ताज्या घडामोडी

मुरूम शहरात वंचित बहुजन आघाडीचा शिरकाव

Spread the love

मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते उद्घाटन

मुरुम, ता. उमरगा, ता. ७ (प्रतिनिधी) : राज्यात चाललेल्या सत्ता संघर्षात जनतेच्या विकासाचा मूलभूत विचार बाजूला सारून राज्यकर्ते स्वतःचा फायदा करून घेण्यात मश्गूल आहेत. त्यांनी प्रत्येकांना गृहीत धरले आहे. त्यामुळे अशा अराजकतेच्या परिस्थितीत वंचित बहुजन आघाडी सारखा स्वाभिमानी बाणा असलेला पक्षच लोकांना न्याय देणारा आहे, असे मत वंचीतचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी यावेळी व्यक्त केले. शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात गुरुवारी (ता. ६) रोजी सामाजिक कार्यकर्ते प्रणित गायकवाड यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन केली. मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धाराशिव जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, मराठवाडा महासचिव अँड. रमेश गायकवाड, राज्य समन्वयक प्राचार्य शहाजी चंदनशिवे, धनंजय सोनटक्के, परमेश्वर लोखंडे, रामभाऊ गायकवाड, आर. एस. गायकवाड, श्रीधर सरपे, कृष्णा शिनगारे, के. टी. गायकवाड, कुंदन वाघमारे, चंद्रहास बनसोडे, गोविंद भंडारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आर. एस. गायकवाड, के. टी. गायकवाड, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे, धनंजय सोनटक्के, बी. डी. शिंदे यांनी मनोगते व्यक्त करतांना सांगीतले की, शिक्षणाचे वाटोळे करण्याचे काम हे केंद्र सरकारने केले आहे. त्याला राज्य सरकारने साथ दिली आहे. देशाचा गृहमंत्री हा गुजरात राज्यातून तडीपार केलेला माणूस आहे. हे सरकार राजकारणाच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करीत आहे. दंगे घडवत आहेत आणि यांना वठणीवर आणायचे असेल तर ते काम वंचित आघाडीच करु शकते. आज संपूर्ण राज्यातील नागरिकांचे लक्ष वंचित आघाडीच्या निर्णयाकडे आहे. आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यात यावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतले आहे की, आईचं दुध कधी विकले जात नाही, त्याप्रमाणे आपले मत विकु नका. अनेक राजकीय नेते त्यांच्या स्वतःच्या सोयीसाठी पक्ष बदलत आहेत, त्यांनी आपल्याला गृहीत धरले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वेळीच विचार करावा. वंचीत आघाडीत दुर्लक्षित करण्यात आलेल्या समाजाला न्याय मिळतो कारण या आघाडीत पारधी, कैकाडी समाजाचे नेते आहेत. आलुतेदार-बलुतेदार यांना सोबत घेऊन दंगा करण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्यांना, वंचितांना न्याय देण्यासाठी वंचित आघाडी कार्यरत असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.  मुरुम, ता. उमरगा येथील अण्णाभाऊ साठे चौकात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी मान्यवर व पदाधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!