समाजसेवेचा वसा आणि माणुसकीचा झरा… सौ. रुपालीताई शिंदे

समाजात अनेक व्यक्ती कार्यरत असतात, पण काही व्यक्ती आपल्या कर्तृत्वाने आणि सेवाभावाने इतरांच्या आयुष्यात आशेचा किरण बनतात. ज्यांच्या शब्दांत मायेची ऊब आणि कृतीत निस्वार्थीपणा असतो, त्या खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात. धाराशिव जिल्ह्यातील मुरूमच्या मातीतील एक असेच तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे सौ. रुपालीताई शिवाजीराव शिंदे. केवळ कुटुंब सांभाळून न थांबता, सामाजिक जबाबदारीचे भान राखत त्यांनी उभी केलेली ही ‘यशोगाथा’ आज अनेकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
संस्कारांची शिदोरी आणि वाटचाल :
१६ जुलै १९७७ रोजी मिरज येथे जन्मलेल्या रुपालीताईंचे बालपण संस्कारक्षम वातावरणात गेले. वडील उद्योजक श्री. मारुती खंडारे आणि आई सिंधुताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संगोपन झाले. १९९५ मध्ये डॉ. शिवाजीराव शिंदे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. डॉ. शिंदे हे भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयात वर्ग-१ चे अधिकारी म्हणून कार्यरत असूनही, त्यांनी कधीही सत्तेचा बडेजाव आपल्या व्यवहारात येऊ दिला नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हीच त्यांच्या यशस्वी संसाराची गुरुकिल्ली ठरली आहे.
व्हीव्हीए फाउंडेशनच्या माध्यमातून सेवाव्रत :
रुपालीताईंचा सेवाभाव केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसून तो ‘व्हीव्हीए फाउंडेशन’च्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरला आहे. या कार्यात त्यांची कन्या ऐश्वर्या आणि चिरंजीव प्रतीक यांनाही सहभागी करून घेतले आहे. फाउंडेशनद्वारे शैक्षणिक साहित्याचे वाटप, शाळांचे सक्षमीकरण, निराधार कुटुंबांना मदत, वृक्षारोपण आणि पाणीपुरवठ्यासारख्या सोयीसुविधा पुरवून त्यांनी सामान्य माणसाच्या आयुष्यात आनंद पेरण्याचे काम केले आहे.
डिजिटल शिक्षणाचे नवे दालन :
मुरूम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चार ‘स्मार्ट टीव्ही’ संच भेट देऊन डिजिटल शिक्षणाची दारे खुली करून दिली. गरीब व होतकरू मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याचा त्यांचा निर्धार, त्यांच्या संवेदनशीलतेची साक्ष देते. आरोग्य क्षेत्रातील कार्य असो किंवा कोविड काळातील मदत, त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.
राष्ट्रीय स्तरावर गौरव :
त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. २८ एप्रिल २०२५ रोजी पुण्याच्या प्रख्यात लाईफ कोच पूजा ए. शहा यांच्या हस्ते त्यांना रेकी आणि वास्तूशास्त्र या क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान त्यांच्या सामाजिक कार्याच्या यशाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सौ. रुपालीताई शिंदे म्हणजे केवळ एक नाव नसून, ते माणुसकीचे एक व्रत आहे. पती डॉ. शिवाजीराव शिंदे यांची खंबीर साथ आणि स्वतःची सेवाभावी वृत्ती यांच्या संगमातून त्यांनी समाजात एक वेगळा ठसा उमटवला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठणाऱ्या या ‘महानाईकेस’ आणि त्यांच्या संपूर्ण परिवारास पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा!
सौ. रुपालीताईंना त्यांच्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा! शब्दांकन : सौ. मीरा महेश मोटे, मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव.



