ताज्या घडामोडी

शिक्षकांना पोशाखसंहिता म्हणजे सरकारचा शिक्षकांवर अविश्वास…

Spread the love

शाळेतील सर्व शिक्षकांना पोशाखसंहिता लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने या परिपत्रकात जी भूमिका मांडली आहे, त्यात चुकीचे काहीच नाही.मात्र शिक्षकांमध्ये विवेक आणि शहाणपण उरलेले नाही का? आपण काय घालावे आणि काय घालू नये हे ठरवता येऊ नये इतकी शिक्षकाची विचारपातळी घसरली आहे का? तसे चित्र नक्कीच नाही. मग ही पेहराव संहिता लागू करण्यामागचा हेतू काय ? मला वाटते हे सरकार शिक्षकांवर अविश्वास दाखवत आहे. शिक्षणक्षेत्रात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाचा पराभव तर नाही ना? ज्या देशाचे भविष्य शिक्षकांच्या हाती आहे, त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या समोर जाताना कोणता पेहराव करुन जावे हे सांगण्याची वेळ आली असेल तर शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली, असेच म्हणावे लागेल. आपले शिक्षणक्षेत्र खरचं इतके खालावले आहे का? शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक चुकीचा पेहराव करुन जात आहेत का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.

राज्य सरकारने परिपत्रकात मार्गदर्शक स्वरुपाच्या सूचना दिल्या आहेत.प्रश्न असा आहे की सूचित केलेल्या पेहरावाची सक्ती करून शिक्षण क्षेत्रातील समस्यांचे निराकरण आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे का? शिक्षकांचा पेहराव चांगलाच असायला हवा यात शंका नाही. पण तसे ते रहात नसतील तर कारवाई करण्यासाठी शासनाची प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात आहे. त्यांनी कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी अशा स्वरूपाचे स्वतंत्र परिपत्रक जारी करण्याची वेळ येते हे फार आशादायी चित्र नाही.
शालेय स्तर ते महाविद्यालय, विद्यापीठ स्तरापर्यंत महिला शिक्षिका नेहमीच साडी परिधान करून जातात. ग्रामीण भागात तर सलवार कुर्ता परिधान करून शाळेत जाणाऱ्या शिक्षिकांचे प्रमाण किती? नक्षीकाम केलेले, रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत जाणारे शिक्षक किती? मला वाटते जिन्स वापरणारे ही अगदी नगण्य असतील. अगदी बहुरूपी पेहराव करुन शिक्षक शाळेत जात असतील, अशी शक्यताही फार कमी वाटते. शिक्षणशास्त्र शिकताना शिक्षकाची गुणवैशिष्टये शिकवली जातात. त्याच्या गुणांबद्दल चर्चा केली जात असते. शिवाय आपण शिक्षक आहोत आपल्यावर कोणकोणत्या जबाबदा-या आहेत याची जाणीव विकसित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असतो.अशा वेळी शिक्षकांचा पेहराव कसा असू नये हे जे सांगितले आहे, तसा पेहराव करुन शाळेत जाणारे किती? २४० दिवस शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाला एकच रंग असणाऱ्या गणवेशात पाहिल्यावर आनंदी शिक्षण होईल? शाळेतील शिक्षकांचे व्यक्तिमत्व प्रसन्न असावे असे म्हणतात मग एकाच रंगाचे पेहराव करुन आलेल्या शिक्षकांना आनंद कसा मिळेल? ते आनंदी नसतील तर ते आनंदाने कसे शिकवतील ? शिक्षक प्रश्नमुक्त आणि आनंददायी असयला हवा हे लक्षात घ्यायला हवे.
शिक्षणक्षेत्रात दिवसेंदिवस बिकट होणारे प्रश्न सोडविण्यासाठी संघटना सक्रियता दाखवत आहेत आणि शासन स्तरावरून त्याला पुरेसा वेळ दिला जात नाही ही वस्तुस्थिती आहे ती नाकारून चालणार नाही.प्रशासनातील भ्रष्टाचार ,कामांची अडवणूक ,प्रशासनातील गतिमानता या बाबीकडे होणारे दुर्लक्ष याचा गांभीर्याने विचार केला तर शिक्षकसंघटना आणि शासन यांच्यातील दरी कमी होईल. शिक्षणात परिवर्तन होण्यासाठी शासनाने पावले टाकली तर सरकार सोबतच शिक्षक रहातील.
राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्याची गरज असताना शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या उपाय योजना बाबत प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले पाहिजे पेहराव्या सारख्या अनाठायी मुद्यावर अधिकारवादाची भूमिका मांडून संघर्ष करण्यापेक्षा शिक्षकांचा योग्य सन्मान कसा राखला जाईल याची काळजी सरकारने घ्यावी असे वाटते.प्रा. दिलीप आनंदराव जाधव,सचिव*
*सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली*
*७६२०८४८६४९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!