृढ समाज होण्याची सुरूवात कुटुंबापासूनच होते. हिंदू समाजात कुटुंबामध्ये स्त्रीला सर्वाधिक महत्त्व आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भंडारे यांनी व्यक्त केले. सुदृढ कुटुंबाची सुरूवात मातृवंदनेपासूनच होते. आई मुलांवर संस्कार करते, मुलांना घडवते आणि त्यातूनच समाजासाठी सुदृढ असा नागरिक समाजासाठी निर्माण होतो. आणि म्हणूनच आपल्या हिंदूसंस्कृतीमध्ये आईला फार महत्त्व आहे. इतर कोणत्याही देशांमध्ये हे मानले जात नाही. पण आपल्या धर्मात आई ही जगज्जननी आहे असे त्या म्हणाल्या. स्त्री शक्तीचे वर्ण करताना पुढे त्या म्हणाल्या, पुराणकाळी देखील जेव्हा जेव्हा सृष्टीवर राक्षसरूपी शक्तींनी उन्माद केला आहे तेव्हा तेव्हा स्त्री ही महिषासुरमर्दिनीच्या रूपात अवतरली आहे. आणि त्या स्त्री शक्तीनेच समाजातील राक्षसांचा विध्वंस केला आहे. तीच स्त्री आजही आहे. आता राक्षसांचा प्रकार बदलला असला तरी त्यांचे निर्दालन करण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे. मात्र त्यासाठी विस्कळित झालेली कुटुंब पद्धती नीट करण्याची गरज भंडारे यांनी विशद केली.’स्व’ जागृत होणे आवश्यक -आपल्यावर आतापर्यंत सात वेळा विविध आक्रमकांनी भारतावर आक्रमणे केली. मात्र असे होऊनही भारत टिकून राहिला. याचे एकमेव कारण म्हणजे हिंदुत्व. भारताने स्वतःतील ‘स्व’ जिवंत ठेवला त्यामुळेच आज भारत हिंदू राहिला आहे असे मत धातूशास्त्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ उदयन पाठक यांनी व्यक्त केले. सध्या चर्चेत असलेला इराण हा देश एकेकाळी पारशी देश होता. ते अग्निपूजक होते. मात्र इसवीसनाच्या सातव्या शतकात त्यांच्यावर इस्लामी आक्रमण झाले आणि इराण मुस्लिम राष्ट्र बनले. आपला ‘स्व’ विसरल्यामळे त्यांच्यावर ही वेळ आली असे पाठक यावेळी म्हणाले. आपल्याला फक्त आक्रमणांचा इतिहास शिकवला जातो. मात्र प्रत्येक आक्रमणाला आपण पुरून उरलो हा विजयाचा इतिहास शिकवला जात नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
भारतीय कालगणना, मंदिर स्थापत्य परंपरा, धातूशास्त्र, वस्त्रोद्योग, नगररचना या बाबतीत आपण कायमच जगाच्या पुढे होते. विज्ञानाच्या आधारावर हिंदू संस्कृतीने आपली वाटचाल केलेली आहे हे सांगतानाच त्यांनी भारताच्या उज्ज्वल वैज्ञानिक परंपरेवर व गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकला. ‘स्व’ जागरणासाठी भाषा, भूषा, भवन, भोजन, भ्रमण आणि भोजन यांमध्ये हिंदुत्वाच्या विचारांचे महत्त्व त्यांनी विशद केले.
राष्ट्रीय गान वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची व तीन दिवसीय व्याख्यानमालेची सांगता झाली.



