ताज्या घडामोडी

शासनाने शाळांना भौतिक सुविधा पुरविण्याकडे विशेष लक्ष द्यावे, माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर यांचे प्रतिपादन

Spread the love

पालघर , तारीख ३
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर व शिक्षण विभाग माध्यमिक जि.प. व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृध्दी तालुकास्तरीय तीन दिवसीय प्रशिक्षणाची दुसरी बॅचचे प्रशिक्षण शनिवारी (तारीख २) माहीम येथील भुवनेश कीर्तने विद्यालयात पार पडले.या तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर, भुवनेश कीर्तने विद्यालयाचे पर्यवेक्षक संतोष शेलार, तज्ञ मार्गदर्शक प्रमोद पाटील, अविनाश रडे, पालघर -ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान, तालुका समन्वयक डि.के. संखे, दत्तात्रेय कोंडेकर, सुलभक विजयानंद सोनावणे, अश्विनी पाटील, ज्योत्स्ना पाटील, चेतन पाटील, नम्रता राऊत, प्रमोद घरत,दिलीप किणी, रुपेश राऊत, सचिन संखे,सुशील ठाकूर, संत्या बेडगा ,विलास देवडकर, वृषाली म्हात्रे आदी सुलभक उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजय ठाकूर यांनी सांगितले की, शासनाने शिक्षणावर अधिकाधिक भर देणे आवश्यक असून शाळांमध्ये अत्यावश्यक असलेल्या भौतिक सुविधांसह शिक्षकांची भरती व्हावी. नवीन होणारे बदल शिक्षकांनी आत्मसात करून प्रभावीपणे राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. तज्ञ मार्गदर्शक प्रमोद पाटील यांनी तालुक्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना शिकवणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या प्रशिक्षणाची ही दुसरी बॅच असून पहिल्या बॅचमध्ये १२० शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेचे नियमित कामकाज सुरू ठेवून हे प्रशिक्षण पूर्ण करावयाचे आहे. तालुक्यातील उर्वरित शिक्षकांची पुढील बॅच लवकरच सुरू होईल असे सांगून आगामी काळामध्ये उपक्रमशील शिक्षकांसाठी सिंगापूर येथे शिक्षकांच्या शैक्षणिक परिषदेचे आयोजन केले जाणार आहे असे सांगितले. माहीम शिक्षण संस्थेने प्रशिक्षणासाठी शाळा उपलब्ध करून दिल्याने संस्थेचे आणि शाळेचे विशेष आभार व्यक्त केले.

प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी पालघर ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गणेश प्रधान यांनी आतापर्यंत झालेल्या प्रशिक्षणांमध्ये हे एक उत्कृष्ट प्रशिक्षण मिळाले आहे असे सांगून या प्रशिक्षणाचा उपयोग शिक्षकांनी आपापल्या शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी करावा असे सांगितले. तर प्रशिक्षणार्थी म्हणून तीलोतमा पाटील यांनी तीन दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या बारा पैलूंवर मिळालेले प्रशिक्षण हे आम्हा प्रशिक्षणार्थांसाठी मोठी मेजवानी असून उत्कृष्ट नियोजन आणि तज्ञ मार्गदर्शकांचा सखोल अभ्यास आम्हा प्रशिक्षणार्थांसाठी खूप काही देऊन गेला असे सांगितले. तज्ञ मार्गदर्शकांमधून सुशील ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. तर उर्मिला घरत यांनी शैक्षणिक पोवाडा सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

यावेळी कवयित्री उर्मिला घरत, लेखक मंगेश तांडेल आणि लेखक प्रमोद पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे मान्यवरांकडून कौतुक करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जगदीश यांनी केले तर आभार प्रदर्शन सिद्धार्थ शिरगावकर आणि सूत्रसंचालन माधवी राऊत यांनी केले. तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत येणाऱ्या बारा घटकांवर मार्गदर्शकांकडून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणाचा तालुकास्तरीय दुसरा टप्पा पूर्ण झाला असून दिनांक ७ फेब्रुवारीपासून प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असून हे प्रशिक्षण इयत्ता नववी ते बारावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसह मुख्याध्यापकांसाठी बंधनकारक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!