ताज्या घडामोडी

अश्रूंनी डबडबले डोळे, गहिवरलेल्या मनाने मुदकन्ना दाम्पत्याला अखेरचा निरोप!

आई-वडिलांचे शाळेसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाही; कन्या तेजस्विनी यांची भावनिक ग्वाही
मुरूम, ता. उमरगा, ता. २७ (प्रतिनिधी) : शहरातील ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरणाप्पा मुदकन्ना व संस्थेच्या सचिव सुषमा शरणाप्पा मुदकन्ना यांचे तीन दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील जहीराबाद येथे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने मुरूम शहरासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. २७) ज्ञानदान शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित शोकसभेत हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी अश्रुपूर्ण वातावरणात या सेवाभावी दाम्पत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेच्या प्रारंभी शरणाप्पा व सुषमा मुदकन्ना यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली. यावेळी शाळेचे मैदान विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिकांच्या उपस्थितीने खचाखच भरले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख आणि मनात या दाम्पत्याच्या अकाली जाण्याची वेदना स्पष्टपणे जाणवत होती. या शोकसभेस डॉ. लिंबण्णा मुदकन्ना, शिवसेना नेते चंद्रशेखर मुदकन्ना, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे, भाजप नेते श्रीकांत मिनियार, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, प्रा. डॉ. अनिता मुदकन्ना, प्रा. डॉ. महेश मोटे, उद्योजक मनीष मुदकन्ना यांच्यासह मुदकन्ना परिवारातील सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी शिक्षिका प्रतिनिधी श्रीमती महामुनी, महिला पालक प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी किरण गायकवाड, दत्तात्रय इंगळे, प्रा. डॉ. महेश मोटे, श्रीकांत मिनियार, शिवशरण वरनाळे, मनीष मुदकन्ना, चंद्रशेखर मुदकन्ना, प्रा. डॉ. अनिता मुदकन्ना यांनी आपल्या मनोगतातून मुदकन्ना दाम्पत्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. मात्र, या सभेतील सर्वाधिक हृदयस्पर्शी क्षण ठरला तो त्यांच्या मुलांच्या मनोगताचा. अपघातात आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या चिरंजीव वीरकुमार यांनी अत्यंत भावुक अवस्थेत आपल्या भावना व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. तर कन्या तेजस्विनी यांनी अश्रू अनावर होत असतानाही आई-वडिलांनी शहरातील शाळेच्या माध्यमातून भावी पिढी घडविण्याचे जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करेपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशी ठाम ग्वाही दिली. आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला.
आई-वडिलांच्या निधनाचे दुःख मनात असतानाही त्यांनी उभ्या केलेल्या शैक्षणिक कार्याची जबाबदारी पूर्ण करण्याचा तेजस्विनी यांनी व्यक्त केलेला निर्धार उपस्थितांच्या काळजाला भिडला. त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण सभा भावुक झाली. अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. दुःखाच्या डोंगराखाली असतानाही आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची त्यांनी दिलेली ग्वाही उपस्थितांसाठी आश्वासक ठरली. शोकसभा संपल्यानंतर उपस्थित महिला व पुरुष नागरिकांनी मुदकन्ना दाम्पत्याच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अखेरची आदरांजली वाहिली. या शोकसभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. बागवान यांनी केले. सूत्रसंचालन व आभार शिक्षक मनोज बोंदर यांनी केले.
चौकट : एका अपघाताने दोन कर्तृत्ववान व्यक्तींची साथ हिरावली; मात्र त्यांनी पाहिलेले शैक्षणिक स्वप्न पुढे नेण्याचा निर्धार त्यांच्या मुलांनी व्यक्त केला. मुदकन्ना दाम्पत्याच्या स्मृतींना उजाळा देणारी ही शोकसभा उपस्थितांच्या मनात कायमची घर करून गेली.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील शांती निकेतन विद्यालयात आयोजित शोकसभे प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व अन्य.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??