ताज्या घडामोडी

पत्रकारीतेशी प्रामाणिक असलेले संपादक:बालासाहेब फड मा.बालासाहेब फड

Spread the love

कुठल्याही गोष्टीचा प्रारंभ उत्साहाने करने शक्य होते परंतु प्रारंभ केलेली गोष्ट तितक्याच निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पुढे चालवणे हे महाकठीण काम आहे. त्यातले त्यात पत्रकारिता करणे हे तर सतीचे वाण आहे. अलीकडच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडिया मोठ्या प्रमाणावर आला असल्यामुळे पत्रकारितेकडे म्हणावे तेवढे वाचक आकर्षित होताना दिसत नाहीत.अस्या अवस्थेमध्ये ही काही संपादक आपल्या कार्य कुशलतेमुळे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून वाचकांना आपल्याशी जोडून ठेवतात.आपली मायभूमी, त्यातील विविध समस्या यांना वाचा फोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.पत्रकारितेसी प्रामाणिक राहून सतत कार्यशील राहतात. समाजातील उपेक्षित पण कार्यासी प्रामाणिक असणाऱ्या माणसांना मग ते कुठल्याही क्षेत्रातले असोत आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून उजेडात आणण्याचे काम करतात. अशाच पत्रकारांच्या पैकी एक पत्रकार म्हणजे संपादक मा. बालासाहेब फड होत.आज दि.04 एप्रिल 2024 हा त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा आढावा.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे.या देशाला फार प्राचीन परंपरा लाभलेली आहे.हा देश एकेकाळी सोने की चिडिया म्हणून ओळखला जात होता. येथे नालंदा,तक्षशिला सारखे विद्यापीठे होती. “राजा स्वदेश पूजन्ते l विद्वान सर्वत्र पुजन्ते” असा विचार प्रामुख्याने मांडला जात होता.नंतर या देशावर परकीयांनी आक्रमणे केली व या देशाला लुटले.त्यातच राजेशाहीचा जन्म झाला.छत्रपती शिवरायां सारखे मोजके राजे सोडले तर अनेक राजांनी जनतेची पिळवणूक केली.नंतर देशावर दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य केले.त्यांनी भारतीय जनतेचा अनन्वित छळ केला.अशातही काही सुधारणा ही आणल्या. तदनंतरच्या कार्यकाळात 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले पण लोकांची खरी प्रगती करावयाची असेल तर लोकशाही शिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अन्य विद्वानांनी संसदीय लोकशाहीचा स्वीकार आपल्या राज्यघटनेत केला. ही लोकशाही मुळात चार खांबावरती आधारलेली आहे.जीचा पहिला खांब कायदेमंडळ, दुसरा खांब कार्यकारी मंडळ, तिसरा खांब न्याय मंडळ व चौथा खांब प्रसारमाध्यमे आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात या चौथ्या खांबाचा म्हणजे प्रसारमाध्यमांचा विशेषतः वृत्तपत्रांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे.आजही लोकशाहीला खंबीर बनविण्याचे काम हे प्रसारमाध्यमे त्यातही वृत्तपत्रे करताना दिसतात.असेच लोकशाहीला खंबीर करण्याचे काम दै.सोमेश्वर साथी या दैनिकाचे संपादक बालासाहेब फड हे सातत्याने करताहेत.हे ही नसे थोडके.
बालासाहेब फड यांचा जन्म 04 एप्रील 1974 रोजी माता गंगाबाई व पिता सिताराम यांच्या पोटी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या शेजारी असलेल्या कन्हेरवाडी ता.परळी येथे झाला.त्यांना बालपणापासुन प्रभू वैद्यनाथ व संत जगमित्र नागा यांचा आशीर्वाद लाभला.घरात सात पिढ्यांपासून वारकरी संप्रदायाचे वातावरण असल्यामुळे कीर्तन,नामस्मरण व श्रवणभक्ती घडली व या अनुषंगाने चौफेर ज्ञान प्राप्त करता आले.ते स्वतः वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहेत.सांप्रदायावर त्यांचा जीव आहे.त्यांनी आपल्या ह.भ.प. बालकिर्तनकार प्रकाश महाराज फड नावाच्या मुलाला वयाच्या सातव्या वर्षी ज्ञानाई गुरुकुल सेलू येथे वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्यासाठी ठेवले. त्यांचे चिरंजीव या वयात अभ्यासू व उत्तम कीर्तन करतात. तसेच त्यांचे दुसरे चिरंजीव ह.