क्रीडा व मनोरंजन

आजपासून विद्यार्थी क्रीडा केंद्राची राज्यस्तरीय खो- खो स्पर्धा

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

मुंबई, ता २१ : परळच्या विद्यार्थी क्रीडा केंद्रातर्फे ६९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ५९ व्या राज्यस्तरीय निमंत्रित खो-खो स्पर्धेचे आयोजन परळ येथील लाल मैदानात २२ ते २६ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे. व्यावसायिक, जिल्हा संघ अश्या एकत्रित पद्धतीने पुरुष आणि ४ फूट ११ इंच अशा कुमार गटाचे आयोजन या स्पर्धेत करण्यात आले आहे. कुमार गटात १६ आणि पुरुष विभागात १२ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. खासदार स्व. मोहन रावले यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेत आकर्षक रकमेची रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून विजेत्या संघाला आकर्षक चषक भेट देण्यात येईल. प्रत्येक सामन्यातील सामनावीर, प्रत्येक दिवसाचा मानकरी, स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू, स्पर्धेतील अष्टपैलू, संरक्षक, आक्रमक ही विशेष पारितोषिके देखील स्पर्धेत ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी क्रीडा केंद्र सलग ५९ वर्षे खो-खो स्पर्धेचे यशस्वी आयोजन करत आहे. महाराष्ट्र खो-खो असोसिएशन आणि मुंबई खो-खो संघटना यांच्या मान्यतेने या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. कुमार गटाचे सामने बाद पद्धतीवर होतील. तर पुरुष गटाचे सामने “लिग कम नॉकआऊट” पद्धतीवर होणार आहेत. १९५४ साली विद्यार्थी क्रीडा केंद्राची स्थापना झाली. यंदाच्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि प्रो खो-खो खेळलेल्या खेळाडूंचा सहभाग आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता शिवसेना युवा नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद् घाटन होणार आहे. यावेळी खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार पद्मश्री डायना एडुलजी देखील उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेतील सहभागी संघ (४ फूट ११ इंच कुमार गट) – विहंग, दत्तसेवा, नवशक्ती, श्री समर्थ व्यायाम मंदिर, ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर, वैभव क्लब, महात्मा गांधी, विद्यार्थी क्रीडा केंद्र, प्रबोधन क्रीडा भवन, नंदादीप, ग्रीफिन जिमखाना, ओमसाईश्वर सेवा मंडळ, ओम युवा, सरस्वती,फादर ॲग्नेल

(पुरुष संघ) – पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, महावितरण, मुंबई पोलिस, विद्यार्थी क्रीडा केंद्र (मुंबई), महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी (मुंबई उपनगर), विहंग (ठाणे), नव महाराष्ट्र (पुणे), संस्कृती संघ (नाशिक), छत्रपती क्रीडा मंडळ (उस्मानाबाद), उत्कर्ष क्रीडा मंडळ (सोलापूर), राणा प्रताप – कुपवाड (सांगली)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!