ताज्या घडामोडी

लालठाणेतील माहेरवाशीणींचा मेळावा, पारंपारिक गाण्यांसह नृत्याची मेजवानी

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
अलीकडे धावपळीच्या या युगामध्ये नाते टिकणे कठीण होत असतानाच आपलं नातं दृढ करण्याच्या उद्देशाने पालघर तालुक्यातील लालठाणे गावातील माहेरवाशीणी एकत्रित येऊन माहेरवाशीणींचा दोन दिवसांचा मेळावा शनिवारी आणि रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. माहेरवाशीणींच्या मेळाव्याचे हे दुसरे वर्ष होय.

बदलत्या जीवनशैलीचा सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनमानात सुद्धा मोठा बदल झाला असून आत्ता नोकरी- व्यवसायामुळे बऱ्याच वेळा माहेरी जास्त येता येत नाही. संसाराचा गाढा चालवत असतांना मुलांच्या शाळा तसेच इतर काही अडचणी सतत येत असल्याने माहेरला वेळोवेळी जाता येत नाही. अशी खंत काहींनी व्यक्त करत असतानाच माहेरवाशीनींसाठी आयोजित केलेल्या या दोन दिवसीय मेळाव्यात मात्र धमाल केली. कित्येक जणी तर गेल्या कित्येक वर्षानंतर प्रथमच एकत्र आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील ऐतिहासिक वनदुर्ग तांदूळवाडी किल्ल्याच्या पायथ्याशी लालठाणे हे गाव वसलेले आहे. हे एक आदर्शवत असे गाव आहे. या गावातील अगदीच नवविवाहितांपासून ६०-६५ वर्षापर्यंतच्या ४३ माहेरवाशींनी मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या दैनंदिन कामाच्या व्यापातून मुक्त होऊन अक्षरशः खूप मौज-मजा-मस्ती केली.

लालठाणे येथील माहेरवाशीणी प्रगती पाटील, वैशाली पाटील शाह, कविता पाटील राऊळ, दर्शना पाटील, वंदना पाटील, पुनम पाटील आदींनी पुढाकार घेऊन व्हाट्सअप वर माहेरवाशीणींचा ग्रुप तयार करून प्रथम मेळाव्यास इच्छुकांची नोंदणी केली. त्यानंतर योग्य ठिकाण ठरवलं गेलं. त्यानंतर या मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यामध्ये माहेरवाशीणींनी एकमेकींची विचारपूस करत पारंपारिक गाण्यांवर नृत्य केले. त्याचबरोबर मिमिक्री करून आपल्या दैनंदिन कामातून विरंगुळा घेत मनमुराद आनंद लुटला. तसेच परंपरागत लोप पावणारी गीतं गाऊन, पासिंग बॉल, अंताक्षरी, तळ्यात मळ्यात, संगीत खुर्चीचा खेळ खेळून बालपणातील आनंद सुद्धा कित्येक वर्षानंतर लुटला. या मेळाव्यात मिळालेली ऊर्जा वर्षभरासाठी पुरेल अशी भावना मनी बाळगून दरवर्षी मेळावा घेण्याचे निश्चित करून हळदी कुंकवाने मेळाव्याचा समारोप झाला. या मेळाव्याच्या शेवटी एकमेकींचा निरोप घेतांना बऱ्याच जणींच्या डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. माहेरवाशीनींचा दोन दिवसांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!