ताज्या घडामोडी

नवीन संच मान्यतेमध्ये अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती, पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो

Spread the love

मुख्याध्यापक विलास पाटील सेवानिवृत्त

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.१
शालेय शिक्षण विभागाने आत्ताच जाहीर केलेल्या नवीन संचमान्यते मध्ये सुधारित निकषांमध्ये कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांबरोबरच अनेक शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे, असे पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो यांनी सांगितले.

सफाळे येथील डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था संचलित राजगुरू ह. म. पंडित विद्यालय व निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालय सफाळेचे मुख्याध्यापक विलास शांताराम पाटील यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ शनिवारी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. या सत्कार समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डिमेलो यांनी सांगितले की, आताच्या नवीन संचमान्यतेमध्ये १३५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळां मध्ये मुख्याध्यापक पद राहणार नसून या संचमान्यतेनुसार अनेक शिक्षक अतिरिक्त होतील अशी भीती व्यक्त करून सेवानिवृत्त होणारे मुख्याध्यापक विलास पाटील यांनी शिक्षण, क्रीडा आणि सहकार क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे असे सांगून त्यांना निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. दीपक भाते होते. ॲड. भाते यांनी सांगितले की, गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविण्यासाठी शाळा आणि संस्था यांचा समन्वय महत्वाचा आहे. आज अनुदानित शाळांपुढे अनेक आव्हाने असून अशा आव्हानांवर यशस्वीपणे मात करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणाऱ्या शिक्षकांची समाजाला खरी गरज आहे. मुख्याध्यापक विलास पाटील यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय राहिली असून त्यांनी संस्थेची इमाने इतबारे सेवा केली असे सांगून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच विलास पाटील यांच्या मित्रमंडळी आणि कुटुंबीयांकडून शुभेच्छापर मनोगत व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. दीपक भाते, पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो, मेघराज शिक्षण संस्थेचे कार्यवाह चंदुलाल घरत, डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कांतीलाल दोषी, पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष प्रमोद पाटील, संतोष पावडे, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी नितीन वर्तक, राजकुमार राऊत, संस्था आणि माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापक विलास पाटील यांनी सत्काराला उत्तर देतांना शिक्षण क्षेत्रात गेली पस्तीस वर्षे सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेचे, शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील यांचा डॉ. पांडुरंग वामन अमृते शिक्षण संस्था, निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालय, राजगुरू ह.म. पंडित विद्यालय व इंग्रजी माध्यम शाळा, गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समूह पालघर, पालघर- ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व पतपेढी तसेच विविध शिक्षक संघटनां बरोबरच त्यांच्या कुटुंबीयांकडून तसेच मित्रमंडळींकडून सपत्नीक सत्कार करण्यात आला. गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समूहाकडून त्यांच्या कार्याचा गौरव करणारे मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!