नसरापूरची चिमुकली_ शिक्षा झाली पण खरा न्याय कधी?…

नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि निर्दयी हत्या प्रकरणामध्ये पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली.
पॉक्सो कायद्याअंतर्गत जलद गतीने हा न्याय निवाडा झाला. न्यायालयाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली. अत्यंत वेगाने तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयाने नराधमाला फाशीची शिक्षा सुनावून न्यायसंस्थेवरील विश्वास दृढ करण्याचे कार्य केले. या वासनांध आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर असून त्याची पार्श्वभूमी देखील गुन्हेगारीची आहे. आणि त्यामुळेच त्याला कदाचित असे गुन्हे वारंवार करण्यासाठी कोणतीही भीती वाटत नव्हती. ती भीती वाटावी कायद्याचा जरब बसावा यासाठी कायदा हातात न घेता ही सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो हे या निकालाने सिद्ध केले आहे.
या प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी जलद गतीने पूर्ण केला होता. सुमारे 1200 पानांचे आरोप पत्र दाखल झाले. तसेच डीएनए, सीसीटीव्ही फुटेज, आणि इतर परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयात सादर झाले. हा गुन्हा न्यायालयाने दुर्मिळा मधील दुर्मिळ अशा स्वरूपाचा असल्याचे नमूद करून कठोर शिक्षा ठोठावली.
विशेष न्यायालयात याकरता दैनंदिन स्वरूपात सुनावणी झाली.50 पेक्षा अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. केवळ 16 दिवसात साक्षी नोंदवल्या गेल्या आणि 55 दिवसात निकाल देण्यात आला, ही खरोखरीच स्पृहणीय घटना आहे.
फाशीची शिक्षा देण्यासाठी अनुकूल यंत्रणा राबवणाऱ्या माननीय न्याययंत्रणा, पोलीस प्रशासन, शासन व प्रशासन तपास यंत्रणा, सरकारी वकील व अन्य सर्व कर्मचारी या सर्वांनीच खरंतर समाजमन ओळखून पण कायद्याच्या कक्षेतच राहून काम केले, त्या सर्वांचे तोंड भरून कौतुक करणे गरजेचे आहे.
कायद्याचा हेतू आहे की माणसाला नाही त्यामधील वाईट वृत्तीला वृत्तीला मारायच आहे. मात्र असे असूनही अशा नराधमांना मात्र समाजात वावरण्याचा आणि जगण्याचाही कोणताही अधिकार प्राप्त होत नाही . या निकालाने ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पॉक्सो कायद्याअंतर्गत दिलेल्या या शिक्षेमुळे नक्कीच अशा प्रकारच्या वासनांध वृत्तींना आळा बसण्यास मदत होईल. अशाप्रकारे कठोर शिक्षा झाल्यामुळे असे कृत्य करण्यापूर्वी नक्कीच कोणीही व्यक्ती विचार करेल आणि कायद्याच्या भीतीमुळे ते करण्यास धजावणार नाही.
या घटनेनंतर समाजमन असे तयार झाले होते की सदर आरोपीला आमच्याकडे सुपूर्त करा अथवा त्याला गोळ्या घाला. खरे तर ज्या प्रकारे हा गुन्हा घडलाय त्या आरोपीला अशी शिक्षा देऊ असे वाटणे रास्तच आहे.
मात्र आपण भारतीय आहोत आणि आपल्याकडे सशक्त आणि संयमित असे संविधान आहे. त्यामुळे त्यानुसारच आपली न्याय प्रक्रिया चालते. पण निश्चितच अशा प्रकारच्या घटना झाल्यावर लवकरात लवकर न्याय आणि तो योग्य प्रकारे मिळणे गरजेचे आहेच. आणि तरच कायद्याची सशक्त अंमलबजावणी पण होईल, आणि असे कृत्य करणाऱ्यांना दहशत पण बसेल पण ती बसणार नसेल तर मात्र समाज कायदा हातात घेऊ पाहतो. म्हणूनच यापुढील काळात कायद्यामध्ये काही बदल होणे नक्कीच गरजेचे वाटते.
आपले संविधान नक्कीच सशक्त आहे पण त्याची अंमलबजावणी करताना गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करणे यासाठी जाणकार अभ्यासू लोकांचा एकत्रित येऊन केलेला प्रयत्न आणि कायद्यात घडवून आणलेले बदल याद्वारेच सर्व प्रकरणांमध्ये खरा न्याय मिळू शकेल.
गेलेली चिमुरडी आपण परत आणू शकत नाही, मात्र निर्दयी घटनेनंतरही कायद्याच्या रक्षकांनी दाखवलेली तत्परता समाज मनाला धीर देणारी ठरली आहे, आणि गुन्हेगारांना अखेरचा इशारा देणारी पण असेल. केवळ कागदोपत्री आधार देऊन चालणार नाही तर, शासन प्रशासन, पोलीस , न्याययंत्रणा, आणि समाजातील प्रत्येक घटकाने म्हणजेच तुम्ही व आम्ही असे अत्याचार रोखण्यासाठी सजग राहणे, तसेच संवेदनशीलता वाढवणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून वागणे हे अत्यंत गरजेचे आहे. मग त्यानंतर एकत्र येऊन कायद्यात बदल घडवणे आणि अशा घातक प्रवृत्तींना वेळीच ठेचण्यासाठी कठोर उपाय करणे यासाठी काही तरतुदी कायद्याने अमलात आणणे हे होऊ शकेल.
यासाठी आपल्याला न्याय प्रक्रियेवरच विश्वास ठेवून, कायद्याच्या चौकटीत राहून, सजगपणे वागून एकत्रित प्रयत्न करून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे, मात्र अशी घटना घडल्यावर कायद्याद्वारेच कठोर्तम शिक्षा आणि अशा प्रकरणांमध्ये फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा होण्याकरता एकत्रित दबाव आणणे गरजेचे आहे.
अर्थात सरते शेवटी एक प्रश्न मात्र उरतोच की शिक्षा तर ठोठावली मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होईल? तर अजून थोडा वेळ थांबावे लागेल कारण तो लांबचा पल्ला आहे. भारतीय संविधानानुसार आरोपी असला तरी त्याचेही अधिकार आहेत, यापुढील पायरी म्हणजेच हायकोर्ट ,सुप्रीम कोर्ट, दया याचिका या सगळ्या गोष्टी आल्याचं. मात्र आपण न्याय यंत्रणेवर विश्वास ठेवू आणि लवकरात लवकर हा नराधम फासावर लटकेल याची खात्री बाळगू.
ऍड अनिशा फणसळकर
ज्येष्ठ वकील, समुपदेशक, सायकोथेरपिस्ट, हायकोर्ट मेडिएटर,
समाजसेविका.