भ.प बाल कीर्तनकार संग्राम महाराज फड हे ही कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. या पुर्वी म्हटल्या प्रमाणे वृत्तपत्र व्यवसाय हा सतीचे वाण आहे .कारण या व्यवसायात बातमी लावताना हजारदा विचार करावा लागतो.बातमीची सत्यता असावी, स्पष्टता असावी,सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे साध्य व्हावे. पद,पैसा,तोंड पाहून न लिहिता जे सत्य आहे ते लिहावे लागते. ही सगळी वैशिष्ट्‌‍ये संपादकाला पाळावी लागतात.एखादी चुकीची बातमी लागली तर त्याची खूप मोठी किंमत संपादकाला सोसावी लागते हे एक प्रकारचे अग्निदिव्यच आहे. पण हे अग्निदिव्य संपादक बालासाहेब फड हे 1995 पासून सांभाळत आहेत.त्यांनी साप्ताहिक परळी संदेश या पासून ते हे काम करत आहेत.ना कुठला या क्षेत्रातला वारसा ना भरगच्च पाठीमागे संपत्ती पण प्रामाणिकतेच्या जोरावर हे कार्य ते पार पाडताना दिसतात.संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे
असाध्य ते साध्य करिता सायास l
या न्यायाप्रमाणे त्यांनी ही असाध्य काम साध्य केले आहे.या साप्ताहिकाचे काम करत करत 2016 पासून सोमेश्वर साथी या दैनिकाचा प्रारंभ केला आहे.या दैनिकाच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदितांना लेखन मंच उपलब्ध करून दिला आहे. आमचे अनेक लेख त्यांनी छापून आम्हाला लिहिते करण्याचे काम ते करतात.एवढेच नाही तर समाजात चांगुलपणा पेरण्याचं काम करणाऱ्या गुणवंतांचा या वृत्तपत्राच्या मार्फत पुरस्कार देऊन सन्मानही करतात.चांगल्या कार्याला प्रबलन देण्याचं काम ते सतत करत आले आहेत.यासाठी स्वतःचे मन मोठे असावे लागते. जगाला ज्यांच्या कार्य कर्तुत्वाचा अभिमान वाटतो त्या शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा कार्यक्रम घडवून आणतात. त्याशिवाय अशा गोष्टी करता येत नाहीत.हेच यातून दिसून येते.
भले तरी देऊ कासेची लंगोटी l
नाठाळाचे माथी हाणू काठी l
ही भूमिका त्यांची दिसते.वारकरी संप्रदायाची प्रत्येक घडामोड आवर्जून आपल्या वृत्तपत्रात घेतात.
त्यांच्या अंतकरणात आपणास मदत करणा-यांबद्दल सतत कृतज्ञता दिसते.
आय.ए.एस.मा.किरण गित्ते साहेब व विवेकानंद यूथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा मा.सौ.उषाताई किरण गित्ते त्यांच्याप्रती ते नेहमी आभार व्यक्त करतात.वारकरी संप्रदायातील अनेक गायक,वादक,कीर्तनकार हे त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यांना आई-वडिलांचे आई गंगाबाई वडील सितारामजी यांचे सुरुवातीपासून सहकार्य लाभले. दोन भाऊ तसे दोन मुलांचे ही सहकार्य लाभत आले आहे. संपादक म्हटले की समाजसेवेसाठी खूप वेळ द्यावा लागतो अशा वेळेस घर सांभाळणारी व समजून घेणारी पत्नी महत्त्वाचे असते 2002 साली लग्न झाले तेव्हापासून मुलांची व परिवाराची सर्वाधिक काळजी त्यांच्या सौभाग्यवती ज्ञानेश्वरी बालासाहेब फड या घेत आहेत. त्यांच्या बद्दलही ते भरभरून सांगतात. वारकरी संप्रदायातील अनेक महाराज मंडळी वरती लेख ते नेहमीच आपल्या वृत्तपत्रात छापतात. महापुरुषांच्या व कार्यकर्तृत्व गाजवणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वरती ही ते नेहमीच आपल्या वृत्तपत्रातून भरभरून लिहताना दिसतात.
अस्या सव्यासाची व पत्रकारीतेसी प्रामाणीक असणा-या संपादक मा.बालासाहेब फड यांचा आज वाढदिवस.त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो व त्यांच्याकडून भविष्यातही असेच वृत्तपत्रीय व अन्य कार्य घडेल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे लेखन थांबवतो.

प्रा.डॉ.रामकृष्ण बदने
ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर
ता.मुखेड जि.नांदेड
भ्रमणध्वनी -9423437215

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!