ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी.. वॉश व डिजिटल क्लासरूमचे अनावरण

Spread the love

कोर्टीवा क्रॉप इंडिया प्रा. लि. चा उपक्रम
पायाभूत व आधुनिक सुविधांचा संगम
विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र ‘वॉश ‘ प्रकल्प उभारणी
तीन ई – लर्निंग वर्गाची निर्मिती

चिपळूण /खेड दि. ४ (वार्ताहर प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुसज्ज पायाभूत सुविधा आणि याचबरोबर एकवीसाव्या शतकातील तंत्रज्ञानाचा आधार देऊन उज्वल भविष्याची स्वप्न साकार करण्यासाठी कोर्टीवा क्रॉप इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून व उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंत विद्यालय -धामणंद (ता खेड) येथे १५ लाख रुपये खर्चून विद्यार्थी- विद्यार्थिनीं करिता स्वतंत्र वॉश प्रकल्प राबविण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या अभावी मागे पडू नये यासाठी तीन अत्याधुनिक डिजिटल क्लासरूम ची निर्मिती ई लर्निंग प्रकल्पांतर्गत करण्यात आली आहे.* हे दोन्ही प्रकल्प नुकतेच शिक्षण संस्था व विद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात करण्यात आले.

दिशान्तर संस्था गेल्या दोन तपापासून शिक्षण, आरोग्य, उपजीविका, वस्ती व ग्राम विकास या संदर्भाने काम करीत आहे. यातून कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक पेढी या माध्यमातून ३० हजार विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. प्राथमिक ते माध्यमिक विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक साहित्य देण्यात येते. तर महाविद्यालयीन ते उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून ३५ लाख रुपयांहून अधिक रक्कमेची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. याशिवाय उपजीविका व ग्रामविकास या क्षेत्रामध्ये संस्थेने केलेले काम हे गौरवास्पद ठरले आहे.

दिशान्तर संस्थेच्या या कामाला यावर्षीपासून कोर्टीवा क्राॅप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून पाठबळ मिळाले आहे. कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्वातून दुर्बल आणि वंचितांसाठीच काम अधिक वेगाने सुरू आहे. या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आणि प्रेरणादायी उपक्रम राबवले जात आहेत. यापैकीच एक असणारा वॉश प्रकल्प हा विद्यार्थ्यांच्या स्वच्छता आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. खेड तालुक्यातील यशवंत विद्यालय धामणंद या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून अत्याधुनिक पद्धतीची सुविधा उभारली गेली आहे. यासाठी दोन स्वतंत्र आरसीसी इमारती उभारण्यात आल्या. त्यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठी दहा युरिनल्स, दोन भारतीय व दोन पाश्चात्त्य पद्धतीची टॉयलेट्स, सहा वॉश बेसिन्स, मुलींकरता एक चेंजिंग रूम अशी व्यवस्था उभारून देण्यात आली आहे. यासह आवश्यक ती प्रसाधन साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पूर्वीच्या दुरवस्थेतील इमारती ठिकाणी उभारण्यात आलेल्या या नवीन आधुनिक वॉश प्रकल्पातून २४ तास पाणी व वीज अशी व्यवस्था असेल. पायाभूत सुविधेच्या पण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा अत्यंत गरजेच्या या प्रकल्पाबद्दल विद्यार्थिनी विद्यार्थी शिक्षक व संस्था पदाधिकाऱ्यांनी खास कृतज्ञता व्यक्त केली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही. पण, या गुणवत्तेला पोषक वातावरण मिळायला हवे. याच हेतूने कोर्टीवा क्रॉप इंडिया प्रा लि व दिशान्तर या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तीन डिजिटल क्लासरूम उभारण्यात आले आहेत. ज्यामध्ये संगणक व्यवस्था, प्रोजेक्टर, स्क्रीन यासह माध्यमिक ते कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत डिजिटल अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी हे शैक्षणिक स्पर्धेमध्ये कमी पडू नयेत यासाठी अत्याधुनिक पद्धतीची ई लर्निंग वर्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वर्गाच्या माध्यमातून क्रमिक अभ्यासक्रमाचे डिजिटल धडे विद्यार्थ्यांना दृक श्राव्य पद्धतीने अध्ययन करता येणार आहेत.
या दोन्ही उपक्रमाचे शिक्षण संस्थार्पण कार्यक्रमासाठी कोर्टीवा क्रॉप इंडिया प्रा लि. चे साईट व प्रोडक्शन लीडर श्री. विक्रमसिंह चव्हाण, व्यवस्थापकीय अधिकारी जयंता शेठ व आशियाई पॅसिफिक विभागाचे आय.टी. प्रमुख श्री. चंदर खन्ना यांची विशेष उपस्थिती होती. तर दिशान्तर संस्थेतर्फे सीमा यादव, शर्वरी कुडाळकर, राजेश जोष्टे तसेच शाळा मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षण संस्था पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी दुरवस्थेतील यापूर्वीच्या प्रसाधनगृहामुळे होणाऱ्या कुचुंबना दूर होऊन एक आधुनिक पद्धतीचे सुसज्ज प्रसाधनगृह उपलब्ध झालेबद्दल तसेच आधुनिक युगातील डिजिटल क्लासरूम उपलब्धता याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या मांगल्यपूर्ण कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी कंपनी अधिकाऱ्यांचे स्वागत ढोल लेझीम तसेच औक्षण करून केले. शिक्षण संस्थेतर्फे कंपनी अधिकाऱ्यांचा कृतज्ञता सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसबे सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!