६२ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिव, पुणे, मुंबई, रत्नागिरी, ठाणे, उपनगरची विजयी सलामी!

धाराशिवच्या महिलांचे सलग दोन विजय बाद फेरीत प्रवेश
अहिल्यानगर, ता. २८ (क्री. प्र.) : राज्य अजिंक्यपदाच्या रणांगणात पहिल्याच दिवशी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत धाराशिव, पुणे आणि मुंबई, उपनगरच्या संघांनी विजयी सलामी दिली. धाराशिवच्या महिला संघाने सलग दोन विजयांची नोंद करत बाद फेरीतील प्रवेश निश्चित केला, तर पुणे मुंबई व उपनगरच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. रत्नागिरीच्या महिला संघाने नांदेडचा ६४-६ असा धुव्वा उडवत ५८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. सांगली, सोलापूर, ठाणे संघांनीही पहिल्या दिवशी विजयाची नोंद करत स्पर्धेत दमदार सुरुवात केली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने स्व. अरुणकाका जगताप क्रीडा नगरी, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे ६२ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सुरू झाली.
धाराशिवच्या महिलांचा दुहेरी विजय; बाद फेरीत प्रवेश!
महिला गटात धाराशिवने सलामीच्या सामन्यात पालघरवर ३४-१० असा एक डाव राखून २४ गुणांनी विजय मिळवला. मैथिली पवारने (१.१० व नाबाद ३ मि. संरक्षण आणि २ गुण) अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात धाराशिवने परभणीवर ४३-८ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सुहानी धोत्रे (१.४० मि. संरक्षण व १२ गुण) हिने आक्रमण आणि संरक्षणात प्रभावी कामगिरी केली. सलग दोन विजयांसह धाराशिवच्या महिला संघाने बाद फेरीत स्थान निश्चित केले.
पुरुष गटातही धाराशिवने छत्रपती संभाजीनगरवर ४३-१६ अशी २७ गुणांनी मात केली. धाराशिवकडून जितेंद्र वसावे (२.३० मि. संरक्षण व १० गुण), राज जाधव (२.५० मि. संरक्षण व ४ गुण) आणि रवी वसावे (२.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला. छत्रपती संभाजीनगरकडून गणेश पियुद आणि सार्थक थाटेकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत प्रतिकार केला.
पुण्याचे दोन्ही संघ विजयी; महिलांचा ४६ गुणांनी दणदणीत विजय!
पुण्याच्या महिला संघाने लातूरवर ५६-१० असा ४६ गुणांनी एक डाव राखून विजय मिळवत आपल्या आक्रमणाची ताकद दाखवली. दीपाली राठोडने १० गुण, तर प्रियांका इंगळेने १२ गुणांसह १ मि. संरक्षण करत पुण्याच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
पुरुष गटात पुण्याने जळगाववर ४०-२२ असा १८ गुणांनी एक डाव राखून विजय मिळवला. पुण्याकडून अभिषेक भोसले (२.३५ मि. संरक्षण) आणि अथर्व ढाणे (२.१५ मि. संरक्षण) यांनी बचावात प्रभावी कामगिरी केली. जळगावच्या मोहित गुंजकरने ४ गुण मिळवत संघाच्या गुणसंख्येत भर घातली.
मुंबई उपनगरचे दोन्ही संघ विजयी; महिलांचा हिंगोलीवर एक डाव राखून विजय!
मुंबई उपनगरच्या महिला संघाने हिंगोलीवर ४४-१२ असा एक डाव राखून विजय मिळवला. आर्या भाटकर (२ मि. संरक्षण व १० गुण), कृतिका वाघमारे (४.२० मि. संरक्षण) आणि देविका अहिरे (३.५० मि. संरक्षण) यांनी संघाच्या विजयाची घडी बसवली.
पुरुष गटात मुंबई उपनगरने नांदेडला ३५-१४ असे पराभूत केले. मुंबई उपनगरकडून रामचंद्र झोरे (३.४० मि. संरक्षण व ४ गुण) आणि अनिकेत चेंदवनकर (२.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. नांदेडच्या सिद्धिविनायक जानगीलवाडने ४ गुण मिळवत प्रतिकार केला.
सोलापूरच्या आक्रमणापुढे सिंधुदुर्ग निष्प्रभ!
पुरुष गटात सोलापूरने सिंधुदुर्गवर ४४-१८ अशी २६ गुणांनी मात करत विजयी सलामी दिली. सोलापूरच्या कृष्णा बनसोडे (२ मि. संरक्षण व ६ गुण) आणि प्रतीक शिंदे (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) यांनी अष्टपैलू खेळ करत विजयात निर्णायक योगदान दिले. सिंधुदुर्गच्या सिद्धेश आगाने (१.१० मि. संरक्षण व २ गुण) याची एकाकी झुंज संघाचा पराभव टाळू शकली नाही.
रत्नागिरीच्या महिलांचा नांदेडवर ५८ गुणांनी धुव्वा!
महिला गटातील सामन्यात रत्नागिरीने नांदेडवर ६४-६ असा ५८ गुणांनी एक डाव राखून विजय मिळवत प्रतिस्पर्ध्याला पूर्णपणे निष्प्रभ केले. रत्नागिरीच्या वैष्णवी फुटकने तब्बल १६ गुण मिळवत आक्रमणात वर्चस्व गाजवले. आर्या डोरलेकरने २.२० मि. संरक्षण आणि १४ गुणांची कमाई करत विजयात मोलाची भर घातली. रत्नागिरीच्या आक्रमणाचा वेग आणि संरक्षणातील भक्कम कामगिरीसमोर नांदेडला फारशी संधी मिळाली नाही.
सांगलीचा जालनावर ५६ गुणांचा विजय!
पुरुष गटात सांगलीने जालनावर ६०-४ असा एक डाव राखून ५६ गुणांनी मोठा विजय मिळवला. सांगलीकडून आयुष लाडने १२ गुण, ओम पाटीलने ३.४० मि. संरक्षण आणि गणेश बाबळेने ३.०० मि. संरक्षण करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. जालनाच्या रेहान शेखने दोन गडी बाद करत बचावात योगदान दिले.
मुंबईची पालघरवर पाच गुणांनी मात; सामना अखेरपर्यंत रंगला!
पुरुष गटातील तुल्यबळ लढतीत मुंबईने पालघरवर ४१-३६ अशी पाच गुणांनी मात करत विजय मिळवला. मुंबईच्या सम्यक जाधवने धारदार आक्रमण करत १२ गुण मिळवले, तर वेदांत देसाईने (१.२० मि. संरक्षण व ८ गुण) अष्टपैलू योगदान दिले. पालघरकडून मंदार बंडावे (१.२० मि., १.१० मि. संरक्षण व ८ गुण) आणि सोहम महाले (८ गुण) यांनी जोरदार झुंज दिली. अखेर मुंबईने पाच गुणांची आघाडी राखत विजयावर शिक्कामोर्तब केले.
ठाण्याची हिंगोलीवर मात; बचावात खेळाडूंची चमक!
अन्य पुरुष गटातील सामन्यात ठाण्याने हिंगोलीवर ४८-१६ असा विजय मिळवला. ठाण्याकडून सिद्धेश चिकणे (३.१० मि. संरक्षण) आणि शुभम जाधव (२.३० मि. संरक्षण) यांनी बचावात चांगली कामगिरी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. हिंगोलीकडून राहुल गायकवाडने गुण मिळवत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.



