ताज्या घडामोडी

विविध आव्हानांना सामोरे जाणारे विद्यार्थी घडावेत, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. संभाजी भोजने

Spread the love

शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा सांगता समारंभ

पालघर जिल्हा प्रतिनिधी
भारताला ज्ञान महासत्ता बनवायचे आहे. म्हणूनच एकविसाव्या शतकातील विविध अशा आव्हानांना – समस्यांना सामोरे जाणारे सक्षम विद्यार्थी घडविणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणासारखी प्रशिक्षणं निश्चितच उपयुक्त ठरतील असा विश्वास पालघर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. संभाजी भोजने यांनी व्यक्त केला.

 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर, शिक्षण विभाग माध्यमिक जि. प. पालघर व पंचायत समिती शिक्षण विभाग पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृध्दी पालघर तालुकास्तरीय प्रशिक्षण माहीम येथील भुवनेश कीर्तने विद्यालयाच्या सभागृहामध्ये २६ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान तीन टप्प्यांमध्ये यशस्वीपणे पार पडले. नुकताच या प्रशिक्षणाचा समारोप झाला. या समारोप प्रसंगी बोलतांना डॉ. भोजने यांनी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांची विविध प्रशिक्षणं पूर्ण झाली नसतील तर त्यांना वेतन वाढ किंवा तस्सम लाभापासून मुकावे लागेल. आपल्या अध्यापनामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा उपयुक्त करून प्रभावी अध्यापनासाठी शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असा आशावाद व्यक्त केला. तर पालघर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी संजय वाघ यांनी आत्ताच्या स्पर्धेच्या आणि आवाहनात्मक युगात आपला विद्यार्थी टिकावा म्हणून अद्ययावत ज्ञान त्याला मिळणे गरजेचे आहे. शिक्षकांनी आपल्या विषयाव्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानग्रहण करून ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल असे सांगून वेगवेगळ्या प्रशिक्षणाचे अनुभव कथन केले.

याप्रसंगी माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर, पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो, तज्ञ मार्गदर्शक प्रमुख प्रमोद पाटील, तालुका समन्वयक डी.के. संखे, अनुविकास विद्यालय दांडीचे मुख्याध्यापक अजय राऊत, सेवाश्रम विद्यालय बोईसर च्या ज्येष्ठ शिक्षिका वंदना पाटील यांनी प्रशिक्षणाबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुलभक विजयानंद सोनवणे यांनी केले.

नवीन शैक्षणिक शैक्षणिक धोरणाची (२०२०) प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना व मुख्याध्यापकांना यशस्वी नेतृत्वाकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक व बंधनकारक असलेले हे तीन दिवसीय प्रशिक्षण तीन टप्प्यांत अत्यंत नियोजनपूर्वक व सकारात्मक वातावरणात पार पडले.

सदर प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या १९ तज्ञ मार्गदर्शकांनी नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भूत असलेल्या १२ घटकांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. पालघर तालुक्यातील अनुदानित शाळा आणि शासकीय आश्रम शाळांमधील चारशेहून अधिक शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षण समारोप कार्यक्रमाला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य डॉ. संभाजी भोजने, माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर, पालघर तालुका गटशिक्षणाधिकारी संजय वाघ, पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष डेरेल डिमेलो, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा तज्ञ मार्गदर्शक प्रमुख प्रमोद पाटील,अविनाश रडे, तालुका समन्वयक डी. के. संखे तसेच सुलभक चेतन पाटील, प्रमोद घरत, दिलीप किणी, ज्योत्स्ना पाटील, आश्विनी पाटील, नम्रता राऊत, सुशील ठाकूर, सचिन संखे, रुपेश राऊत, विलास देवडकर, वृषाली म्हात्रे, हरेश्वर नाईक, विजयानंद सोनवणे, समिधा ठाकूर, गौतम थाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, तज्ञ मार्गदर्शक, तालुका समन्वयक व शिक्षण विभागाचे मोलाचे योगदान मिळाले. तसेच या प्रशिक्षणासाठी माहीम शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य व भुवनेश कीर्तने विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. सुलभक अश्विनी पाटील यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!